FIFA Football World Cup 2018 : ब्राझील, बेल्जियमचे लढाऊ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:46 AM2018-07-04T01:46:35+5:302018-07-04T01:47:27+5:30

कुर्तोआने कॉर्नरवरील चेंडू मिळताच प्रतिहल्ला सुरू केला. डीब्रूनने मेउनिअरला चेंडू दिला. त्याने क्रॉस केला तेव्हा रोमेलू लुकाकूने नि:स्वार्थीपणे तो चॅडलीसाठी सोडला आणि.. गोल! यासह जपान व पर्यायाने आशियाच्या आशा धुळीस मिळाल्या.

FIFA Football World Cup 2018: Brazil, Belgian Fights Performance | FIFA Football World Cup 2018 : ब्राझील, बेल्जियमचे लढाऊ प्रदर्शन

FIFA Football World Cup 2018 : ब्राझील, बेल्जियमचे लढाऊ प्रदर्शन

googlenewsNext

- रणजीत दळवी

कुर्तोआने कॉर्नरवरील चेंडू मिळताच प्रतिहल्ला सुरू केला. डीब्रूनने मेउनिअरला चेंडू दिला. त्याने क्रॉस केला तेव्हा रोमेलू लुकाकूने नि:स्वार्थीपणे तो चॅडलीसाठी सोडला आणि.. गोल! यासह जपान व पर्यायाने आशियाच्या आशा धुळीस मिळाल्या.

संभाव्य विजेते ब्राझील आणि बेल्जियम यांच्या जादुई आणि लढाऊ प्रदर्शनाने फुटबॉल एक अतिशय सुंदर खेळ आहे हे सिद्ध केले. त्यांचे प्रतिस्पर्धीही यात मागे नव्हते. त्यांनीही विजयी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्याचबरोबर खेळातील नाट्य, अनिश्चितता पेश करण्याबरोबरच निर्धारित वेळेत लढतीही निकाली काढल्या.
नेमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चांगला खेळ केला. पण त्यांनी आपल्या ज्ञात क्षमतेची पातळी मात्र अजून गाठलेली नाही. मेक्सिकोने सुरुवातीला दबाव टाकला. एकदा खेळावर नियंत्रण मिळवताच ब्राझीलने प्रखर हल्ले केले जे मेक्सिकोचा गोलरक्षक गियेर्मो आॅचाआने मोठ्या शर्थीने परतविले. शेवटी नेमार व विलियन यांच्यातील एका चतुर हालचालीमुळे ब्राझीलला आघाडी मिळाली. नेमारकडून चेंडू मिळताच त्याने डाव्या बाजूने चढाई केली. त्याचा क्रॉसही मग अचूक निघाला. त्यामुळे नेमारसमोर चक्क मोकळा गोल. त्याने चेंडू ‘स्लाइड’ मारत आत ढकलला. ब्राझीलने स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न अवश्य केले. पण आॅचोआचा अडसर कायम राहिला.
मेक्सिकोनेही बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण कार्लोस व्हेलाला हाविएर हर्नांडेझ म्हणजेच ‘चिचरिटो’कडून कोणतीच साथ लाभली नाही. ब्राझीलच्या बचावफळीत फेलिपे लुईस उठून दिसला. त्यामुळे दुखापतीतून बरा झालेल्या आतुर मार्सेलोला मग बाक गरम करत बसावे लागले. ब्राझीलला विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल शेवटची दोन मिनिटे बाकी असताना मिळाला. नेमारच त्याचा शिल्पकार होता, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात त्याचा गोलप्रयत्न फसला. चेंडू आॅचोआच्या पायाला लागला व तो नव्याने मैदानात आलेल्या रॉबर्टो फर्मिनोच्या पायात सुदैवाने आला. नेमार काय सहजासहजी कोणाला चेंडू पास करतो?
ब्राझीलच्या पाठीराख्यांना परमानंद होणे स्वाभाविक आहे. पण नेमारची ‘ड्रामेबाजी’ गंभीर आहे. प्रतिस्पर्ध्याने टॅकल केले न केले की लगेच जमिनीवर लोळायचे आणि कळवळत बसायचे हे आता अतिच झाले. रेफ्री गिअ‍ॅनलुका रॉकी यांनी ते कसे सहन केले? एकदा तर नेमार मैदानाबाहेर ‘नाटक’ करत होता. त्याला धक्का अवश्य लागला होता. पण त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी चार मिनिटे खेळ थांबवायचा? स्थितीचे अवलोकन करून लगेच खेळ सुरू व्हायला हवा होता व ‘व्हीएआर’ काय झोपी गेला होता? अनेकदा ब्राझीलचे खेळाडू ‘टॅकल’ होताच खाली पडून मौल्यवान वेळेची चोरी करत होते. किती अखिलाडू वृत्ती? अन्य लढतीत बेल्जियमने संघर्ष करणाºया जपानचा पाडाव करताना लढाऊ वृत्तीचे जबरदस्त प्रदर्शन केले. जपानने दोन शानदार गोल करत त्यांना पराभवाच्या खाईत लोटले होते. हारागुची आणि इनुई यांचे गोल केवढे प्रेक्षणीय? सध्या उत्तम गोलरक्षकांमध्ये गणला जाणारा थिबॉ कुर्तोआ दोन्ही वेळा चक्क प्रेक्षक बनला. त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूने चेंडू गोलमध्ये गेल्याने भल्याभल्यांचे अंदाज चुकले. पण बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी फेलायनी, नासेर चॅडली आणि थॉर्गन हॅझार्ड यांना उतरवून बाजी उलटवली. त्याआधी व्हर्टोघनेनचा एका निरूपद्रवी हेडरवर चेंडू जपानचा गोलरक्षक कावाशिमा याच्यावरून गोलमध्ये गेला. येथूनच जपानचा खेळ घसरत गेला. फेलायनीने एडन हॅझार्डच्या क्रॉसवर जबरदस्त हेडरवर बरोबरी साधली. यानंतर ‘स्टॉपेज टाइम’ने जपानचा घात केला.

Web Title: FIFA Football World Cup 2018: Brazil, Belgian Fights Performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.