कोनसरी लोहप्रकल्प ठरणार जिल्ह्यासाठी ‘गेम चेंजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 11:17 PM2022-10-01T23:17:34+5:302022-10-01T23:19:03+5:30

प्रस्तावित मेडिकल कॉलेज व विद्यापीठासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने होण्यासाठी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले. ना.फडणवीस म्हणाले, गडचिरोलीतील प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोनसरीचा प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेली जागा मिळवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Konsari iron project will be a 'game changer' for the district | कोनसरी लोहप्रकल्प ठरणार जिल्ह्यासाठी ‘गेम चेंजर’

कोनसरी लोहप्रकल्प ठरणार जिल्ह्यासाठी ‘गेम चेंजर’

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी कोनसरीचा लोहप्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरेल. या प्रकल्पात १८ हजार कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या कामातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सरकारकडून मदत केली जाईल, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर ना. फडणवीस यांचा हा पहिलाच गडचिरोली दौरा होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.अभिजित वंजारी, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी सन २०२०-२१ आणि सन २०२१-२२ मधील झालेल्या कामांचा व खर्चाचा आढावा घेण्यात आला. तसेच २०२२-२३ मध्ये प्रस्तावित कामांची माहिती घेतली. प्रस्तावित मेडिकल कॉलेज व विद्यापीठासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने होण्यासाठी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले. ना.फडणवीस म्हणाले, गडचिरोलीतील प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोनसरीचा प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेली जागा मिळवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पहिला टप्पा एप्रिल २०२३ पर्यंत कार्यान्वित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  
प्रास्ताविक व जिल्हा वार्षिक योजनेची माहिती जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सादर केली. आभार जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके यांनी मानले.

मेडीगड्डाबाधित शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार विकत घेणार

मेडीगट्टा धरणालगत पाण्यात जाणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत. सानुग्रह अनुदानाबाबतही एक विशेष पॅकेज तयार करण्याच्या सूचना दिल्या. नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना दीडपट वेतनाचा शासन निर्णयही सोमवारी निघेल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

मार्कंडा देवस्थान मंदिराचा प्रलंबित प्रश्न महिनाभरात मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. भारत नेटमधून विस्तारलेल्या फायबर जोडणीतून शाळा व इतर शासकीय कार्यालये जोडण्यासाठी योजना राबविण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. 

राज्य सरकार गडचिरोलीच्या पाठीशी 

सूरजागड लोहप्रकल्पातील लोहदगडांच्या वाहतुकीमुळे अपघात झाल्यास नागरिकांचा रोष निर्माण होतो. हे सर्व टाळण्यासाठी मायनिंग कॉरिडॉर तयार करण्याचे सुतोवाच ना. फडणवीस यांनी केले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळणे शक्य होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांना येथील स्थितीबद्दल माहीत आहे. आता मी पालकमंत्री आहे. त्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्राचे सरकार गडचिरोली जिल्ह्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सोलर फीडर योजनेतून अखंडित वीजपुरवठा 
-    सोलर सयंत्र बसवून कृषी फिडर लोडशेडींगमुक्त करण्यासाठी योजना येणार आहे. यात काही शेतजमीन लागणार असून ही जमीन भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी पीक उत्पादनापेक्षा जास्त रक्कम भाडे स्वरूपात शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. या सौर योजनेत सहभाग घेऊन अखंडित वीजपुरवठा मिळवा, असे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.

 

Web Title: Konsari iron project will be a 'game changer' for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.