२००० ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:12 AM2018-07-21T00:12:54+5:302018-07-21T00:14:26+5:30

मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.

2000 subscribers waiting for electricity meter | २००० ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

२००० ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देनागरिकांनी भरले डिमांड : दोन महिन्यांपासून अर्ज पडून

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही.
वाढत चालल्या घरांच्या संख्येबरोबरच वीज जोडणीची मागणी सुध्दा वाढत चालली आहे. काही नागरिक घर बांधकामापूर्वीच वीज जोडणीसाठी अर्ज करतात. तर काही नागरिक घराचे बांधकाम झाल्यानंतर अर्ज करतात. मात्र महावितरणकडे अपवाद वगळता नेहमीच वीज मीटरचा तुटवडा राहतो. वर्षभरापूर्वी मागणी एवढे मीटर प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन महावितरणच्या वतीने देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन अल्पावधीतच फोल ठरले आहे. दोन महिन्यांपासून अर्ज करूनही वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ग्राहक महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज मीटरबाबत विचारणा करीत आहेत. आठ दिवसात मीटर उपलब्ध होतील, असे आश्वासन महावितरणच्या अभियंत्यांकडून दिले जात आहे. पुढचे आठ दिवस म्हणत आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र मीटरचा पत्ता नाही. काही नागरिकांनी नवीन घरात राहण्यास सुरूवात केली. मात्र वीज जोडणी झाली नसल्याने आता या नागरिकांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मागणी एवढे वीज मीटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. शेतकऱ्यांचेही अनेक अर्ज महावितरणकडे प्रलंबित आहेत.
ग्राम स्वराज्य योजनेचा सामान्य वीज ग्राहकांना फटका
गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून ग्राम स्वराज्य अभियान टप्पा २ राबविला जात आहे. या अभियानात वीज विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी ५४ गावांची निवड करण्यात आली आहे. या ५४ गावातील ज्या नागरिकांच्या घरी वीज पुरवठा झाला नाही. त्यांना ३१ जुलैच्या आत कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे महावितरणने सर्वसामान्य ग्राहकांना वीज मीटर देणे बंद करून उपलब्ध असलेले मीटर ग्रामस्वराज्य अभियानात निवडलेल्या लाभार्थ्यांना लावले जात आहेत. सदर काम अतिशय गतीने सुरू आहे. १ जून ते १८ जुलै या कालावधीत सुमारे ८९६ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ५१, देसाईगंज ३३, कुरखेडा ८९, कोरची ५८, चामोर्शी ४६, एटापल्ली ९०, भामरागड १८२ आलापल्ली १७६, सिरोंचा तालुक्यात १७१ वीज जोडण्या दिल्या आहेत.

ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत वंचित घरांना वीज पुरवठा देण्याचे काम सुरू आहे. महावितरणकडे उपलब्ध मीटर या योजनेंतर्गत लावले जात आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मीटर मिळण्यास विलंब होत आहे. लवकरच पुरेसे मीटर उपलब्ध होतील व सामान्य ग्राहकांनाही वीज मीटर मिळतील.
- अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता,
महावितरण गडचिरोली

Web Title: 2000 subscribers waiting for electricity meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज