भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

By संदीप प्रधान | Published: November 1, 2023 10:37 AM2023-11-01T10:37:29+5:302023-11-01T10:38:20+5:30

ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच आता ‘ईडी कार्ड’ मिळतील 

India should buy fighter jets like MiG, Jet from America - Ajay Bhutodia | भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची खरेदी अमेरिकेकडून करावी- अजय भूतोडिया

  • ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच आता ‘ईडी कार्ड’ मिळतील 
  • अमेरिकेला पॅलेस्टाइनमधील सर्वसामान्य नागरिकांबद्दल सहानुभूती
  • सर्वसामान्य पॅलेस्टाइन नागरिकांची ढाल बनवून हमासचा दहशतवाद


संदीप प्रधान

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका यांच्यातील संबंधात मोठी सुधारणा झाली आहे. भविष्यात औषधे, शिक्षण, संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणे गरजेचे आहे. भारताने मिग, जेट यासारख्या लढाऊ विमानांची रशियाऐवजी अमेरिकेकडून आय-३५ फायटर जेटसारख्या लढाऊ विमानांची व चीन सीमेवर लक्ष देण्याकरिता ड्रोन तंत्रज्ञानाची खरेदी करावी. भारत-अमेरिका संबंध मजबूत होण्याकरिता २०२४ च्या निवडणुकीत मोदी-बायडेन विजयी होणे गरजेचे आहे, असे मत आशिया-अमेरिका संबंधाबाबतचे बायडेन यांचे सल्लागार व डेमॉक्रॅटिक पार्टीचे डेप्युटी नॅशनल फायनान्स चेअर अजय भूतोडिया यांनी ‘लोकमत’कडे केले.

जैन धर्मियांच्या अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा आचार्य महाप्रज्ञ प्रतिभा पुरस्कार अजय भूतोडिया यांना आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या हस्ते घोडबंदर रोडवरील वृंदावन येथे प्रदान करण्यात आला. त्यानिमित्ताने लोकमतने त्यांची मुलाखत घेतली. शांतता व अहिंसेचा संदेश सर्वदूर पसरवण्याकरिता आचार्य श्री महाश्रमणजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कार्याला आपण वंदन करतो, असे ते म्हणाले.

बायडेन यांचे वय व दगा देणारी स्मरणशक्ती त्यांच्या फेरनिवडीत अडसर आहेत का? असे विचारले असता भूतोडिया म्हणाले, ट्रम्प यांनी देशाची अर्थव्यवस्था ठीक करण्यापासून अनेक आश्वासने लोकांना दिली. प्रत्यक्षात काही केले नाही. बायडेन यांनी सर्व गोष्टी करुन दाखवल्या. इन्सुलिनचे दर कमी केले. युक्रेनसोबतचे युद्ध चुटकीसरशी जिंकू असा विश्वास रशियाला वाटत होता. मात्र युक्रेनच्या पाठीशी अमेरिका उभी राहिल्यामुळे रशियाला युक्रेन गिळता आला नाही. लोकांची कामे करणारे कोण हे लोकांना माहीत असते.

इस्रायल-पॅलेस्टाइन युद्ध व त्यामधील अमेरिकेच्या भूमिकेबद्दल भूतोडिया म्हणाले, यापूर्वी ज्यू संघटनेच्या प्रयत्नांमुळे पॅलेस्टाइन, सिरिया व लेबनॉन सीमेवर भेट दिली होती. हिजबुल्ला इस्रायलमध्ये घुसून कशा पद्धतीने दहशतवाद पसरवत आहेत ते पाहायला मिळाले. अमेरिकेने इस्रायलला तंत्रज्ञानापासून सर्व गोष्टींचा पुरवठा केला आहे. परंतु सर्वसामान्य पॅलेस्टाइन नागरिकांची ढाल बनवून हमासचा दहशतवाद सुरू आहे. अमेरिकेला पॅलेस्टाइनमधील सर्वसामान्य नागरिकांबद्दल सहानुभूती आहे. मात्र जगभरातील सर्व लोकशाही देशांनी एकत्र येऊन हमासच्या दहशतवादाचा बीमोड गरजेचे आहे.

अमेरिकेतील गन व्हायोलन्सकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, हा अमेरिकेतील ज्वलंत विषय आहे. मी एक जैन माणूस असल्याने अशा हिंसाचारास कारण ठरणाऱ्या खुल्या शस्त्रखरेदीचे कधीच समर्थन करु शकत नाही. युद्धात वापरली जाणारी शस्त्रे मानसिकदृष्ट्या आजारी लोकांच्या हातात पडतात व ते शाळा, चर्च कुठेही बेधूंद गोळीबार करतात. ही शरमेने मान खाली घालण्यासारखी घटना आहे. पण रिपब्लिकन पक्षाचे गन लॉबीशी हितसंबंध असल्याने कठोर कायदे होत नाही. अमेरिकन सिनेट व काँग्रेसमध्ये डेमोक्रॅटसला बहुमत प्राप्त होताच कठोर कायदे करु, असेही ते म्हणाले.

एच-वन व्हिसावर जे भारतीय लोक काम करत होते. त्यांना व्हीझा मुदत संपल्यावर शिक्के मारुन घेण्याकरिता भारतात यावे लागत होते. जवळचे नातलग आजारी पडले तरी लोक येथे येत नव्हते. ते शिक्के अमेरिकेत देण्याची शिफारस इमिग्रेशन सबकमिटीने केली जी बायडेन प्रशासनाने मान्य केली. याखेरीज ग्रीनकार्डच्या पहिल्या पायरीवरच 'ईडी कार्ड' मिळतील. त्यामुळे तुम्ही कुणाकरिताही काम करु शकता, प्रवासाची सुविधा उपलब्ध होते. कुणाची नोकरी गेली तर ६० दिवस अमेरिकेत वास्तव्य करून दुसरी नोकरी शोधू शकता. हे ऐतिहासिक इमिग्रेशन धोरण ठरणार आहे, असे भूतोडिया म्हणाले.

Web Title: India should buy fighter jets like MiG, Jet from America - Ajay Bhutodia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.