कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:52 PM2018-02-24T23:52:17+5:302018-02-24T23:52:17+5:30

अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या हत्ती कॅम्पमधील लहान-मोठे सात हत्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली ....

The number of tourists increased at Kamalapur Elephant Camp | कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली

कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानांतराच्या हालचाली मंदावल्या : पालकमंत्र्यांच्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना सूचना

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या हत्ती कॅम्पमधील लहान-मोठे सात हत्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी हत्ती कॅम्पला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असल्याचे कमलापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी लांडगे यांनी सांगितले. दरम्यान येथील सर्व हत्ती नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पात हलवू नये, अशी सूचना पालकमंत्री तथा वन राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना केली. त्यामुळे हत्ती हलविण्याच्या हालचाली मंदावल्या आहेत.
तब्बल ५५ वर्षांपासून कमलापूरला असलेल्या हत्तींचे पेंच प्रकल्पात स्थानांतर करण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी काढला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर जनसामन्यांत असंतोष वाढला होता. लोकमतने याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना हत्ती कॅम्प न हलविण्यामागील कारणे सांगितली पर्यटनाच्या दृष्टीने या जिल्ह्याची ती गरज कशी आहे आणि त्याच्याशी जनभावना कशा जुळल्या आहेत हेसुद्धा त्यांना समजावून सांगितले. त्यामुळे सातपैकी काही हत्ती प्रशिक्षणासाठी पेंचमध्ये नेण्यावर सहमती झाली. हत्तींना योग्य प्रशिक्षण दिले नाही तर ते एखाद्या वेळी उधळून पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे कारण वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र नेमके किती हत्ती पेंचमध्ये नेणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. हत्तींना प्रशिक्षित करून पुन्हा कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये आणावे अशी मागणी कमलापूर व जिल्हाभरातील नागरिकांची मागणी आहे.
वाहनांची सोय करणे गरजेचे
कमलापूरच्या हत्ती कॅम्पची माहिती अगदी अलिकडे लोकांना समजत आहे. त्यामुळे येथील हत्ती कॅम्पचे आकर्षण वन्यजीवप्रेमी व पर्यटकांना आहे. मात्र हत्ती कॅम्पला पोहोचण्यासाठी थोडी कसरत करावी लागते. आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर रेपनपल्लीपर्यंत खासगी वाहनासह एसटी बसनेही पोहोचता येते. मात्र तेथून ९ किलोमीटर आत जाण्यासाठी एसटी बस नाही. तिथे खासगी वाहनानेच जावे लागते. रेपनपल्लीवरून स्पेशल आॅटोरिक्षाही करता येतो. तिथे उपलब्ध न झाल्यास ३ किलोमीटरवर असलेल्या कमलापूरला आॅटोने जाऊन तेथून हत्ती कॅम्पसाठी दुसरा आॅटो करावा लागतो. पुढे पर्यटकांचा ओघ वाढल्यास रेपनपल्लीवरून थेट हत्ती कॅम्पला जाण्यासाठी विशेष वाहनाची सोय करावी लागणार आहे.
८० वर्षाची हत्तीण
१९६२ साली कमलापूरला पहिली हत्तीण आणण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षांनी आलापल्लीवरून एक हत्ती आणला. आता त्यांचे कुटुंब चांगले विस्तारून ७ जणांचे झाले आहे. या कुटुंबातील पहिली हत्तीण आता जवळपास ८० वर्षांची झाली आहे. या वयोवृद्ध हत्तीणीपासून तर दिड वर्षाच्या छोट्या हत्तीपर्यंत सर्व वयोगटाचे हत्ती कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये पहायला मिळतात.

Web Title: The number of tourists increased at Kamalapur Elephant Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.