विकासकामांची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:12 AM2019-05-27T00:12:24+5:302019-05-27T00:12:54+5:30

आरमोरी तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या तिनही कार्यालयातील प्रत्येकी एका अभियंत्यावर तालुक्याच्या विकासकामाच्या नियोजनाचा भार आहे.

Development work slowed down | विकासकामांची गती मंदावली

विकासकामांची गती मंदावली

Next
ठळक मुद्देनरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही : पंचायत समिती, बांधकाम विभागात एकच अभियंता

महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. या तिनही कार्यालयातील प्रत्येकी एका अभियंत्यावर तालुक्याच्या विकासकामाच्या नियोजनाचा भार आहे. एमआरईजीएससाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने या कामातही भार अभियंत्यांना सांभाळावा लागत आहे.
आरमोरी तालुक्यात जि.प.बांधकाम उपविभागात शाखा अभियंत्यांची तीन पदे मंजूर आहेत. मात्र दोन पदे रिक्त असल्याने गेल्या दोन वर्षांपासून एकाच अभियंत्यावर तालुक्यातील कामाचा भार पडत आहे. शासनाच्या ३०५४, ५०५४, खासदार व आमदार निधी, जिल्हा निधी, केंद्रीय दलित वस्ती सुधार योजना, आठ आरोग्य, १२ पशुधन या सर्व योजनेअंतर्गत विकास कामे सांभाळावा लागत आहे. शिवाय एमआरईजीएसचा अतिरिक्त भारही डोक्यावर पडलेला आहे. त्यामुळे जि.प.च्या एकाच अभियंत्याला कामाचे नियोजन सांभाळण्यापासून त्याची अमलबजावणी व काम पूर्णत्वास नेण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडावी लागत असल्याने मोठी कसरत करावी लागत आहे.
येथे दोन वर्षांपासून पद रिक्त असूनही नवीन अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विकास कामे प्रभावित होत आहेत. अशीच काहीशी स्थिती आरमोरी पंचायत समितीची आहे. पंचायत समिती हे जि.प.च्या योजना राबविण्याचे केंद्रबिंदू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ग्रा.पं.च्या माध्यमातून राबविण्यात येतात. आरमोरी पंचायत समितीमध्ये शाखा अभियंत्यांची दोन पदे मंजूर आहेत. परंतु गेल्या दीड वर्षांहून अधिक कालावधीपासून एकाच अभियंत्यावर कामाचा भार होता. दोन महिन्यांपूर्वी एका अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या कामात हयगय केल्याच्या कारणावरून एका अभियंत्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे नवीन आलेल्या एकमेव अभियंत्यावर कामाचा भार येऊन पडला आहे. अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने ग्रा.पं.च्या विकास कामांवर परिणाम होत आहे.

एकाच अभियंत्यावर उपविभागातील कामाचा भार
येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात अभियंत्यांची चार पदे रिक्त आहेत. सहायक अभियंता श्रेणी १ चे पद सोडले तर येथे एकाच शाखा अभियंत्यावर उपविभागातील कामाचा भार पडला आहे. कामाचे प्रत्यक्ष लोकेशन बघून कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक मान्यता मिळालेल्या कामावर नियंत्रण ठेवणे, मोजमाप पुस्तिका तयार करणे, बिल बनविणे व इतर सर्व कामे शाखा अभियंत्याला करावी लागत आहे. एका अभियंत्यावर कामाचा भार आल्याने कामाची गती मंदावली आहे.

Web Title: Development work slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.