आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:46 PM2019-01-29T23:46:21+5:302019-01-29T23:49:21+5:30

गडचिरोली येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून काही विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकावेत, अशी आपली अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षक, शिक्षक यांनी प्रयत्न करावेत. खेळ खेळताना विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती आणि शिस्तीचे पालन करावे, ......

International players should be created | आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत

आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत

Next
ठळक मुद्देआदिवासी आयुक्तांचे प्रतिपादन : आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा थाटात शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतून काही विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकावेत, अशी आपली अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रशिक्षक, शिक्षक यांनी प्रयत्न करावेत. खेळ खेळताना विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्ती आणि शिस्तीचे पालन करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.
आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन जिल्हा प्रेक्षागार मैदानावर मंगळवारी झाले. त्याप्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विभागाचे अपर आयुक्त प्रदीप चंद्रन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक, नगराध्यक्ष योगीता पिपरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, अहेरीच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड यांच्यासह विदर्भातील ठिकठिकाणचे प्रकल्प अधिकारी तसेच गडचिरोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जि.प. सभापती नाना नाकाडे, जि.प. सदस्य लता पुंगाटे, सहायक प्रकल्प अधिकारी के. के. गांगुर्डे, विकास राचेलवार, नगरसेवक प्रमोद पिपरे, तहसीलदार दयाराम भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना योगिता भांडेकर म्हणाल्या, मागील वर्षी याच मैदानावर अत्यंत उत्कृष्टरित्या विभागीय क्रीडा स्पर्धा गडचिरोली प्रकल्पाने घेतल्या. त्यामुळे यावर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मान गडचिरोली जिल्ह्याला मिळाल्याचे सांगून सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी केले. संचालन अनिल सोमनकर यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर, आर. के. लाडे, आर. एम.पत्रे, वंदना महल्ले, कार्यालय अधीक्षक डी. के. टिंगुसले, रामेश्वर निंबोळकर, विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, प्रभू साधमवार, सुधीर शेंडे, मदन टापरे, सुधाकर गौरकर, प्रमोद वरगंटीवार, चंदा कोरचा, निर्मला हेडो, प्रिती खंडाते, लुमेशा सोनेवाणे, प्रतिमा बानाईत, शारदा पेदापल्ली, संतोषी खेवले व नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मागील वर्षी विभागीयस्तरावरील क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्तमरितीने पार पडल्याने यावर्षी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला झुकते माप देत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी देण्यात आली. प्रकल्प कार्यालयानेही कोणतीही कसर न सोडता विद्यार्थी, प्रशिक्षक यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पाच एकरावर असलेल्या प्रशस्त मैदानावर क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.

मैदानावर एकाचवेळी विविध खेळ
विविध सांघिक खेळांसाठी स्वतंत्र मैदान तयार करण्यात आले आहे. त्यामुळे एकाचवेळी चारही खेळ खेळाल्या जात आहेत. प्रत्येक खेळाचे व्हिडीओ शुटींग केले जात आहे. एखाद्या वेळेस आक्षेपाची स्थिती निर्माण झाल्यास व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून योग्य तो निर्णय देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ड्रोन कॅमेºयाने केलेले चित्रीकरण पाहण्यासाठी मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आला आहे.
मैदानावर दोन रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन ठेवण्यात आले आहे. गडचिरोली शहरातील विविध मंगल कार्यालये आणि वसतिगृहांमध्ये राज्यभरातून आलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस दिवसभर उपलब्ध आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी मान्यवरांना रिझविले
उद्घाटन समारंभाप्रसंगी सर्वप्रथम नाशिक, ठाणे, अमरावती तथा नागपूर या चारही विभागातील १ हजार ७५७ खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर महाराष्ट्र व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा देखावा सादर करण्यात आला. वनसंपदा, आदिवासी बांबू नृत्य, लेझीम, वासुदेव कला, शिवाजी महाराज पोवाडा, पंढरीची वारी, गोंधळ, भारुड, भांगडा, कोळी नृत्य, भजन, कीर्तन आदी देखावे व कलाकृतीद्वारे नागपूर विभागातील आदिवासी मुला-मुलींनी उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंना नेहा हलामी या खेळाडू विद्यार्थिनीने शपथ दिली. १९ वर्षीय मुलांचा कबड्डीचा उद्घाटपर सामना नाशिक व अमरावती विभागात रंगला. यात नाशिक विभागाने बाजी मारली. मुक्तीपथ अभियानाद्वारे खेळाडूंना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

Web Title: International players should be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.