भारतातील २ तरुण उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत; पण १६ व्या दिवशी झोपेत मृत्यू, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 02:50 PM2024-01-15T14:50:48+5:302024-01-15T14:53:07+5:30

शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर दोन आठवड्यांतच तरुणांच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

2 young men from India went to America for higher education but died in sleep on the 16th day | भारतातील २ तरुण उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत; पण १६ व्या दिवशी झोपेत मृत्यू, नेमकं काय घडलं?

भारतातील २ तरुण उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत; पण १६ व्या दिवशी झोपेत मृत्यू, नेमकं काय घडलं?

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील दोन विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे दोन्ही तरुण १६ दिवसांपूर्वीच उच्चशिक्षणासाठी आपली मायभूमी सोडून अमेरिकेत गेले होते. मात्र त्यांचा आता संशयास्पद मृत्यू झाल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. दिनेश (२२) आणि निकेश अशी मृत तरुणांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश आणि निकेश हे दोन तरुण अमेरिकेत गेल्यानंतर एकाच खोलीत राहात होते. मात्र रविवारी त्यांचा झोपेत मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी याबाबतची माहिती दोन्ही तरुणांच्या पालकांना फोनद्वारे दिली. दिनेश हा तेलंगणातील वानपर्थी येथील, तर निकेश हा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील रहिवासी होता. 

पालकांनी कोणता संशय व्यक्त केला? 

या तरुणांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र कार्बन मोनोक्साइड वायूने दिनेश आणि निकेश यांचा मृत्यू झाल्याचा संशय दिनेशचे वडील वेंकण्णा यांनी व्यक्त केला आहे. तसंच दिनेशचे चुलते साईनाथ यांनी म्हटलं की, "दोन्ही तरुणांचे ते राहत असलेल्या परिसरात मित्र होते. त्यांचे मित्र जेव्हा त्यांना उठवण्यासाठी आले, तेव्हा दोघेही झोपेत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर मित्रांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथील डॉक्टरांनी दिनेश आणि निकेश यांना मृत घोषित केलं."

दरम्यान, दिनेशने चेन्नईतील एका खासगी विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेकची पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला होता. मात्र तिथं गेल्यानंतर दोन आठवड्यांतच त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: 2 young men from India went to America for higher education but died in sleep on the 16th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.