२५ मंडळांकडे अधिकृत वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:39 PM2017-08-26T23:39:28+5:302017-08-26T23:40:37+5:30

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी चोरीची वीज न घेता रितसर अर्ज करून अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी,

25 power stations authorized | २५ मंडळांकडे अधिकृत वीज

२५ मंडळांकडे अधिकृत वीज

Next
ठळक मुद्देकारवाईचे संकेत : ६८१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महावितरणच्या वीज जोडणीकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी चोरीची वीज न घेता रितसर अर्ज करून अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, यासाठी महावितरणच्या वतीने गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी वीज दर आकारण्यात आले आहे. याशिवाय अशा प्रकारची वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वतीने जनजागृती करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील एकूण ७०६ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ २५ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. उर्वरित ६८१ मंडळांनी वीज जोडणीकडे पाठ फिरविली आहे.
२५ आॅगस्ट शुक्रवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. त्यापूर्वीच महावितरणच्या वतीने सार्वजनिक मंडळांनी सवलतीच्या दरात अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या बाबतची सूचना शांतता समितीच्या बैठकीत देण्यात आली. मात्र महावितरणच्या अधिकृत वीज जोडणीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा एकूण ७०६ सार्वजनिक गणेश मूर्तींची मंडळांतर्फे प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यामध्ये ५४५ सार्वजनिक व १६१ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. एकूण ७०६ सार्वजनिक मंडळांपैकी केवळ २५ मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे. यामध्ये गडचिरोली उपविभागातील सहा व आलापल्ली उपविभागातील १९ सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. उर्वरित ६८१ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणीकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. गणेशोत्सवासोबतच गणेश विसर्जनाच्या काळात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. अधिकृत वीज जोडणी घेतली नसल्याने जीवित व वित्त हानीचा धोका नाकारता येत नाही. महावितरणच्या पथकातर्फे चोरीची वीज वापरणाºया मंडळावर कारवाई करण्यात येणार आहे. आता महावितरणचे पथक शहरी भागात वीज पुरवठ्याची चौकशी करणार आहेत.

मंडळावर कारवाई होणार काय?
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांनी चोरीची वीज न वापरता अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेऊन सुरक्षितरित्या विद्युतीकरण करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली नाही. याबाबतची चौकशी करण्यासाठी महावितरणच्या वतीने स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले आहे. सदर पथक आता गावागावात जाऊन चौकशी करणार आहे. मंडळावर कारवाई होते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

असा आहे वीज दर
गणेशोत्सवासाठी अधिकृत वीज जोडणी घेणाºया सार्वजनिक मंडळांना ४ रूपये ३१ पैसे प्रती युनिट अस्थिर आकार असा दर ठेवण्यात आला आहे. उत्सव मंडळांना प्रती जोडणी प्रतीमाह ३३० रूपये स्थिर आकार आकारण्यात येणार आहे.

ब्रह्मपुरी उपविभागात नऊ कनेक्शन
गडचिरोली जिल्ह्याच्या वीज विभागामध्ये गडचिरोली, आलापल्ली, ब्रह्मपुरी या तीन उपविभागाचा समावेश आहे. ब्रह्मपुरी उपविभागात एकूण नऊ गणेश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेतले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घ्यावी, यासाठी वाहन फिरवून ध्वनीक्षेपकाद्वारे जिल्हाभरात जनजागृती करण्यात आली होती. मात्र अधिकृत वीज जोडणीसाठी सार्वजनिक गणेश मंडळाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आलापल्ली, ब्रह्मपुरी, गडचिरोली उपविभाग मिळून एकूण ३४ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी गणेशोत्सवासाठी घेतली आहे. वीज तारांवर आकडे टाकून वीज घेणाºया संबंधित मंडळाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मंडळांनी उत्सवासाठी एखाद्या घरातून वीज पुरवठा घेतला असल्यास अशा घर मालकाकडून महावितरणतर्फे अतिरिक्त दंड वसूल केला जाणार आहे. त्यापूर्वी संबंधित घरगुती वीज ग्राहकांना नोटीस पाठविण्यात येईल.
- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता
महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी गडचिरोली

Web Title: 25 power stations authorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.