हळद कुकर यंत्राने दिली आखाडा बाळापूरला नवी ओळख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 04:37 PM2019-03-08T16:37:56+5:302019-03-08T16:43:19+5:30

बाळापूरची व्यापारपेठ राज्यात हळद कुकर विक्रीचे मुख्य केंद्र बनली आहे.

the turmeric cooker machine is the new identification of Akhada Balapur | हळद कुकर यंत्राने दिली आखाडा बाळापूरला नवी ओळख 

हळद कुकर यंत्राने दिली आखाडा बाळापूरला नवी ओळख 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राबाहेरही हिंगोली जिल्ह्याचा लौकीकदरवर्षी अडीच हजार कुकरची होतेय विक्री

- रमेश कदम 

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : नवीन तंत्रज्ञानाने तयार होणारे व खात्रीलायक अशी बाळापूर येथील हळद कुकरची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्याचा डंका महाराष्ट्राबाहेरही वाजतो आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश कर्नाटकातही येथील हळद शिजवण्याच्या कुकरचा लौकिक पोहोचला आहे. आता बाळापूरची व्यापारपेठच हळद कुकर विक्रीचे मुख्य केंद्र बनली आहे.

शेतीला तंत्रज्ञानाची जोड हवी, असे शेतीतज्ज्ञांकडून सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात त्याचा अवलंब होत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. परंतु तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास व शेतीला जोडधंद्याची साथ लाभल्यास शेती तोट्यात जात नाही, हा अनुभव आता नवीन राहिलेला नाही. आखाडा बाळापूर व परिसरात हळदीचे वाढते उत्पन्न लक्षात घेता येथील व्यावसायिकांनी २00८ मध्ये हळद कुकर बनविण्यास सुरूवात केली. प्रारंभी त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसला नाही. हळदीचे पीक नगदी असले तरी त्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागायचे; परंतु हळदीचे कुकर तयार केल्यानंतर मात्र ते कष्ट निम्म्यावर आले. शेतकऱ्यांचा हा अनुभव बाळापूरच्या कुकरची ख्याती वाढविण्यास पुरेसा ठरला.

कुकरची वाढती मागणी लक्षात घेता  सुरुवातीला २0१0 बाळापुरात दोन कारखाने तयार झाले. या दोन व्यावसायिकांचे कुकर बनविण्याचे तंत्र व त्याचा दर्जा याबाबत मराठवाडाभर नावलौकिक झाला. हळदीसाठीचे कुकर खरेदी करण्यासाठी बाळापूरकडे मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचा ओढा वाढल्यानंतर इतर व्यावसायिकही कुकर बनविण्याकामी पुढे आले. गेल्या आठ वर्षांपासून बाळापुरात तब्बल १५ कारखाने हळदीचे कुकर बनवितात. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या प्रांतांतही आखाडा बाळापूरचे हळद कुकर लोकप्रिय ठरले आहे. आखाडा बाळापूरचा हा ब्रँड परराज्यातही यशस्वी ठरला आहे. 

दर्जेदार उत्पादनामुळे राज्याबाहेर कीर्ती
हळदीचे कुकर शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असून बाळापूर परिसरात प्रथम आम्ही त्याचे उत्पादन केले. प्रारंभी शेतकऱ्यांना त्याचा विश्वास वाटला नाही. परंतु हे उत्पादन दर्जेदार असून शेतकऱ्यांना सोप्या, सुरक्षित रीतीने व चांगल्या दर्जाचा माल निर्माण करून देऊ शकतो, असा प्रचार ज्या शेतकऱ्यांनी या कुकरचा वापर केला; त्यांच्याकरवी झाला. त्यामुळे आता आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या भागांतूनही मोठी मागणी होते. दर्जेदार उत्पादनामुळे बाळापूरचे नाव राज्यासोबत बाहेरही पोहोचले आहे. निजामाबाद, बीदर, विशाखापट्टणम् या भागांतही बाळापूरचे कुकर पोहोचले असून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

प्रचंड मागणी : बाळापुरात १५ कारखाने
या कारखान्यांमधून रोज शंभर ते दीडशे कुकर विक्री होत आहेत. यातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. १ लाख ६० हजारांपासून ते ४ लाखांपर्यंत कुकरच्या किंमती ठरलेल्या आहेत. क्षमतेनुसार या किमती ठरल्या असून बाळापूरचा ब्र्रॅण्ड यशस्वी ठरला आहे. परंतु येथील व्यावसायिकांनी आपल्या ब्रॅण्डची नोंदणी केली नसल्याने अनेक उद्योजक बाळापुरात चकरा मारत आहेत. शेकडो कुकर बनवून घेऊन ते ब्र्रॅण्डेड कंपनीच्या नावाने विकण्यास त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र येथील कारखानदार आपले ब्र्रॅण्ड जपण्यासाठी अडून बसले आहेत. 

हळदीचा पट्टा असल्याने कुकरचा जन्म
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यांत हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. त्याशिवाय नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर परिसरातही मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड होते.  हळदीचे पीक घेत असताना शेतकऱ्यांना मोठे कष्ट उपसावे लागायचे. हळदीचे पीक काढल्यानंतर हळद शिजवणे, वाळवणे व ढोल करणे या प्रक्रिया अत्यंत कीचकट, वेळखाऊ, श्रमाच्या  व खर्चिक होत्या. हळद शिजवताना अनेकदा शेतकऱ्यांना इजा व्हायची.  इंधनासाठी लाकडे मोठ्या प्रमाणावर लागायची, या सगळ्या कष्टाला फाटा देण्यासाठी हळद कुकरचा जन्म झाला. ते यशस्वीही ठरले.

पाणी व जळतण कमी लागते
हळद उत्पादकांचा हा त्रास कमी करून कमी पाणी व इंधनामध्ये मोठ्या प्रमाणात हळद शिजवून कुकरमधून बाहेर पडते. दोन लहान व एक मोठी टाकी अशा पद्धतीने जोडली की, पाणी गरम होण्यासाठी एक टाकी तर दुसरी हळद टाकण्यासाठी अन् तिसरीतून चाळणीद्वारे हळद बाहेर येते. योग्य प्रमाणातील तापमानात हळद शिजल्याचे हळदीचा दर्जाही सुधारतो. परिणामी, शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. कष्ट कमी होतात व खर्चातही बचत होते. मजुरांची संख्या कमी होते. इंधनाचा खर्च कमी होतो आणि चांगल्या दर्जाची हळद कमी वेळेत शेतकऱ्यांच्या पुढे तयार होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हळदीच्या कुकरला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.

‘ब्रॅण्ड’साठी धडपड
आता या कुकर निर्मितीमध्ये उद्योगपतीनींही लक्ष घातले आहे. अनेक जण आॅर्डरसाठी चकरा मारीत आहेत. विनानावाचे कुकर खरेदी करून आपला ‘नग’ खपविण्यासाठी हे उद्योजक धडपड करत आहेत.

Web Title: the turmeric cooker machine is the new identification of Akhada Balapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.