पालकमंत्री साहेब जिल्ह्यात या, नाही तर राजीनामा द्या! काँग्रेसचे आंदोलन

By संजय तिपाले | Published: November 9, 2023 05:01 PM2023-11-09T17:01:00+5:302023-11-09T17:01:29+5:30

घोषणांनी चौक परिसर गेला दणाणून

Guardian Minister come to the district, or resign! Congress movement | पालकमंत्री साहेब जिल्ह्यात या, नाही तर राजीनामा द्या! काँग्रेसचे आंदोलन

पालकमंत्री साहेब जिल्ह्यात या, नाही तर राजीनामा द्या! काँग्रेसचे आंदोलन

गडचिरोली : पालकमंत्री साहेब जिल्ह्यात या , नाही तर राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी करुन काँग्रेसने उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात येथे ९ नोव्हेंबरला डपरे बजाओ आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मागास, दुर्गम गडचिरोलीत उद्योगांअभावी बेरोजगारीचा प्रश्न आहे. अनेक गावांत पायाभूत सुविधा नाहीत. मात्र, जिल्ह्याचे पालकत्व घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली. कृषीपंपाला नियमित वीज पुरवठा मिळत नाही, रानटी हत्ती आणि वाघाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी वैतागले आहेत. मात्र, पालकमंत्री फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांपासून आढावा तर दूरच, पण जिल्ह्याचा दौराही केलेला नाही, असा आरोप ब्राम्हणवाडे यांनी केला. गडचिरोलीला या नाही तर राजीनामा द्या, अशी मागणी करुन काँग्रेसचे इंदिरा गांधी चौकात डफरे बजाव आंदोलन केले.

प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, जि.प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, जीवन नाट, शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, वसंत राऊत, मिलंद खोब्रागडे, दिवाकर निसार, वामनराव सावसाकडे, रुपेश टिकले, दत्तात्रय खरवडे, भारत येरमे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, भैय्याजी कत्रौजवार, बंडोपंत चिटमलवार, गिरीधर तीतराम आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरु

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. काही अधिकारी स्वत: जिल्ह्याचे मालक असल्याच्या अविर्भावात आहेत. लोकप्रतिनिधींनाही ते जुमानत नाहीत, सामान्यांना नीट बोलत नाहीत. त्यांच्यावर पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Guardian Minister come to the district, or resign! Congress movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.