म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांत राजकारण, गोव्याचे बरेच पाणी वळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 12:42 PM2018-01-30T12:42:27+5:302018-01-30T12:43:05+5:30

म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत

Politics over Mhadai river water | म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांत राजकारण, गोव्याचे बरेच पाणी वळवले

म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांत राजकारण, गोव्याचे बरेच पाणी वळवले

Next

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी गोवा व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि विविध पक्षांचे नेते, आमदार वगैरे सध्या जोरदार राजकारण खेळत आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जवळ पोहचल्यामुळे म्हादईप्रश्नी दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून उलटसुलट विधाने येऊ लागली आहेत. तथापि, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी गोवा सरकारने त्वरित सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करावी, अशी मागणी केली आहे. कर्नाटकने गोव्याकडे येणारे बरेच पाणी अगोदरच वळविल्याचा दावा लोबो यांनी केला आहे.

आपण रविवारी म्हादईच्या कळसा-भंडुरा प्रवाहाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यामुळे आपण बोलत आहे. गेली चार-पाच वर्षे कर्नाटकचे म्हादईच्या प्रवाहावर काम सुरू होते हे कळून येते. म्हादईच्या एका प्रवाहावर कर्नाटकने लोखंडी गेट बसवली आहे. ही गेट पाणी नियंत्रणासाठी आहे. म्हादईच्या प्रवाहावर फक्त स्लॅब तेवढा घालणो बाकी आहे. लोखंडी काम सगळे पूर्ण झाले आहे. काँक्रिट टाकण्यासाठी एक दिवस देखील नको. ते काम कर्नाटक कधीही करू शकते,असे लोबो म्हणाले. म्हादई पाणी तंटा लवादाचे कर्नाटक ऐकत नाही. कर्नाटकने म्हादईच्या प्रवाहांवर जे काय चालवले आहे, ते सगळे सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस सरकारने आणून द्यायला हवे. त्यासाठी त्वरित गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेणो योग्य ठरेल, असे लोबो म्हणाले.

विधानसभेच्या येत्या अधिवेशनात आपण म्हादईप्रश्नी ठराव सादर करणार आहे. प्रसंगी आपण स्वत: सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करू शकतो, असेही लोबो म्हणाले. सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही रविवारी कळसा-भंडुरा प्रवाहाला भेट देऊन आले आहेत. सभापतींनी आपण सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते म्हादईप्रश्नी विविध विधाने करून वातावरण तापवत आहेत, अशी माहिती मिळाली. आम्ही गोव्याशी चर्चा करण्यास अजुनही तयार आहोत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी म्हादईप्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कर्नाटकमधील भाजपच्या नेत्यांनी मात्र सिद्धरामय्या हे म्हादईप्रश्न सोडविण्यास गंभीर नाहीत अशी टीका केली आहे. आम्ही गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी कधीही बोलावू शकतो, असे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Politics over Mhadai river water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.