लगाम परिसरात हजारो जनावरांना चौखुराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:57 PM2017-08-21T22:57:13+5:302017-08-21T22:57:46+5:30

तालुक्यातील लगाम परिसरात गेल्या दहा दिवसांपासून ‘चौखुरा’ आजाराची हजारो जनावरांना लागण झाली असून....

Thousands of animals have Chaukura infection in the Thimm area | लगाम परिसरात हजारो जनावरांना चौखुराची लागण

लगाम परिसरात हजारो जनावरांना चौखुराची लागण

Next
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : पशुवैद्यकीय दवाखाना नेहमीच बंद

मुकेश जांभुळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील लगाम परिसरात गेल्या दहा दिवसांपासून ‘चौखुरा’ आजाराची हजारो जनावरांना लागण झाली असून यावर प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी पशुधन विभागाकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने या भागातील पशुपालक व शेतकरीवर्ग गावठी उपचाराकडे वळला आहे.
लगाम येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना असून या दवाखान्याअंतर्गत १५ गावे येतात. यापैकी लगाम, लगाम चेक, गिताली, काकरगट्टा, मरपल्ली, मच्छीगट्टा, धनूर, नागुलवाही या गावातील गाय, बैल, शेळी, मेंढी आदी जनावरांना चौखुरा आजाराची लागण झाली आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या उपचाराअभावी मोहरीचे तेल, केरोसीनचा वापर पारंपरिक उपचारामध्ये पशुपालक करीत आहेत. पशुधन विभागाने लगाम येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची प्रशस्त इमारत बांधली. मात्र देशभालीअभावी या इमारतीची दुरवस्था झाली आहे. खिडक्यांचे सर्व काचे तुटलेली आहेत. लगाम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकाºयाची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांच्याकडे मुलचेरा पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) चा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ते लगामच्या पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे फिरकूनही पाहत नाही. लगामला कधी-कधी येऊन केवळ रजिस्टरवर भेट दिल्याचा उल्लेख करून परत जातात, अशी तक्रार आहे.
पशुधन पर्यवेक्षक डॉ. संजय नाटके हे मागील पाच वर्षांपासून लगाम येथे कार्यरत आहेत. मात्र त्यांचे सुद्धा अमावस्या-पौर्णिमेला शेतकरी व पशुपालकांना दर्शन होते. निवासस्थान असून सुद्धा ते बाहेर भाड्याच्या खोलीत वास्तव्यास राहतात. त्यामुळे पशुपालकांवर डॉक्टरांना शोधण्याची पाळी येते. ते नेहमीच गैरहजर असल्याची तक्रार असून याकडे वरिष्ठ अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे. लगाम येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचर सुद्धा नाही. त्यामुळे कृत्रिम रेतनासाठी संस्थेमार्फत नियुक्त केलेला ‘सेवादाता’ हाच पशुधन पर्यवेक्षकाचे काम करीत आहे. चौखुरा आजारावर एफएमडी नावाची लस प्रतिबंधात्मक म्हणून पावसाळ्यापूर्वी जनावरांना द्यायला पाहिजे होती. मात्र जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागाच्या नियोजनाअभावी या लसीचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे चौखुरा आजाराने जनावरांना हैराण केले आहे. परिणामी पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत. हजारो जनावरांना चौखुरा आजाराची लागण झाली असतानाही सुद्धा पशुधन विभागाने एकाही गावात तपासणी शिबिर लावले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिंगनपेठ येथे चार वर्षांपासून जनावरांना लसीकरण नाही
कोठारी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया सिंगनपेठ येथील जनावरांना गेल्या चार वर्षांपासून लसीकरण न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहेरी तालुक्यातील बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ अंतर्गत सदर गाव येते. मागील एक वर्षापासून येथे पशुधन कार्यवेक्षक नसल्याची माहिती आहे. बोरीपासून १० किमी अंतरावर सिंगनपेठ गाव असून यापूर्वीच्या पशुधन पर्यवेक्षकाने सुद्धा या गावात भेटी दिल्या नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. एकूणच मुलचेरा व अहेरी तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे.

जनावरांना चौखुरा आजाराची लागण झाल्याबाबत मला माहिती नाही. मी १४ आॅगस्टला मुलचेरा येथे १५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर आलो. यासंदर्भात मला संबंधित पशुधन पर्यवेक्षकांनी कुठलीही माहिती दिली नाही.
- डॉ. सुरेश राठोड, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पं. स. मुलचेरा

Web Title: Thousands of animals have Chaukura infection in the Thimm area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.