तेलंगणात केले, गोव्यातही करून दाखवीन; माणिकराव ठाकरेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 10:42 AM2023-12-25T10:42:38+5:302023-12-25T10:43:13+5:30

येत्या लोकसभा व २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात काँग्रेसची वाटचाल विजयाकडेच

Done in Telangana, will do it in Goa too; Statement of Manikrao Thackeray | तेलंगणात केले, गोव्यातही करून दाखवीन; माणिकराव ठाकरेंचे वक्तव्य

तेलंगणात केले, गोव्यातही करून दाखवीन; माणिकराव ठाकरेंचे वक्तव्य

- किशोर कुबल

पणजी : तेलंगणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ११९ पैकी ६४ आमदार निवडून आणून सत्ता मिळवली. गोव्यात काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस माणिकराव  ठाकरे तेलंगणामध्ये पक्षप्रभारी होते. आता गोव्यात नियुक्ती झाल्यानंतर तेलंगणात केले ते गोव्यातही करून दाखवणार, असा संकल्प त्यांनी सोडला आहे.

'लोकमत'च्या या प्रतिनिधीने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'येत्या लोकसभा व २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात विजयाकडेच वाटचाल करण्यासाठी आमची रणनीती असेल.'

ठाकरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्षही होत. 'लोकमत'ला  दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. गोव्यात प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर ते म्हणाले की ,'गोवा लहान राज्य असले तरी राजकीयदृष्ट्या नेहमीच सर्वांचे आकर्षण ठरले आहे. अशा या प्रदेशाच्या प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल मला आनंद वाटतो. तेलंगणामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी तेथेही प्रभारी होतो. काँग्रेसला तेथे चांगले यश मिळाले गोव्यातही सर्वांना सोबत घेऊन जाताना समन्वय साधून पक्षाला चांगले दिवस आणीन.'

प्रभारी म्हणून गोव्यात तुमचे प्राधान्य काय असेल? असा सवाल केला असता ठाकरे म्हणाले की, सर्वांना एकत्र आणून समन्वय साधण्यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे. पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन संघटनात्मकदृष्ट्या पक्ष मजबूत करीन.

सर्वांची मते जाणून घेतल्यानंतरच पुढील कृती ठरणार आहे.'

फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीनंतर पक्षाचे अकरा आमदार होते. त्यातील आठ फुटले आणि आता तीनच शिल्लक आहेत. गोव्यात पक्षावर अशी दारुण स्थिती काय यावी? असा प्रश्न केला असता ठाकरे म्हणाले की,' तेलंगणामध्ये ज्या ठिकाणी मी प्रभारी होते तेथेही अशीच परिस्थिती होती. २०१८ मध्ये के. चंद्रशेखर राव यांनी आमचे १२ आमदार फोडले व तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) अर्थात आताच्या भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये नेले. गेल्या जानेवारीत तेथे मी प्रभारीपद हाती घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्षांसह सर्वांनी एकी दाखवून लढा दिला आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला. एक साथ, एकजुटीने राहून काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. गोव्यातही विजयाच्या दिशेने आम्ही वाटचाल करणार आहोत आणि येथेही हे दिवस दूर नाहीत.' 

गोव्याच्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटते? येथील भाजप सरकारविषयी काही बोलायचं आहे का? पक्षवाढीसाठी गोव्याकडे तुम्ही कसे पाहता? असे विचारले असता ठाकरे म्हणाले की, ' आमिषे दाखवून विरोधी आमदारांना फोडण्याचे घाणेरडे राजकारण भाजप करीत आहे. गोव्यातही हा प्रयोग सत्ताधारी पक्षाने केला. त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्ते, नेते यांनी एकी दाखवणे आवश्यक आहे. विजयाकडे वाटचाल करता आली पाहिजे. आगामी लोकसभा तसेच २०२७ च्या निवडणुकीसाठी त्या दृष्टीने आमची रणनीती असणार आहे. गोव्यातील जनतेला काँग्रेस सत्तेवर आलेली हवी आहे.'

पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी करणार आहात? लोकसभा निवडणूक आता जवळ आहे. तुम्ही गोव्यात कधी येणार आहात? असा सवाल केला असता ठाकरे म्हणाले की, 'येत्या २८ रोजी काँग्रेसच्या स्थापनादिनी नागपुरात मोठी रॅली आहे. त्यानंतरच गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तसेच विधिमंडळ पक्षनेते व इतर नेत्यांकडे चर्चा करून मी गोव्यात येणार आहे. गोव्यात दोन ते तीन दिवस वास्तव्य करून सर्व घटकांशी मी चर्चा करीन आणि पक्ष मजबुतीसाठी काय करता येईल हे जाणून घेऊन त्या दृष्टीने पावले उचलीन.'

गोव्यात पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम पुढे का गेली नाही? प्रभारी लवकर का बदलावा लागला? असे विचारले असता ठाकरे म्हणाले की, 'पक्ष नोंदणी वगैरे सर्व गोष्टी गोव्यात येऊन पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करताना मी जाणून घेईन व त्यानुसार पुढील पावले उचलली जातील. सद्यस्थिती जाणून घेतल्याशिवाय या घडीला मी काही बोलू शकत नाही.'

गोव्यात काँग्रेसचे लोकसभा उमेदवार कधी ठरणार? समविचारी मित्रपक्षांसोबत काँग्रेस चर्चा करणार आहे का?  समविचारी विरोधी पक्षांशी निवडणूकपूर्व युती शक्य आहे का? असे विचारले असता ठाकरे म्हणाले की,'काँग्रेसमध्ये उमेदवारी देण्याच्या बाबतीत लोकशाही पद्धत आहे. इतर पक्षांमध्ये ती नाही. काँग्रेस पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीनुसारच उमेदवार ठरवणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते, नेते या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. समविचारी विरोधी पक्षांशी निवडणूक पूर्व युती किंवा अन्य प्रश्नावर सर्वांचे मते जाणून घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. या विषयावर आताच भाष्य करणे मला योग्य वाटत नाही.'

Web Title: Done in Telangana, will do it in Goa too; Statement of Manikrao Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.