अख्खं रोम शहर एका किड्यानं हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 09:56 AM2023-11-09T09:56:46+5:302023-11-09T09:57:09+5:30

१९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश रोम शहराच्या अंतर्गत आहे.

The whole city of Rome is shocked by an insect! | अख्खं रोम शहर एका किड्यानं हैराण!

अख्खं रोम शहर एका किड्यानं हैराण!

इटली हा देश तसा अतिशय प्राचीन आणि जगप्रसिद्धही. जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणूनही इटली हा देश नावाजलेला आहे. इटलीला अतिशय प्राचीन असा इतिहासही आहे. इटलीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संस्कृती अभ्यासक इथे येत असतात आणि इथे ठाण मांडून असतात. इटलीचा इतिहास, विशेषतः लिखित इतिहास हजारो वर्षे जुना आहे. रोमन व रोमन पूर्व काळापासून इटली हा देश युरोपमधील सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत देश समजला जातो. अनेक छोटी-मोठी राज्ये एकत्र येऊन इटली हा देश तयार झाला आहे. रोम हे इटलीतले सर्वांत मोठे शहर आणि इटलीची राजधानीही. 
दुसऱ्या शतकापासून पोपचे वास्तव्य रोम शहरामध्ये राहिले आहे. १९२९ साली स्थापन झालेला व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान देश रोम शहराच्या अंतर्गत आहे.

रोम हे इटलीमधील सर्वांत लोकप्रिय, युरोपीय संघामधील तिसरे, तर जगातील अकरावे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकीदेखील रोम हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. जगातील एक महत्त्वाचे सौंदर्यस्थळ म्हणून आजही रोमला मानाचे स्थान आहे, मात्र स्वच्छतेच्या बाबतीत तो मान रोमला मिळतो का, असा प्रश्न जर निघाला तर त्याचे उत्तर बहुदा नकारार्थीच येईल. आश्चर्यानं बोटं तोंडात घालावी लागतील अशी अनेक ऐतिहासिक आणि सौंदर्यस्थळं इटली आणि त्यातही रोममध्ये महामूर सापडतील, पण जगात एवढं नाव असतानाही स्वच्छतेच्या नावानं मात्र तिथे जवळपास नन्नाचाच पाढा आहे. इटलीला जाऊन आलेले पर्यटकही बऱ्याचदा त्याविषयीच तक्रार करीत असतात. 

इटलीची राजधानी रोमला सध्या एका नव्याच प्रश्नानं घेरलं आहे आणि ते म्हणजे तिथे असलेला एक विशिष्ट प्रकारचा किडा! रोमच्या नागरिकांना या किड्यानं अक्षरश: सळो की पळो करून सोडलं आहे. या किड्याचं काय करावं या प्रश्नानं तिथल्या नागरिकांची अक्षरश: झोप उडाली आहे. लोकांचं सर्वसामान्य आयुष्य त्यानं अक्षरश: हराम करुन सोडलं आहे. जिकडे पाहावं तिकडं सध्या या किड्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. 
तुम्ही म्हणाल, एवढासा किडा, त्याचा काय एवढा बाऊ? पण याच किड्यानं लोकांचं जगणं अक्षरश: हराम केलं आहे. या किड्याची उत्पत्ती अतिशय झपाट्यानं वाढते आहे आणि त्याला आटोक्यात कसं आणायचं, याचा उपायच लोकांना आणि प्रशासनाला सापडत नाहीए. अक्षरश: कुठल्याही लहानशा जागेत, सापटीत, मोकळ्या जागेत, जिथे कुठे जागा सापडेल तिथे या किड्यांनी ‘घर’ करायला सुुरुवात केली आहे.

विशेषत: ज्या ठिकाणी अन्न आहे, अशा ठिकाणी तर या किड्यांचा प्रादुर्भाव फारच झपाट्यानंं वाढतो आहे. त्यामुळे संध्याकाळी टेरेसवर, बाल्कनीत, मोकळ्या जागेत भेटीगाठी, पार्टी किंवा अन्य काही छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी जमलेल्या लोकांना या किड्यानं आपला तडाखा द्यायला सुरुवात केली आहे. त्यांचा उपद्रव इतकाही कमी त्रासदायक नाही की त्याकडे दुर्लक्ष करावं! हा किडा चावल्याने अनेकांच्या अंगाला सूज आली आहे. चावलेल्या ठिकाणी त्यांना फोड-गाठी आल्या आहेत. त्यामुळे या किड्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाकडेही त्यावर उत्तर नसल्याने तेही कोंडीत सापडले आहेत. 

भरीस भर म्हणजे जगाच्या नकाशावर रोम शहर अतिशय प्रसिद्ध असलं तरी तिथल्या स्वच्छतेच्या बाबतीत मात्र नकारघंटाच आहे. तिथल्या अस्वच्छतेला लोक वैतागले आहेत. हॉर्नेट नावाचा हा किडा मुख्यत: दक्षिणपूर्व आशियामध्ये सापडतो, सध्या मात्र हा किडा इटली, त्यातही रोममध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आहे. लाल-भुऱ्या रंगाचा हा किडा रोममध्ये प्रथम २०२१ मध्ये मोर्टेवर्डे येथे सापडला होता. त्यानंतर हळूहळू त्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे. या किड्यांच्या चावण्यामुळे लोकांच्या त्रासाचं आणि चिडचिडीचं प्रमाणही वाढत चाललं आहे. खरंतर हा किडा इटलीत सर्वप्रथम आढळला होता तो १९५०च्या दशकात. त्यानंतर तो अस्तित्वहीन झाला होता, पण त्यानं आता पुन्हा ‘दर्शन’ दिलं आहे आणि लोकांना त्यानं सळो की पळो करून सोडलं आहे. लोकांच्या आजारपणातही त्यामुळे वाढ झाली आहे. 

किड्यांना हाकलण्याच्या नादात अपघात! 
या किड्याचं वैशिष्ट्य म्हणजे घराचे दरवाजे, खिडक्या, बेड, फ्रीज, एसी, कपाटं, घरात असणाऱ्या कोणत्याही वस्तू, त्यांच्या सापटीत हा किडा आरामात जाऊन बसतो. झुंडीच्या झुंडीनं तयार होणारे हे किडे मग लोकांना अक्षरश: हैराण करतात. या किड्यांना हाकलण्याच्या नादात अनेक नागरिकांचा जिन्यावरून किंवा उंचावरून पडून अपघातही झाला आहे. काहींना तर प्राणांनाही मुकावं लागलं आहे. वाढत्या तापमानामुळे या किड्यांच्या वाढीसाठीही पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे डोकेदुखीत आणखीच भर पडली आहे.

Web Title: The whole city of Rome is shocked by an insect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Italyइटली