FIFA FOOTBALL World Cup 2018: क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 01:29 AM2018-06-22T01:29:36+5:302018-06-22T01:42:21+5:30

फिफा विश्वचषकाच्या 23व्या सामन्यात क्रोएशियानं अर्जेंटिनावर 3-0नं विजय मिळवला आहे.

FIFA FOOTBALL World Cup 2018: 3-0 victory Croatia over Argentina | FIFA FOOTBALL World Cup 2018: क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय

FIFA FOOTBALL World Cup 2018: क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय

Next

नाझनी नोवगोरोद : अँटे रेबिक कर्णधार लुका मॉड्रिक आणि इवान रॅकितिक यांनी नोंदवलेल्या शानदार गोलच्या जोरावर क्रोएशियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदवताना बलाढ्य अर्जेंटिनाला ३-० असे नमविले. या अनपेक्षित पराभवासह जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाच्या बाद फेरीच्या आशा खूप धुसर झाल्या आहेत.
निझनी नोवगोरोद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाच्या तुफानी वादळाला सामोरे जावे लागले. अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाची बचावफळी सपशेल अपयशी ठरली. सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात क्रोएशियाने तुफानी खेळ करताना तब्बल तीन गोलचा धडाका केला. ५३व्या मिनिटाला रेबिकने वेगवान गोल करताना क्रोएशियाला आश्चर्यकारक १-० अशी आघाडी मिळवून दिली. या पहिल्या गोलनंतर अर्जेंटिनाचा संघ प्रचंड दबावाखाली आला आणि हा दबाव त्यांच्या धसमुसळ्या खेळातून स्पष्ट दिसून आला. अर्जेटिनाच्या आक्रमकतेला क्रोएशियानेही त्याच आक्रमकतेने उत्तर दिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी ३ पिवळ्या काडर््सला सामोरे जावे लागले. कमजोर बचवाफळीचा फायदा घेत मॉड्रिकने ८०व्या मिनिटाला गोल केल्यानंतर भरपाई वेळेत रॅकितिक यानेही गोल करत क्रिएशियाचा दणदणीत विजय निश्चित केला.
या सामन्यात सुपरस्टार लिओनेल मेस्सीची काहीच जादू चालली नाही. क्रोएशियाच्या भक्कम बचावफळीने मेस्सीला रोखताना अर्जेटिनाचे मानसिक खच्चीकरण केले. या पराभवानंतर अर्जेटिनाला बाद फेरी गाठण्यासाठी आपल्या अखेरच्या सामन्यात नायजेरियाला मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, नायजेरीचा आईसलँडविरुद्धचा विजयही अर्जेंटिनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, या शानदार विजयासह क्रोएशियाने यंदाच्या विश्वचषकात बाद फेरी गाठणारा चौथा संघ म्हणून मान मिळवला.

Web Title: FIFA FOOTBALL World Cup 2018: 3-0 victory Croatia over Argentina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.