सलूनवालेच करतील आता तुमचं टेन्शन दूर! काहीही काय सांगता?, एक वेगळीच क्लृप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 06:05 AM2023-12-05T06:05:45+5:302023-12-05T06:06:19+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अख्ख्या जगात कोट्यवधी लोकांना नैराश्यानं घेरलं आहे आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.

Salons, hair stylists or hairdressers are trained by NGOs on mental illness. | सलूनवालेच करतील आता तुमचं टेन्शन दूर! काहीही काय सांगता?, एक वेगळीच क्लृप्ती

सलूनवालेच करतील आता तुमचं टेन्शन दूर! काहीही काय सांगता?, एक वेगळीच क्लृप्ती

असा कोणता आजार आहे, ज्यामुळे जगभरातील सर्वाधिक लोक आजारी पडत असतील? किंवा असा कोणता आजार आहे, जो एखाद्याला झाला तरीही बऱ्याचदा ना ते त्यांना स्वत:ला समजत, ना त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना, ना खुद्द बऱ्याच डॉक्टरांना. - तुम्ही म्हणाल, काहीही काय सांगता? असा कुठला आजार असू शकेल का, की जो आजार होऊनही खुद्द त्या व्यक्तीला किंवा अनेक डॉक्टरांनाही कळणार नाही! 
- हो, हे खरं आहे आणि असा एक आजार आहे आणि तो म्हणजे मानसिक आजार! अनेकांना तो असतो किंवा वेळोवेळी बऱ्याचदा या आजाराच्या, त्याच्या लक्षणाच्या सावटाखालून अनेकांना जावं लागतं, पण आपल्याला काही झालं आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. कोणताही देश आणि कोणत्याही देशातील माणसं याला अपवाद नाही. त्यात फरक फक्त प्रमाणाचा आहे. 

अनेकदा आपण पाहतो, कोणाला नैराश्य आलेलं असतं, कोणी दु:खी, हताश झालेला असतो, कोणाच्या आयुष्यातलं चैतन्यच पार हरवून गेलेलं असतं, या अवस्थेमध्ये राहिल्यानंतर बऱ्याचदा काही जण आत्महत्याही करतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या करेपर्यंतही त्याच्या जवळच्या अनेक लोकांनाही कळत नाही, की ही व्यक्ती मानसिक आजारानं त्रस्त होती! त्या अवस्थेत जास्त काळ राहिल्यानंच अशा व्यक्ती मृत्यूला किंंवा मृत्यू त्याला कवेत घेतो! 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अख्ख्या जगात कोट्यवधी लोकांना नैराश्यानं घेरलं आहे आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्याचमुळे जगात आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातही आफ्रिकन देशांमध्ये नैराश्याचं आणि आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे. कारण ‘आपण आजारी आहोत’ किंवा ‘अमुक व्यक्ती आजारी आहे’ याचं वैयक्तिक, सामाजिक पातळीवर निदानच होत नाही!  अनेक देशांमध्ये तर या विषयांतले तज्ज्ञच नाहीत. मनाचे आजार दुरुस्त करण्यासाठी सायकिॲट्रिस्ट, सायकथेरपिस्ट.. किंवा अशा प्रकारचे विविध तज्ज्ञ असतात, हे अनेक देशातल्या लोकांना तर माहीतही नाही. 

यासंदर्भात टोगो या देशाचं उदाहरण ‘आदर्श’ म्हणता येईल! मानसिक आजारांबाबत इथलं वास्तव पाहिलं तर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या देशात ऐंशी लाख लोकांसाठी केवळ पाच सायकिॲट्रिस्ट आहेत! मग यावर उपाय काय? पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत यावर एक अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा उपाय शोधून काढण्यात आला आहे. मुळात तिथे मानसिक आजारावरील तज्ज्ञच उपलब्ध नाहीत. आफ्रिकेतली ही स्थिती पाहून काही एनजीओज पुढे आल्या आणि त्यांनी एक वेगळीच क्लृप्ती शोधून काढली. सलून, हेअर स्टायलिस्ट किंवा केशभूषाकार ही अशी गोष्ट आहे, जिथे जवळपास प्रत्येक जण जातो. त्यामुळे या एनजीओजनी त्यांनाच मानसिक आजाराबाबत प्रशिक्षण दिलं. त्यांच्याकडे जे क्लायंट येतात, त्यांच्याशी ते गप्पा मारतातच, पण या गप्पा मारत असताना आपल्याकडे आलेला क्लायंट मानसिक आजारानं ग्रस्त आहे का, हे कसं ओळखायचं, त्यासाठी त्याच्याशी काय गप्पा मारायच्या, कोणते प्रश्न विचारायचे, तो चिंतेत, नैराश्यात असेल तर काय करायचं, काऊन्सिलिंगच्या माध्यमातून त्याचं नैराश्य कसं कमी करायचं, याविषयी त्यांना प्रशिक्षण दिलं.

सध्या तरी १५० सलूनवाल्यांना त्यांनी हे प्रशिक्षण दिलंय. त्यात वेळोवेळी आणखी वाढ केली जाणार आहे. ब्लूमाइंड फाऊंडेशन ही एनजीओ यात आघाडीवर आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्यात आला असला तरी त्याचे फारच सकारात्मक परिणाम दिसताहेत. कारण मानसिक आजारांबाबत, ते प्राथमिक टप्प्यावर असले तर बऱ्याचदा नुसत्या काऊन्सिलिंगनंही खूप फरक पडतो. त्या व्यक्तीला सकारात्मक वाटायला लागतं, नकारात्मक विचारांतून तो लवकर बाहेर पडतो आणि पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगायला लागतो.  जोसलिन डे लिमा या ‘सिंगल मदर’चं उदाहरण. ती सांगते, रोजचा ताणतणाव, समस्या, अनंत जबाबदाऱ्या, बेरोजगारीनं मी त्रस्त होते, पण माझी हेअरड्रेसर टेले डा सिल्व्हेरानं मला काही टिप्स दिल्या. त्यामुळे मी आता रोजच्या जगण्याची लढाई नव्या ऊर्जेनं लढायला लागले आहे.

महिलांसाठी मानसिक पुनर्वसन केंद्र
मेरी ॲलिक्स डे पुटर या उपक्रमाच्या संयोजक. त्यांच्याच सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली आणि लगेच त्यांनी त्यावर काम करायला सुरुवात केली. सलून्सचा हा पर्याय सध्या तरी फक्त महिलांसाठी वापरला जातोय. ज्या ठिकाणी जास्त महिला हेअर सलूनमध्ये जातात, तिथल्या महिलांना याबाबत प्रशिक्षित करण्यात आलं आहे. इथे महिला जास्त वेळ थांबतातही, तीच ‘संधी’ त्यांनी साधली आणि तिथे ‘मानसिक पुनर्वसन केंद्रं’ सुरू केली!

Web Title: Salons, hair stylists or hairdressers are trained by NGOs on mental illness.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.