पानकनेरगावचे पानमळे लुप्त होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:04 PM2019-06-14T19:04:13+5:302019-06-14T19:06:32+5:30

पाणी कमी पडल्याने ही पानमळे मोडून टाकण्याची वेळ

On the way to the extinction of Panakanergaon's leaf farming | पानकनेरगावचे पानमळे लुप्त होण्याच्या वाटेवर

पानकनेरगावचे पानमळे लुप्त होण्याच्या वाटेवर

Next
ठळक मुद्देदुष्काळामुळे तीनच मळे शिल्लकपूर्वी ४० ते ५० शेतकऱ्यांकडे होते पानांचे मळे

- राहुल टकले 

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव या गावाची ओळख पानांच्या मळ्यांमुळे पानकनेरगाव अशी पडली. गत चार ते पाच वर्षांपूर्वी या गावात ४० ते ५० शेतकऱ्यांकडे नागवेलीच्या पानांचे मळे असायचे. मात्र सततच्या दुष्काळामुळे हे पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर असून सध्या फक्त ३ शेतकऱ्यांकडेच पानांचे मळे आहेत.

यंदा दुष्काळी स्थिती असूनही १० ते १५ शेतकऱ्यांनी पानमळ्यांची लागवड केली होती. मात्र पाणी कमी पडल्याने ही पानमळे मोडून टाकण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. येथील शेतकरी अनेक वर्षांपासून  पानमळ्यांची लागवड करत आला आहे. येथील पाने मराठवाडा विदर्भासह गुजरात, तेलंगणा इ. राज्यांत विक्री केली जात असे. १ हजार पानांना किमान ५० ते दोनशे  रुपयांचा दर त्या काळी मिळत असे. सध्या प्रतिहजार पानांना चारशे ते पाचशे रुपयांचा दर आहे. पाने खरेदी करण्यासाठी मराठवाडा-विदर्भातून व्यापारी येत. थेट पानांच्या मळ्यातून पाने खरेदी केली जात असे. इतर पिकांपेक्षा पानमळ्यांतून उत्पन्न चांगले मिळत असल्याने पानभरी क्षेत्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे पानांचे मळे होते. मात्र सततच्या दुष्काळाने येथील पानउत्पादक शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून पानमळे संपुष्टात आले आहेत.  सध्या गावातील तीन शेतकरी टँकरचे विकत पाणी आणून हे पानमळे जोपासत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टँकर मिळणेही कठीण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पानमळे मोडून टाकले; तरीही महसूल प्रशासनाने साधा पंचनामाही केला नसल्याचे शेतकरी लक्ष्मण बोलवार यांनी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुका कायम उपेक्षित आहे. दुष्काळाने  मोठ्या प्रमाणात पानमळे मोडले. शेकडो एकरातील केळी करपल्या; मात्र महसूल प्रशासनाने अद्याप एकाही शेतकऱ्याच्या शेताचा पंचनामा केला नाही. शासनाच्या कोणत्याही उपाययोजना तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचे यावरुन दिसते. शासनाच्या दुर्लक्षामुळे हे मळेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पानकनेरगाव या एकमेव गावात पानमळे आहेत. शासनाने शेतकऱ्यांना मदत करुन पानउत्पादनात जिल्ह्याचे नाव झळकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अशी होते लागवड 
जून महिन्यामध्ये बेड तयार करून त्यावर एक ते दीड फूट अंतरावर शेवरीच्या झाडांची लागवड केली जाते. आॅगस्ट महिन्यात नागवेलीच्या पानांच्या काड्यांची त्यात लागवड केली जाते. पानांचे उत्पादन एप्रिल-मे महिन्यात निघण्यास सुरुवात होते. दरवर्षी मे महिन्यात पानांच्या वेली शेवरीच्या शेंड्यापर्यंत जातात. मात्र यंदा पाणी कमी पडल्यामुळे अडीच ते तीन फुटांपर्यंत वेलांची वाढ झाली आहे. अनेक वेली पाण्याअभावी विरुन गेल्या आहेत. त्यामुळे यंदा पानांचे उत्पन्न हाती हाती येईल, की नाही याचीच चिंता असल्याचे पान उत्पादक शेतकरी बोलवार यांनी सांगितले.

वृद्धांनाच जमते पानमळ्यात काम
पानकनेरगाव येथे पूर्वीपासून पानमळे घेतले जातात. पानमळ्यांमुळेच पानकनेरगाव असे नाव गावाला मिळाले आहे. पानमळ्यातील कामे मेहनतीची नसून त्याचा अनुभव असलेल्या वृद्धांनाच मळ्यात काम जमते. त्यामुळे गावातील वृद्धांना रोजगार मिळत असे. तरुणांना हे काम शिकण्यासाठी अनेक दिवस लागतात.  पानकनेरगावातील पानमळे नैसर्गिक आपत्तीने नामशेष हात चालले आहेत. पानमळे जोपासणारी पिढी गेल्यानंतर पानमळे जोपासण्याची कलाही कालबाह्य होण्याची शक्यता पानउत्पादक शेतकऱ्यांतून वर्तविली जात आहे.

Web Title: On the way to the extinction of Panakanergaon's leaf farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.