Ali Abdullah Saleh's assassination and problem of Yemen | अली अब्दुल्लाह सालेह यांची हत्या आणि धगधगता येमेन

ठळक मुद्देगेली अनेक वर्षे येमेनला हौती बंडखोरांनी पोखरुन ठेवलेले आहे. काही तज्ज्ञांच्या मते हौती बंडखोरांचे मुळ 90च्या दशकात वायव्य येमेनमध्ये प्रभावी असणाऱ्या शबाब-अल-मुमानीन संघटनेमध्ये आहे.1978 साली उत्तर येमेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सालेह सत्तेत आले. त्यानंतर 1990 साली देशाच्या दोन तुकड्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ते बृहद अशा येमेनचे राष्ट्राध्यक्ष बनले.

सना- सलग 33 वर्षे येमेनवर राज्य करणाऱ्या अली अब्दुल्लाह सालेह यांची दोन दिवसांपुर्वी हत्या करण्यात आली. अरब स्प्रींगमध्ये झालेल्या उठावात 2011 साली सालेह यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र सत्तापालट होऊनही येमेनमध्ये फारसा बदल झालेला नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये येमेनमधील स्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे.

1978 साली उत्तर येमेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सालेह सत्तेत आले. त्यानंतर 1990 साली देशाच्या दोन तुकड्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ते बृहद अशा येमेनचे राष्ट्राध्यक्ष बनले. मात्र 2011 साल उजाडले ते बदलाचे वारे घेऊनच. बेकारी आणि चलनवाढीने त्रस्त झालेल्या लोकांनी रस्त्यावर येऊन त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले. त्यानंतर हादी यांचे सरकार अस्त्तित्वात आले. गेली अनेक वर्षे येमेनला हौती बंडखोरांनी पोखरुन ठेवलेले आहे.
काही तज्ज्ञांच्या मते हौती बंडखोरांचे मुळ 90च्या दशकात वायव्य येमेनमध्ये प्रभावी असणाऱ्या शबाब-अल-मुमानीन संघटनेमध्ये आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली 2003 साली इराकवर हल्ला करण्यात आल्यानंतर या संघटनेचा एक नेता हुसैन- अल-हौती याने विरोध प्रकट केला होता. त्याने अमेरिका आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सालेह यांच्याविरोधात निदर्शने केली होती. मात्र येमेनी संरक्षण दलाच्या हल्ल्यात त्याला ठार मारण्यात आले. त्याच्यानावावरून या बंडखोराच्या गटाला हौती असे नाव पडले आहे. सध्या 33 वर्षांचा अब्दुलमलिक -अल-हौती या गटाचे नेतृत्व करत आहे.

    हौती बंडखोरांच्या मते आताचे हादी सरकार भ्रष्ट असून अधिकारांचे विभाजन योग्यरित्या झाले नसल्याचे कारण पुढे करत हौती बंडखोरांनी यादवी सदृ्श्य स्थिती निर्माण केली.  त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर राष्ट्राध्यक्ष अब्द्राबुह मन्सूर हादी यांनी सौदी अरेबियाचा रस्ता धरला. त्याचप्रमाणे येमेनमधील बंडखोरांना आटोक्यात आणण्यासाठी सौदीने सरळ हस्तक्षेप करत बंडखोरांवर हल्ले सुरु केले. त्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आणि सामान्य येमेनी नागरिक व इतर देशांतील नागरिकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण झाला होता.  लढाईमध्ये  वेगाने घडामोडी घडत जाऊन बॉम्बमुळे अनेक ठिकाणी इमारती, शाळा उद्धवस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले तर हजारो लोकांना आपले प्राणही गमवावे लागले. संयुक्त राष्ट्राच्या मते या संपुर्ण पेचप्रसंगात 10 हजार लोकांची हत्या झालेली आहे. तसेच मानवाधिकाराच्या बाबतीत ही सर्वात मोठी समस्या असल्याचे मतही संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.येमेनचे महत्त्व काय?
येमेन हा तसा पाहायला गेल्यास मध्यम आकाराचा देश आहे. भूभागाच्या बाबतीत जगात त्याचा क्रमांक 50 वा आहे. मात्र त्याचे स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आहे. एडनचे आखात (अरबी समुद्र) आणि तांबडा समुद्र जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीची जागा या येमेनजवळ आहे. या चिंचोळ्या जलपट्ट्याला बाब-अल-मनुदाब असे नाव आहे. याच मार्गावरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. तेलाची वाहतूकही येथूनच होते. इतकेच नव्हे तर तांबड्या समुद्रातील काही बेटांवरही येमेनचा अधिकार आहे. त्यामुळे येमेनचे महत्व अनन्यसाधारण आहे. सोमालियाच्या चाच्यांचा तडाखा त्यांच्या परिसरात गेल्यामुळे भारतासह अनेक देशांच्या नागरिकांना बसे. त्यामुळे जलहद्दीचे महत्व सर्व जगाला चांगलेच माहित आहे. येमेन अशा विशिष्ट जागेवर असल्यामुळे एडन व येमेनचे महत्त्व वाढते. थोडक्यात एडनचे स्थान सुएझ कालव्याच्या स्थानाप्रमाणे आहे असे म्ह़णता येईल. भारतीयांसाठी एडनची आणखी एक व अत्यंत महत्वाची आठवण आहे, ती आहे आद्य क्रांतीकरक वासुदेव बळवंत फडके यांची. ब्रिटीश सरकारने त्यांना हद्दपार करून एडनच्या तुरुंगात शिक्षेसाठी ठेवले होते. एडनच्या तुरुंगातून ते बाहेर पडण्यात यशस्वीही झाले होते, मात्र त्यांना पुन्हा पकडण्यात आले. 17 फेब्रुवारी 1883 रोजी वासुदेव बळवंतांचे अन्नत्याग केल्यामुळे निधन झाले. 


Web Title: Ali Abdullah Saleh's assassination and problem of Yemen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.