युवा शेतकऱ्याने ‘सेल्फ मार्केटिंग’चा 'फंडा' वापरत टोमॅटो विक्रीतून मिळवले भरघोस उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:34 PM2018-12-28T12:34:17+5:302018-12-28T12:34:31+5:30

यशकथा : मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे.

Youth Farmer earns money by Using 'Self Marketing' Funda for 'Tommota' celling | युवा शेतकऱ्याने ‘सेल्फ मार्केटिंग’चा 'फंडा' वापरत टोमॅटो विक्रीतून मिळवले भरघोस उत्पन्न 

युवा शेतकऱ्याने ‘सेल्फ मार्केटिंग’चा 'फंडा' वापरत टोमॅटो विक्रीतून मिळवले भरघोस उत्पन्न 

Next

- रमेश कदम ( हिंगोली) 
सध्या बाजारात टोमॅटोचे दर कमालीचे घसरले असतानाही हिंगोली जिल्ह्यातील नवखा ता. कळमनुरी येथील माऊली देशमुख या युवा शेतकऱ्याने नैसर्गिक पद्धतीने गावराण टोमॅटो विक्रीतून १५ गुंठ्यात पन्नास हजारांचा नफा मिळविला आहे.

सध्या बाजारात टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असताना माऊली देशमुख यांनी सेल्फ मार्केटिंगचा फंडा अजमावत मंदीच्या काळातही ४० रुपये प्रतिकिलो दर मिळविला आहे. नैसर्गिक टोमॅटोची चव आणि महत्त्व पटवून सांगत शेतमालाला शेतकऱ्यालाही दर ठरविता येतात याचा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

माऊली नेहमी आपल्या छोटेखानी शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. फुलशेती व मार्केटिंगच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीमुळे त्याने मराठवाडा आणि विदर्भात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यापूर्वी गावराण लसूण घरोघरी विकून त्यांनी बाजारभाव हा शेतकऱ्यांनी स्वत: ठरवायचा असतो, हे सिद्ध केले. आता देशमुख यांनी गावराण टोमॅटोचा नवा प्रयोग केला. केवळ १५ गुंठे जमिनीत त्यांनी चेरी टोमॅटोची लागवड केली. यासाठी अठराशे रुपयांचे बियाणे आणि इतर किरकोळ खर्च, असा एकूण चार हजारांचा खर्च आला आहे. कुठलेही रासायनिक खत किंवा कीटकनाशकाचा वापर केला नाही. जमिनीत शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या नैसर्गिक जीवामृताचा वापर केला. किडीपासून संरक्षणासाठी ताकाची फवारणी केली.

लागवडीनंतर काही दिवसातच रसरशीत, लालबुंद टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर न केल्याने टोमॅटोची चव इतर टोमॅटोपेक्षा वेगळी लागते. रसदार आणि आंबट-गोड चव असलेले चेरी टोमॅटो हा तरुण हिंगोली, पुसद जिल्ह्यात पॉलिथीनच्या पिशवीमध्ये पाव किलोची पॅकिंग दहा रुपयांस विकून चाळीस रुपये प्रतिकिलोने विक्री करीत आहे. 

सद्य:स्थितीत बाजारपेठेत टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले आहेत. दहा रुपयांत दीड ते दोन किलोपर्यंत दर घसरूनही ग्राहक पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांचा  उत्पादन खर्चही वसूल होत नाही, हे वास्तव चित्र असताना या नैसर्गिक टोमॅटोला मात्र ग्राहक प्रचंड पसंती दाखवत आहेत.  मॉर्निंग वाकला येणाऱ्या नागरिकांना माऊली नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या टोमॅटोचे महत्त्व सांगतो. तासाभरातच शंभरच्या वर पाकिटांची विक्री करून तो घरी परततो. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर, कळमनुरी परिसरातही घरोघरी जाऊन टोमॅटोची चव आणि नैसर्गिक उत्पादनाचे महत्त्व सांगून काही वेळातच टोमॅटो विक्री करतो.

नैसर्गिक पद्धतीचे उत्पादन आणि सेल्फ मार्केटिंगचे तंत्र या तरुण शेतकऱ्याने विकसित केले असून, त्याच्यासाठी ते लाभदायक ठरत आहे. दहा रुपये किलो टोमॅटो मिळत असतानाही माऊलीकडून मात्र, दहा रुपयांचे पाव किलो टोमॅटो खरेदी करतात. यातच त्याच्या मार्केटिंगचे यश सामावले आहे.

Web Title: Youth Farmer earns money by Using 'Self Marketing' Funda for 'Tommota' celling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.