ठळक मुद्देकराचीमध्ये एका अल्पवयीन दांपत्याला कुटुंबातील सदस्यांनी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना दांपत्याला आधी खाटेला बांधण्यात आलं, त्यानंतर विजेचा शॉक देण्यात आलापोलिसांनी हत्येप्रकरणी काहीजणांना अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत

कराची, दि. 14 - पाकिस्तानात आपल्या खोट्या इभ्रतीसाठी होणा-या हत्येचं अजून एक प्रकरण समोर आलं आहे. कराचीमध्ये एका अल्पवयीन दांपत्याला कुटुंबातील सदस्यांनी विजेचा शॉक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाचं वय 18 वर्ष होतं, तर तरुणी 16 वर्षांची होती अशी माहिती मिळाली आहे. पोलीस अधिकारी अमानुल्ला मारवात यांनी दिलेल्या माहितीनुसार, दांपत्याला आधी खाटेला बांधण्यात आलं, त्यानंतर विजेचा शॉक देण्यात आला. 

पोलीस अधिकारी अमानुल्ला मारवात यांनी सांगितल्यानुसार, 'कराचीमधील इब्राहिम हैदरी परिसरातील 16 वर्षीय तरुणी आपल्या 18 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेवटी दोन्ही कुटुंबानी निर्णय घेत आम्ही तुमच्या लग्नासाठी तयार आहोत असं सागंत दोघांनाही घरी परत येण्यासाठी तयार केलं. दोघेही परतले असता त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि विजेचा शॉक देऊन त्यांची हत्या करण्यात आली'.

'अधिका-यांनी कबर खोदून दांपत्याचा मृतदेह बाहेर काढला', असं अमानुल्ला मारवात यांनी सांगितलं आहे. बुधवारी मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टममध्ये विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आधी तरुणीला पुरण्यात आलं, त्यानंतर एका दिवसाने तरुणाची हत्या करण्यात आली. 

पोलिसांनी हत्येप्रकरणी काहीजणांना अटक केली आहे, मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. 

हिंदू, मुस्लिम एकत्र राहणं अमान्य, दांपत्याला रुम देण्यास हॉटेलचा नकार
बंगळुरुत केरळमधील एका दांपत्याला त्यांचा धर्म वेगळा असल्याने रुम नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. शफीक शुबैदा हक्कीम आणि दिव्या असं या दांपत्याचं नाव आहे. ते केरळचे राहणारे आहेत. बंगळुरुमधील सुदामा नगर येथे अन्निपुरम मेन रोडवर असणा-या ऑलिव्ह रेसिडेन्सी हॉटेलमध्ये हा विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला होता. दांपत्याने दिलेल्या माहितीनुसार, रिसेप्शनिस्टने दोघांचेही ओळखपत्र पाहिल्यानंतर रुम नाकारली असल्याचा दावा केला होता. 

"त्याने आमची नावं रजिस्टरवर नोंद केली असता मी मुस्लिम असून, माझी पत्नी हिंदू असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आम्हा दोघांचाही धर्म वेगळा असल्याने तुम्ही विवाहित आहात का अशी चौकशी त्याने केली. आम्ही रितसर पद्धतीने लग्न केलं असल्याचं त्याला सांगितलं. यानंतर त्याने आम्हाला रुम देण्यास थेट नकार दिला. हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहणं मान्य नसल्याचं सांगत त्याने रुम देऊ शकत नाही सांगितलं", अशी माहिती शफीक शुबैदा हक्कीम यांनी दिली होती.