अबुधाबीतील हिंदू मंदिरात जनसागर! ६५ हजार भाविकांनी घेतले दर्शन; समाधान, धन्यतेचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:57 AM2024-03-05T10:57:21+5:302024-03-05T11:01:43+5:30

BAPS Hindu Mandir in Abu Dhabi: अबुधाबी येथील हिंदू मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतरच्या अद्भूत अनुभवामुळे अनेकांचे डोळे पाणावले. मंदिराची वास्तू, रचना, कलाकुसर आणि मंदिर व्यवस्थापन यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

abu dhabi baps hindu mandir draws over 65 thousand pilgrims and visitors on first public sunday | अबुधाबीतील हिंदू मंदिरात जनसागर! ६५ हजार भाविकांनी घेतले दर्शन; समाधान, धन्यतेचा अनुभव

अबुधाबीतील हिंदू मंदिरात जनसागर! ६५ हजार भाविकांनी घेतले दर्शन; समाधान, धन्यतेचा अनुभव

BAPS Hindu Mandir in Abu Dhabi: अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा देशासह परदेशातील अनेकांनी पाहिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती येथे जाऊन BAPS हिंदू मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी तब्बल ६५ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. 

रविवारी हे मंदिर खुले करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रात ४० हजार तर सायंकाळच्या सत्रात २५ हजार जणांनी या मंदिराला भाविक तसेच पर्यटकांनी भेट दिली. २ हजार जणांचा ग्रुप करून या मंदिरात सोडले जात होते. एवढा जनसागर येऊनही कुणीही संयम सोडला नाही, कुठेही धक्काबुक्कीचा प्रकार झाला नाही, सर्वांनी शांततेने या मंदिरात समाधान आणि आनंद अनुभवला, असे सांगितले जात आहे. एवढा प्रचंड जनसमुदाय येऊनही या मंदिराच्या व्यवस्थापनात कुठेही गडबड झाली नाही, याबाबत स्वयंसेवक आणि मंदिर व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

अबुधाबी येथील संपत राय यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. हजारो लोकांची गर्दी असूनही एवढी शिस्तबद्ध व्यवस्था कधीच पाहिली नव्हती. मला तासनतास थांबावे लागेल आणि शांतपणे दर्शन घेता येणार नाही, अशी काळजी लागून राहिली होती. मात्र, तसे काही झाले नाही. आम्ही सर्वांनी शांतपणे दर्शन घतले. अत्यंत समाधानी झालो. सर्व बीएपीएस स्वयंसेवक आणि मंदिर कर्मचाऱ्यांना सलाम. तर, लंडनच्या प्रवीणा शाह यांनी अबुधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिराला दिलेल्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगताना सांगितले की, मी दिव्यांग आहे. हजारो पर्यटक असूनही कर्मचाऱ्यांनी दिलेली काळजी विशेष उल्लेखनीय होती. लोकांची गर्दी एका ठिकाणाहून दुसरीकडे शांततेत जात असल्याचे मला दिसत होते.

मंदिरात दर्शन आणि सामूहिक प्रार्थना

हजारो पर्यटक, भाविक, अभ्यंगतांना मंदिराच्या दर्शनात सहभागी होता आले आणि सामूहिकरित्या प्रार्थना करता आली. अभिषेक आणि आरतीच्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या अद्भूत अनुभवामुळे अनेकांचे डोळे पाणावले. काही जण भावूक झाल्याचे दिसून आले. मंदिराची भव्यता, वास्तूची रचना आणि कलाकुसर पाहून अनेकजण अचंबित झाले होते. या मंदिरात येण्यासाठी अनेकांनी दीर्घ पल्ल्याचा प्रवास केला. त्यांनी अनुभवलेला आनंद आणि समाधान त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक होता. केरळचे बालचंद्र म्हणाले की, मी लोकांच्या समुद्रात हरवून जाईन, असे मला वाटत होते. मात्र, मंदिरात झालेले दर्शन इतके सुलभ आणि चांगल्या पद्धतीने झाले की, मलाच आता याचे आश्चर्य वाटत आहे. मी शांतपणे दर्शनाचा आनंद घेऊ शकलो.

आध्यात्मिकतेची अनुभूती घेण्याची जागा आहे!

गेली ४० वर्षे दुबईत राहणारे नेहा आणि पंकज म्हणाले की, आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. मंदिर आमच्या सर्व अपेक्षेपेक्षा जास्त चांगले झाले आहे. हा खरा चमत्कार आहे. आम्ही स्वतःला धन्य समजतो. कारण आता आमच्याकडे येऊन प्रार्थना करण्याची आणि आध्यात्मिकतेची अनुभूती घेण्याची जागा आहे! तर, अमेरिकेतील पोर्टलंड येथील पियुष म्हणाले की, या मंदिराचे उद्घाटन हे संयुक्त अरब अमिरातीच्या विविधतेचा आणि सर्वसमावेशकतेच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हे विविध समुदायांमधील ऐक्याचे सुंदर प्रतिनिधित्व आहे. दुसरीकडे, मेक्सिकोतील लुईस म्हणाले की, मंदिराच्या वास्तुचे स्थापत्य आणि कलाकुसर आश्चर्यकारक आहेत. भारताचा सांस्कृतिक वारसा बघायला मिळाल्याचे मला खूप कौतुक वाटते. अधिकाधिक लोकांना या मंदिराला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

साधू ब्रम्हविहारदास यांनी जनतेसाठी उद्घाटनाच्या रविवारचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना सांगितले की, नवीन बस सेवा आणि हा दिवस प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्या सर्वांगीण पाठिंब्याबद्दल आम्ही युएईचे नेते आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे मनापासून आभारी आहोत. मी पर्यटक, प्रवासी, यात्रेकरूंचेही आभार मानू इच्छितो. ज्यांनी त्यांच्या भेटीदरम्यान इतका संयम ठेवला आणि समजूतदारपणे सहकार्य केले. हे मंदिर अध्यात्माचा दीपस्तंभ आणि सलोख्याचे प्रतीक म्हणून काम करेल, सर्व पार्श्वभूमी आणि श्रद्धांच्या लोकांना एकत्र आणेल. अबुधाबी ते मंदिर असा एक नवीन बस मार्ग (२०३) सुरू करून आठवड्याच्या शेवटी भेटीची सुविधा देऊन आणि सांस्कृतिक विविधता आणि सर्वसमावेशकता वाढविण्यासाठी देशाच्या वचनबद्धतेवर जोर देऊन यूएई सरकारची सुलभता आणि सर्वसमावेशकतेसाठी समर्पण अधिक अधोरेखित केले गेले.

दरम्यान, अबूधाबीतील बीएपीएस हिंदू मंदिर केवळ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड नाही तर विविधता आणि सर्वसमावेशकतेसाठी युएईच्या अग्रगामी दृष्टिकोनाचा पुरावा म्हणून दिमाखात उभे आहे. शांतता, अध्यात्म आणि समाजाची भावना शोधणाऱ्या सर्वांचे स्वागत केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

अल नेहयान बस स्थानक (अबू धाबी सिटी)

ठिकाण : https://maps.app.goo.gl/nqQ12y83MxjKE5dS8?g_st=ic

बीएपीएस हिंदू मंदिर, अबू मुरेखा 

ठिकाण : https://maps.app.goo.gl/XPL6mnPn9ZkYasn68?g_st=ic

Web Title: abu dhabi baps hindu mandir draws over 65 thousand pilgrims and visitors on first public sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.