नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:11 PM2018-12-05T17:11:12+5:302018-12-05T17:11:45+5:30

नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

Traffic plan for the convenience of tourists during Christmas Eve | नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

म्हापसा : नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 
नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त गोव्यात खास करुन कळंगुट किनारी भागात लाखोंच्या संख्येने दर वर्षी पर्यटक दाखल होत असतात. येणा-या पर्यटकातील बहुतेक पर्यटक हे देशी असल्याने स्वत:च्या वाहनातून येण्यावर भर देत असतात. त्यामुळे या दिवसात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होवून जाते. स्थानिकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाढत्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंगुट पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला कळंगुट पोलीस स्थानकातील वाहतूक निरीक्षक नारायण चिमुलकर, पंचायतीचे इतर पंचसदस्य व संबंधीत उपस्थित होते. 
सदरच्या बैठकीत नाताळ व नवीन वर्षासाठीचा वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मार्टीन्स तसेच चिमुलकर यांनी दिली. त्यानुसार कळंगुट परिसरात अनेक ठिकाणी पार्किंगच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. कळंगुटच्या नाक्यावर असलेल्या सेंट अ‍ॅलेक्स चर्चनंतर अवजड वाहनांना कळंगुट भागात प्रवेश दिला जाणार नाही. अनेक रस्ते एकेरी मार्ग करण्यात येणार आहेत तर रस्त्यावर वाहने पार्क केल्याने होणारी अडचण दूर करण्यासाठी पार्किंगवर बंदी लागू करण्यात येणार आहे. पंचायत क्षेत्रातील अनेक भागात तात्पूरती पार्किंगची सोय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली. 
पर्यटकांना घेवून येणा-या बसेसना सेंट अ‍ॅलेक्स चर्चजवळ पार्किंगचा तळ उभारुन देण्यात येणार असल्याची माहिती चिमुलकर यांनी दिली. तसेच मध्यम वाहनांना बागा परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत पार्किंगची सोय करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. काही रस्ते बंद करण्यात येणार असून बंद असलेल्या रस्त्यावरुन फक्त स्थानिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. 
नाताळ सणाला ब-याच दिवसांचा अवधी असला तरी पर्यटकांची गैरसोय होवू नये यासाठी पूर्व तयारी करण्याचा तो एक भाग असल्याचे चिमुलकर म्हणाले. बैठकीत घेतलेले निर्णय तसेच तयार करण्यात आलेला आराखडा अधिसूचित करण्यासाठी उत्तर गोवाच्या जिल्हाधिका-यांना पाठवण्यात येणार आहे. सदर आराखडा २० डिसेंबरनंतर अमंलात येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Traffic plan for the convenience of tourists during Christmas Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.