FIFA Football World Cup 2018 : लॅटिन अमेरिकन फुटबॉलला मिळाली लाईफलाईन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 04:10 AM2018-06-24T04:10:23+5:302018-06-24T04:10:51+5:30

अर्जेंटिना आणि ब्राझील तसे अडचणीतच. त्यात अर्जेंटिनासमोर ‘करो वा मरो’ एवढाच पर्याय कायम आहे. ब्राझीलसमोरही आव्हान तसे कमी खडतर असले, तरी त्यांना विजय आवश्यकच आहे

Latin American Football Lifestyle! | FIFA Football World Cup 2018 : लॅटिन अमेरिकन फुटबॉलला मिळाली लाईफलाईन!

FIFA Football World Cup 2018 : लॅटिन अमेरिकन फुटबॉलला मिळाली लाईफलाईन!

Next

रणजीत दळवी
अर्जेंटिना आणि ब्राझील तसे अडचणीतच. त्यात अर्जेंटिनासमोर ‘करो वा मरो’ एवढाच पर्याय कायम आहे. ब्राझीलसमोरही आव्हान तसे कमी खडतर असले, तरी त्यांना विजय आवश्यकच आहे. ते त्यांना शक्य व्हावे, कारण त्यांनी ‘इंजुरी टाइममध्ये’ का होईना, विजय मिळवून आपला आत्मविश्वास निश्चितपणे पुन्हा प्राप्त केला आहे. हे दोन्ही संघ गत विश्वविजेते. त्यांचा खेळ सर्वांनाच भुरळ घालणारा, म्हणून हवाहवासा वाटणारा. त्यांनी पहिल्या टप्प्यावरच ‘एक्झिट’ घेतली तर स्पर्धेत उरले काय?
मात्र, तूर्तास ही बला टळली! एकीकडे नायजेरियाने आपले आव्हान जिवंत ठेवताना आइसलँडचा बर्फ वितळतो हे दाखवून दिले. अहमद मुसाचे ते दोन गोल आइसलँडचा बचाव भेदला जाऊ शकतो, हे खासकरून अर्जेंटिनाला दाखविताना तो तशाच प्रकारे तुुमचाही खोलू हेही बजावले. अहमद मुसाकडे त्याची चावी असेल, हेही समजले. त्याने आइसलँडला दोन धक्के दिले. त्यांपेकी त्याचा दुसरा गोल हा आफ्रिकन फुटबॉलपटूंना निसर्गाने दिलेल्या दैवी देणगीचा नमुना होता. किती सहजपणे त्याने ती वेगवान मुसंडी मारली! दोन बचावपटूंना त्याने किती बेमालूमपणे चकविले व शांत डोक्याने चेंडू गोलामध्ये लाथाडला! नैसर्गिक क्षमतेचे आणि उपजत कौशल्याचे ते उत्तम प्रदर्शन! त्यांचा हाच फॉर्म टिकला, तर त्यांचा शेवटच्या सोळांतील प्रवेश संभव आहे.
याचाच अर्थ, अर्जेंटिनाला आपली सर्व शक्ती पणाला लावताना युक्तीचा वापर करावा लागेल. पण, त्यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता, या गोष्टींची त्यांच्याकडे वानवा असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा नायजेरियाने दिलेल्या ‘लाईफलाईन’चा फास त्यांच्याच गळ्याभोवती आवळणे अर्जेंटिनाला शक्य होईल. समजा, आइसलँडने क्रोएशियाला हरविले तर..? म्हणून प्राप्त परिस्थितीत सलग दोन विजय मिळवून नायजेरिया पुुढे जाण्याची शक्यताच अधिक. आपण काय चीज आहोत, खरे चॅम्पियन की कसे, हे आता मेस्सीने सिद्ध करायचे आहे. त्याने ते साध्य केले, तर त्याला सलाम! आम्ही अर्जेंटिनाला हरवू शकणार नाही, असे नायजेरियन चाहते व त्यांच्या देशातील जाणकार म्हणत आहेत. पण, त्यांचे खेळाडू थोडेच त्या भावनेने मैदानात उतरतील? गलितगात्र अर्जेंटिनाला लोळवू, असा आत्मविश्वास कालच्या विजयाने त्यांच्यात निर्माण केला आहे. आफ्रिकन फुटबॉलचा गौरव होण्यासारखा ऐतिहासिक क्षण समीप असल्याची चाहूल त्यांना केव्हाच लागली आहे. ब्राझीलला ‘इंजुरी टाइम’पर्यंत वेदना सहन कराव्या लागल्या; पण नशिबाने जो पहिला गोल त्यांना बहाल केला, त्यामुळे त्या वेदना कुठच्या कुठे पळाल्या. ब्राझीलच्या वेदना कमी झाल्या याचा मनस्वी आनंद जरी झाला असला, तरी फुटबॉलमध्ये आणखी एक ‘नटसम्राट’ नेमार यांनी रोनाल्डोप्रमाणे अभिनय करून ज्या प्रकारे पेनल्टी मिळवली त्याच्या वेदना असह्य झाल्या व त्या कमी होणार नाहीत. नेदरलँड्सचे पंच बियॉर्न किपर्स यांना फसविण्यात तो यशस्वी झाला. प्रतिस्पर्धी बचावपटू गियानकार्लो गोन्झालेझने त्याला पाठीमागून स्पर्श केला-न केला तोच नेमारने सफाईदारपणे जमिनीवर पडण्याचे सोंग केले. पेनल्टी! ती दिली तरी नेमार जमिनीवरून झटकन उठला तर..? चोरी पकडली जायची! त्याचे सहकारीही त्याच्याभोवती, जसे हॉस्पिटलमधील पेशंटच्या भोवती चिंताग्रस्त नातलग! शेवटी किपर्सना ‘व्हीएआर’ म्हणजे व्हिडीओ पाहण्याची बुद्धी झाली व त्यांनी निर्णय बदलला. मात्र, ‘चीट नेमार’ला पिवळे कार्ड दाखविण्यास ते विसरले की त्यांनी ते टाळले? आपल्याला जरासा जरी धक्का लागला किंवा थोडेसे जोराने ‘टॅकल’ केले गेले, तरी जमिनीकडे झेपावणे व रेफरीकडे दर्दभऱ्या केविलवाण्या नजरेने पाहणे, हा नेमारचा छंद की सवय? जेव्हा खरोखरीच त्याला चुकीच्या पद्धतीने रोखले जाईल, पाडले जाईल, तेव्हा कदाचित रेफरींचा त्यावर विश्वास बसणार नाही. रोनाल्डो आणि मेस्सीपाठोपाठ ज्याचा बोलबाला आहे असा खेळाडू आपले खेळातील कसब, कौशल्य वापरण्याऐवजी ही दुर्बुद्धी त्याला का बरे सुचते? असो.
आधीच नाच-गाणे-पिणे यात मश्गूल ब्राझिलियन चाहत्यांनी आज सेंट पीटर्सबर्ग डोक्यावर घेतले. तो त्यांचा स्वभाव, त्यांची जीवनशैली!

Web Title: Latin American Football Lifestyle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.