'भारत-रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध, कारण...', जयशंकर यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 05:39 PM2024-02-20T17:39:51+5:302024-02-20T17:41:55+5:30

'अनेक पाश्चिमात्य देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवायचे.'

India-MEA-S-jaishankar-on-india-russia-relation-russian-oil-and-pakistan | 'भारत-रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध, कारण...', जयशंकर यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले

'भारत-रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध, कारण...', जयशंकर यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना सुनावले

S Jaishankar :भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या म्युनिक सुरक्षा परिषदेसाठी जर्मनीत आहेत. यावेळी त्यांनी जर्मनीतील आघाडीचे वृत्तपत्र हँडल्सब्लाटला मुलाखत दिली, ज्यात भारत आणि रशियाचे संबंध, रशियाकडून तेल खरेदी करणे आणि पाश्चिमात्य देशांकडून पाकिस्तानला होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर भाष्य केले आहे. 

भारत-रशियाचे संबंध स्थिर अन् मैत्रीपूर्ण
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत आणि रशियामध्ये स्थिर आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि रशियाने कधीही भारताच्या हिताला धक्का लावला नाही. कोणताही देश दुसऱ्या देशासोबत भूतकाळातील संबंधांच्या आधारावरच संबंध ठेवतो. रशियासोबतचे आमचे संबंध भूतकाळातील अनुभवांवर आधारित आहेत. रशियाने कधीही आपल्या हितसंबंधांना धक्का लावला नाही. आमचे संबंध नेहमीच स्थिर आणि मैत्रीपूर्ण राहिले आहेत.  

रशियाकडून स्वस्त तेल खरेदी
रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीवरुन अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी भारतावर टीका केली, त्यालाही जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, भारताकडे रशियाकडून तेल खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रशियन तेलावर बंदी घातली, तेव्हा श्रीमंत पाश्चिमात्य देशांनी वाढीव किमतीवर मध्यपूर्वेतील देशांकडून तेल खरेदी केले, पण भारत तसे करू शकत नाही. 

भारताला रशियाकडून स्वस्त दरात तेल मिळाले आणि आम्ही ते विकत घेतले. मध्यपूर्व पुरवठादारांनी युरोपीय देशांना प्राधान्य दिले, कारण ते तेलासाठी जास्त किंमत द्यायचे. सर्व देशांनी मध्यपूर्वेतील देशांकडून तेल विकत घेतले असते, तर तेलाच्या किमती वाढल्या असत्या आणि त्याचा संपूर्ण जगावर परिणाम झाला असता. आम्हालाही त्या वाढीव किमतीवर तेल विकत घ्यावे लागले असते. त्यामुळेच आम्ही रशियाकडून स्वस्त तेल खरेदी केले.

पाकिस्तानला शस्त्र पुरवठा
या मुलाखतीत परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करुन पाश्चिमात्य देशांनाही आरसा दाखवला. पूर्वी अनेक पाश्चिमात्य देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवायचे, पण भारताला नाही. गेल्या काही दशकांत हा ट्रेंड बदलला आहे. आम्हीही आमच्या शस्त्रास्त्र पुरवठादारांमध्ये विविधता आणली आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि इस्रायल हे आमचे प्रमुख पुरवठादार आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: India-MEA-S-jaishankar-on-india-russia-relation-russian-oil-and-pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.