कोरचीच्या जांभळाला नागपुरात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:54 PM2019-06-26T22:54:33+5:302019-06-26T22:54:50+5:30

गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून या जंगलात तसेच शेतशिवार व रस्त्याच्या आजुबाजूला जांभळाची अनेक झाडे आहेत. या झाडांचे जांभूळ आता निघत आहेत. कोरचीचे जांभूळ स्वादिष्ट असून ते विदर्भात प्रसिद्ध आहे. या जांभळाला नागपुरात मोठी मागणी असून कोरची येथून वाहनाद्वारे जांभूळ नागपूरला पोहोचत आहे.

Demand for Kanchi purple in Nagpur | कोरचीच्या जांभळाला नागपुरात मागणी

कोरचीच्या जांभळाला नागपुरात मागणी

Next
ठळक मुद्देसंकलनातून अनेकांना मिळतोय रोजगार : गडचिरोलीत १०० रुपये तर नागपुरात २०० रुपये किलोने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून या जंगलात तसेच शेतशिवार व रस्त्याच्या आजुबाजूला जांभळाची अनेक झाडे आहेत. या झाडांचे जांभूळ आता निघत आहेत. कोरचीचे जांभूळ स्वादिष्ट असून ते विदर्भात प्रसिद्ध आहे. या जांभळाला नागपुरात मोठी मागणी असून कोरची येथून वाहनाद्वारे जांभूळ नागपूरला पोहोचत आहे.
कोरचीमध्ये जांभूळ २५ ते ३० रुपये किलो तर गडचिरोलीत १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. नागपूरमध्ये किलोमागे २०० रुपये मोजावे लागत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जांभूळ शेतीबाबत दरवर्षी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. गतवर्षी गडचिरोली येथे जांभूळ महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात अनेक शेतकरी व नागरिकांनी हजेरी लावली होती. सदर महोत्सवात कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी तज्ज्ञांनी जांभळाचे महत्त्व पटवून दिले होते.
कोरची, कुरखेडा, आरमोरी तालुक्यात अहेरी उपविभागतही जांभळाचे अनेक झाडे आहेत. गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासी नागरिक विविध प्रकारच्या रानमेवा संकलित करून त्यावर उपजीविका करतात. ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक नागरिक सकाळच्या सुमारास जंगल परिसरात जाऊन जांभूळ व इतर प्रकारचे रानमेवा तसेच रानभाज्या संकलित करीत आहेत. आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली येथील बाजारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आणल्या जात आहेत. या रानभाज्याला नागरिकांकडून मोठी मागणी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील गावांच्या सभोवताल जंगल आहे. या जंगलात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात. तसेच काही झाडांच्या फुलांची भाजी केली जाते. बाजारात हळदफरी, पातूर, कळू भाजी, बहाव्याचा फूल, घोर, वराकल्या आदी रानभाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. सदर भाज्या खरेदी करण्यास शहरातील नागरिकांना प्रतिष्ठा आड येत होती. रानभाज्या वर्षातून एकदाच येतात. प्रत्येक रानभाजीचे स्वतंत्र चव आहे. विशेष म्हणजे, कोणतीही कीटकनाशकाची फवारणी नसल्याने या रानभाज्यांमध्ये पोषकतत्व आढळतात.
आरोग्यासाठी जांभूळ लाभदायक, मधुमेहावर गुणकारी
जांभूळ हा मूलत: दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबूल कुळातील सदाहरीत, सपुष्प वृक्ष आहे. जांभळाच्या झाडाला उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची फळे येतात. ही फळे गोड-तुरट चवीची असतात. आकारामानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. जांभळाला सायझिजियम क्युमिनी असे शास्त्रीय नाव आहे. जांभूळ मधुमेह रोगावर गुणकारी आहे. जांभूळ रसाच्या तसेच बीच्या भूकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहार औषध आहे. जांभूूळ रक्त शुद्ध करते. चेहºयावरचे मुरूम व पुटकुळ्या जांभळाच्या बिया उगारून लेप लावल्यास नष्ट होतात. जांभूळ हे पाचक आहे, असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. रामायण व पौराणिक ग्रंथामध्येही जांभळाचे महत्त्व विशद केले आहे. एकूणच जांभूळ हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

Web Title: Demand for Kanchi purple in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.