शांताराम नाईक यांची संसदेतील भाषणे पुस्तकरुपाने आणण्याचा निर्धार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 09:27 PM2018-12-19T21:27:08+5:302018-12-19T21:27:27+5:30

माजी खासदार दिवंगत शांताराम नाईक यांनी लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली भाषणे पुस्तक रुपात आणण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

Shantaram Naik is determined to bring his Parliament speeches in a book form | शांताराम नाईक यांची संसदेतील भाषणे पुस्तकरुपाने आणण्याचा निर्धार 

शांताराम नाईक यांची संसदेतील भाषणे पुस्तकरुपाने आणण्याचा निर्धार 

googlenewsNext

पणजी : माजी खासदार दिवंगत शांताराम नाईक यांनी लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली भाषणे पुस्तक रुपात आणण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. गेल्या ९ जून रोजी कालवश झालेले शांताराम यांच्या तैलचित्राचे अनावरण बुधवारी येथील काँग्रेस भवनात माजी केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एदुआर्द फालेरो यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी  शांताराम यांची पत्नी बीना तसेच पुत्र अर्चित, आमदार टोनी फर्नांडिस, आमदार फिलीप नेरी रोड्रिक्स, माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप तसेच इतर नेते उपस्थित होते.

शांताराम यांनी गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच कोकणीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख वक्त्यांनी केला. १९८७ साली राजीव गांधी पंतप्रधान असताना शांताराम यांनी गोव्याला घटक राज्य दर्जा मिळवण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि घटक राज्य मिळवून दिले. चोडणकर म्हणाले की, शांताराम यांना ‘हिरो आॅफ द झिरो अवर' म्हणून ओळखले जायचे. गोव्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक विषय त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मांडले. खासदार निधीतून कोकणी शाळांसाठी निधी मिळवून दिला. पणजीतील गीता बेकरीजवळ असलेल्या उद्यानासाठीही निधी दिला. अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या. परंतु अलीकडे या उद्यानाचे उदघाटन झाले त्यावेळी शांताराम यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्याचे साधे सौजन्य दाखवण्यात आले नाही. शांताराम यांचे कार्य उत्तुंग आहे. त्यांची पक्षनिष्ठा तसेच शिस्तीचे धडे सर्वांनाच मार्गदर्शक ठरतील. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी पत्नी बीना यांनीही प्रदेश समितीवर यावे आणि पक्षाच्या कार्यात सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार टोनी फर्नांडिस म्हणाले की, ‘शांताराम आज हयात असते तर गोव्याला खास दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी निश्चितच प्रयत्न केले असते. त्यांनी गोव्याला दिलेले योगदान कोणीही विसरू शकणार नाही.’ आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स म्हणाले की, ‘प्रत्येक कार्यकर्त्याने काँग्रेसची घटना वाचली पाहिजे, असा शांताराम यांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यांच्याकडूनच पक्षाची शिस्त तसेच तत्त्वांचे धडे घेतले. शांताराम यांनी नेहमीच गट समित्यांना प्राधान्य दिले. पक्ष तळागाळात नेण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत.’

रमाकांत खलप म्हणाले की, ‘शांताराम ही एक अशी व्यक्ती होती की त्यांनी पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही. नेहमीच इमानदार आणि प्रामाणिक राहिले. मगोपत असताना त्यांच्यावर अनेकदा आम्ही टीका केली परंतु त्यानी कधी कटुता बाळगली नाही. राजभाषेचा प्रश्न आला त्यावेळी त्यांनी खंबीरपणे भूमिका घेतली. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी मगोपची आणि पर्यायाने माझी मागणी होती. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी  मसुदाही तयार केला होता. परंतु हा विषय राजीव गांधी यांच्याकडे चर्चेला आला त्यावेळी त्यांनी कोकणीची बाजू ठामपणे मांडून मराठीचाही राजभाषा म्हणून वापर केला जाईल, अशा आशयाचा अंतर्भाव करुन घेतला. त्यावेळी त्यांनी दाखवलेली तत्परता वाखाणावी लागेल.’ शांताराम यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणांचा ग्रंथ यावा अशी सूचना खलप यांनी केली.

शांताराम हे गोव्यात चार वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले तसेच एकदा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत खासदार बनले. अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेससाठी निष्ठेने वावरले. त्यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस पदाधिकारी आल्तिन गोम्स, गुरुदास नाटेकर यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. शांताराम यांच्याबद्दल त्यांनी अनेक अनुभव कथन केले. यावेळी आल्तिन यांच्या भावना अनावर झाल्या. शांताराम यांची पत्नी बीना यांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांचेही यावेळी भाषण झाले. 

शांताराम यांचे पुत्र अर्चित युवा कॉंग्रेसचे पदाधिकारी असून याप्रसंगी त्यांनी पक्षाने आपल्या वडिलांचे स्मरण केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, उत्तर जिल्हाध्यक्ष विजय भिके तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shantaram Naik is determined to bring his Parliament speeches in a book form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा