चिन्ह हिसकावलं, प्रचारालाही बंदी; तरीही इम्रान खान यांचं वादळ; पाकच्या निकालाने राजकीय भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 01:26 PM2024-02-09T13:26:04+5:302024-02-09T13:30:40+5:30

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूक निकालात इम्रान खान समर्थक अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे.

Imran Khan supporter independent candidates lead in Pakistans general election results | चिन्ह हिसकावलं, प्रचारालाही बंदी; तरीही इम्रान खान यांचं वादळ; पाकच्या निकालाने राजकीय भूकंप

चिन्ह हिसकावलं, प्रचारालाही बंदी; तरीही इम्रान खान यांचं वादळ; पाकच्या निकालाने राजकीय भूकंप

Imran Khan Pakistan Election Results ( Marathi News ) :पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून सध्या मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांनुसार पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवारांचं पारडं जड असल्याचं दिसत असून हा नवाझ शरीफ यांच्या सत्ताधारी पीएमएल-एन पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला बॅट हे निवडणूक चिन्ह वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे इम्रान खान यांच्या पक्षाने आपले उमेदवार अपक्ष म्हणूनच या निवडणुकीच्या मैदानात उतरवले. मात्र खान यांना प्रचारासाठीही परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवारांचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल आल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

इम्रान खान यांनी समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी घेतलेली आघाडी ही नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तानातील राजकीय विश्लेषक याकडे राजकीय भूकंप म्हणून पाहू लागले आहेत. पाकिस्तानच्या राजकारणाचे निरीक्षक असलेले प्रोफेसर निलोफर सिद्दिकी यांनी म्हटलं आहे की, "निवडणुकीचा निकाल इम्रान खान यांच्या उमेदवारांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. सुरुवातीचे कल खरे ठरले तर इम्रान खान तुरुंगात असताना, त्यांच्या पक्षाचं चिन्ह हिसकावून घेण्यात आलेलं असताना केलेली ही कामगिरी असामान्य म्हणावी लागेल," असं त्यांनी म्हटलं आहे.

लष्करप्रमुखांचे डावपेचही फेल?

पाकिस्तानातील निवडणुकांत लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी इम्रान खान यांचा जाहीर विरोध केला होता. तसंच त्यांना निवडणुकीत यश येऊ नये यासाठी विविध डावपेच आखले होते. मात्र अशा स्थितीतही इम्रान खान यांनी समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार निवडून आल्यास हा नवाज शरीफ यांच्यासह जनरल मुनीर यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. कारण जनरल मुनीर यांनी आयएसआयच्या मदतीने निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती.

दरम्यान, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत अंतिम निकाल हाती आल्यानंतर कोण बाजी मारतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Imran Khan supporter independent candidates lead in Pakistans general election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.