येथे मृतदेहांनाही करावी लागते डॉक्टरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:05 PM2018-06-27T22:05:09+5:302018-06-27T22:06:20+5:30

जीवित रुग्ण आपल्या आरोग्य तपासणीसाठी तासनतास डॉक्टरांची प्रतीक्षा करीत असल्याचे आपण अनेकदा अनुभवतो. मात्र मृतांनाही डॉक्टरांची तासनतास प्रतीक्षा करावी लागते यावर प्रथम कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात याचा प्रत्यय वारंवार येतो.

The bodies also have to wait for the doctor to wait | येथे मृतदेहांनाही करावी लागते डॉक्टरची प्रतीक्षा

येथे मृतदेहांनाही करावी लागते डॉक्टरची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयाची व्यथा : शासन व प्रशासन निद्रावस्थेत

संतोष बुकावन।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : जीवित रुग्ण आपल्या आरोग्य तपासणीसाठी तासनतास डॉक्टरांची प्रतीक्षा करीत असल्याचे आपण अनेकदा अनुभवतो. मात्र मृतांनाही डॉक्टरांची तासनतास प्रतीक्षा करावी लागते यावर प्रथम कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात याचा प्रत्यय वारंवार येतो. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र अजूनही निद्रावस्थेतच आहे.
कुंभीटोलाच्या जायस्वाल डांबर प्लांटजवळ २४ जूनला एक अपघात घडला. ट्रक व दुचाकीच्या अपघातात जागीच दोघांचा मृत्यू झाला.अपघात एवढा भीषण होता की, यात डोक्याच्या कवटीचा चेंदामेंदा होऊन अक्षरश: मेंदू रस्त्यावर इतरत्र पसरला होता. हा अपघात रविवारी सायंकाळी ७.३० चे सुमारास घडला. दोन्ही मृतदेह स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात रात्री सुमारे ८ वाजताचे दरम्यान आणण्यात आले. नियमानुसार सुर्यास्त झाल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात येत नाही हे अगदी खरे आहे. मात्र सकाळी मृतांची उत्तरीय तपासणी होणे अपेक्षित होते. सकाळी तर सोडाच दुपारी १ वाजताच्या सुमारास उत्तरीय तपासणी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. मेश्राम यांनी केली.
एका मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती अशी चर्चा आहेत. तब्बल १७ तास मृतदेह शवागारात पडलेले होते. एकप्रकारे ही मृतदेहाची विटंबनाच आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार हे आहेत. ते रुग्णालयात हजरच राहत नसल्याचा अनेक तक्रारी आहेत. या रुग्णालयात डॉ. घरतकर हे वैद्यकीय अधिकारी आहेत. ते रजा घेऊन इतरत्र गेले होते. उत्तरीय तपासणी करण्यासाठी कुणीही डॉक्टर हजर नव्हते.
पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांच्याकडे काही लोक तक्रार घेऊन गेले. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांच्याशी संपर्क केला. ते ग्रामीण रुग्णालयात गेले असता कुणीही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. वैद्यकीय अधीक्षक अकिनवार हे हजर नसताना व दोन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी असतानाही त्यांनी डॉ. घरतकर यांची रजा मंजूर केलीच कशी?
डॉ. घरतकर हे मात्र डॉ. अकिनवार यांचेकडून रजा मंजूर करुन घेतल्यानंतरच बाहेरगावी गेले होते. सभापती शिवणकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाशी संपर्क केला. त्यांनी नवेगावबांधचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुल्हाने यांचेशी चर्चा करुन नवेगावबांधच्या डॉक्टरला उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. डॉ. गुल्हाने यांनी डॉ. कमलेश मेश्राम यांना उत्तरीय तपासणीसाठी जाण्यास सांगितले. मात्र त्यांना येथे येण्यास बराच विलंब झाला. विलंब होण्याचे नेमके औचित्य काय? याची चौकशी होणे गरजेचे आहे. सुमारे १ वाजता उत्तरीय तपासणी आटोपली व मृतदेह आप्तेष्टांच्या सुपुर्द करण्यात आले. तोपर्यंत तब्बल १७ तास उलटले होते.
मागील आठवड्यात येरंडी/देवी येथील थेर नामक युवकाने आत्महत्या केली होती.त्याचे प्रेत सुमारे दुपारी ४ वाजताचे सुमारास ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. कुटूंबीयांनी उत्तरीय तपासणीसाठी तीन तास प्रतिक्षा केली. मात्र उत्तरीय तपासणी झाली नव्हती.
त्या गावातील काही इसम सभापती अरविंद शिवणकर यांना भेटले. त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राउत यांना भ्रमणध्वनीवरुन कळविले. त्यांनी डॉक्टरांना ही माहिती दिली. मात्र कुणीच हजर नव्हते.
पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाला उत्तरीय तपासणी करावयाची असल्याचे पत्र दिले का? असा प्रश्न डॉ.अकिनवार यांनी केला असल्याचे सांगण्यात आले मात्र याला दुजोरा मिळाला नाही. शेवटी रात्री ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान डॉ. घरतकर यांनी उत्तरीय तपासणी केली.
रुग्णालयात एखादे प्रेत आणल्यानंतर तिथे उपस्थित असलेले आरोग्य कर्मचारी डॉक्टरांना त्याची माहिती कळवितात किंवा नाही असा प्रश्न सभापती शिवणकर यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
त्या डॉक्टरावर कारवाई करा
तालुक्याच्या अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध हे दोन ग्रामीण रुग्णालय येतात. अर्जुनीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार व नवेगावबांधचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. गुल्हाने हे तालुका विकास समिती व तालुका सनियंत्रण समितीच्या बैठकीस नियमित अनुपस्थित असतात. रुग्णालयात देखील नियमित अनुपस्थित असतात. त्यामुळे रुग्णांना वैद्यकीय सेवा नियमित मिळत नाही. अशा तक्रारी पदाधिकाऱ्यांकडे वारंवार केल्या जातात. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याचा ठराव स्थानिक पंचायत समितीच्या २२ जूनच्या सर्वसाधारण सभेत क्रं. १८/२ घेण्यात आला. याची तक्रार जिल्हाधिकारी, नागपूरचे आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सकाकडे करण्यात आली आहे.
 

Web Title: The bodies also have to wait for the doctor to wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.