FIFA Football World Cup 2018 : फ्रान्स जगज्जेता, २० वर्षांनंतर फ्रान्सने पुन्हा कोरले ‘फिफा’ वर्ल्डकपवर नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 06:54 AM2018-07-16T06:54:44+5:302018-07-16T06:59:12+5:30

कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत महिनाभर चाललेला थरार... विक्रमांची झालेली बरसात...

FIFA Football World Cup 2018 Final France won the match against croatia | FIFA Football World Cup 2018 : फ्रान्स जगज्जेता, २० वर्षांनंतर फ्रान्सने पुन्हा कोरले ‘फिफा’ वर्ल्डकपवर नाव

FIFA Football World Cup 2018 : फ्रान्स जगज्जेता, २० वर्षांनंतर फ्रान्सने पुन्हा कोरले ‘फिफा’ वर्ल्डकपवर नाव

Next

मॉस्को : कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवत महिनाभर चाललेला थरार... विक्रमांची झालेली बरसात... अन् जगज्जेत्यांच्या शर्यतीत असलेल्या दिग्गज संघांना घरचा रस्ता दाखवत, अंतिम फेरीत धडकलेल्या फ्रान्स आणि क्रोएशियाने अंतिम सामन्यात कोट्यवधी फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. रविवारी रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात चिवट आणि तितक्याच आक्रमक खेळामुळे, पहिल्यांदाच फायनल गाठणाऱ्या क्रोएशियाचा धडाकेबाज फ्रान्सने पराभव केला अन् फ्रान्सने २० वर्षांनी पुन्हा जगज्जेतेपद पटकावले.
महिनाभर रंगलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणेच धडाकेबाज रंगला. ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी निर्णायक सामन्यात आपला दबदबा राखताना फ्रान्सला विश्वविजयी केले. सामन्याच्या १८व्या मिनिटाला क्रोएशियाला स्वयंगोलचा फटका बसला आणि यानंतर फ्रान्सने जबरदस्त वर्चस्व राखले.
>या तीन कारणांमुळे जिंकला फ्रान्स
डिफेन्स+अटॅक : फ्रान्सचे डिफेंडर पव्हार्ड, व्हॅरने, उमटीटी आणि हर्नांडेझ यांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यांनी क्रोएशियाचे प्रयत्न निष्प्रभ ठरवले.
गोलरक्षण : गोलरक्षक ह्युगो लॉरीस फ्रान्ससाठी भात्यातला सर्वोत्तम बाण ठरला. क्रोएशियाचे प्रत्येक आक्रमण त्याने चपळतेने परतावले.
अनुभव, नवा जोश : संघात अनुभवी व नवीन, अशा दोन्ही खेळाडूंचा जोश होता.
>प्रशिक्षकाचा विक्रम
फ्रान्सचे प्रशिक्षक दीदीएर डिश्चॅम्प्स
यांनी प्रशिक्षक व कर्णधार या नात्याने संघाला विजय मिळवून देण्याचा विक्रम केला. फ्रान्सने १९९८मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, त्या वेळी डिश्चॅम्प्स
हे कर्णधार होते. अशी कामगिरी या आधी ब्राझिलचे मारिओ झॅगलो व जर्मनीचे फ्रान्झ बॅनेनबर यांनी केली आहे.
>झुंज दिली पण अपयश
फ्रान्सने जेतेपद पटकावले असले तरी, त्यांना क्रोएशियाच्या झुंजार प्रतिकाराचा सामना करावा लागला. पिछाडीवर पडल्यानंतर क्रोएशियाने २ गोल करत पुनरागमन करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. पण अखेर आक्रमक खेळाच्या जोरावर फ्रान्सने अखेरच्या क्षणापर्यंत वर्चस्व कायम राखत बाजी मारली.
>असे होते
गेम प्लॅनिंग...
दोन्ही संघ 4-2-3-1 या फॉरमेशननेच खेळतील याची अपेक्षा कोणी केली नव्हती. चार डिफेंडर, दोन सेंटर मिडफिल्डर, तीन मिडफिल्डर आणि एक स्ट्रायकर ही रणनिती दोन्ही संघांनी आखली. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल यात शंका नव्हती.
>चुकीला माफी नाही!
क्रोएशियाने पहिल्या सत्रात आत्मघातकी खेळ केला. त्यांनी फ्रान्सला फुकटचे दोन गोल दिले आणि या दोन्ही चूका क्रोएशियाला महागात पडल्या.
>यामुळे हरला क्रोएशिया
स्वयं गोल : बचाव करताना मॅँझ्युकिच याने हेडरद्वारे फुटबॉल दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो थेट स्वत:च्या गोलपोस्टमध्ये गेला.
‘हॅँड’ महागात : बचाव करताना पॅनिसीचच्या हाताला फुटबॉल लागला आणि फ्रान्सला स्पॉट किक मिळाली. त्यावर ग्रिझमनने गोल केला.
आत्मविश्वासाचा अभाव : स्वयंगोल झाल्यानंतर क्रोएशियाचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला. त्यानंतर फ्रान्सच्या आक्रमणासमोर त्यांचे काहीच चालले नाही.
> १९९८चा बदला घेता आला नाही
१९९८ चा विश्वचषकात क्रोएशियाचा उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभव झाला होता. त्याचा बदला प्रशिक्षक डॅलीच यांना घेता आला नाही.
>फुटबॉल
विश्वाचा
नवा
‘पेले’
वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला. उंचीने लहान, पण चपळतेत सर्वांवर भारी असलेल्या फ्रान्सच्या १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची चर्चा सर्वत्र आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गोल करणारा तो ब्राझिलचे दिग्गज पेले यांच्यानंतर दुसरा युवा खेळाडू ठरला आहे.
>फ्रान्स तीन वेळा फायनलमध्ये, दोनदा विजेतेपद
1998 विजेतेपद
(ब्राझिलला हरविले)
2006 उपविजेतेपद
(इटलीकडून पराभव)
2018विजेतेपद
(क्रोएशियावर मात)
41.4लाख लोकांचा क्रोएशिया पराभूत, पण जिंकली कोट्यवधी लोकांची मने

Web Title: FIFA Football World Cup 2018 Final France won the match against croatia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.