विश्वचषकावर युरोपची सत्ता कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 02:17 AM2018-07-08T02:17:02+5:302018-07-08T02:17:32+5:30

ब्राझील आणि उरुग्वे यांच्या पतनामुळे युरोपियन संघ आता मोकळेपणाने श्वास घेतील. आता विश्वचषकावर त्यांचाच नाही तर कोणाचा अधिकार? १९५८ चा अपवाद सोडला तर लॅटिन अमेरिकेला युरोपमध्ये कधीच झेंडा रोवता आलेला नाही.

 Europe's power on the World Cup! | विश्वचषकावर युरोपची सत्ता कायम!

विश्वचषकावर युरोपची सत्ता कायम!

googlenewsNext

-  रणजीत दळवी
ब्राझील आणि उरुग्वे यांच्या पतनामुळे युरोपियन संघ आता मोकळेपणाने श्वास घेतील. आता विश्वचषकावर त्यांचाच नाही तर कोणाचा अधिकार? १९५८ चा अपवाद सोडला तर लॅटिन अमेरिकेला युरोपमध्ये कधीच झेंडा रोवता आलेला नाही. रणमैदान सोडेपर्यंत ब्राझीलने संघर्ष केला. मात्र उरुग्वेने आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विजयाला हातभार लावला. त्यांच्या अनुभवी गोलरक्षक फर्नांडो मुसलेराचा अंदाज साफ चुकला आणि तीन विश्वचषक आणि एकूण शंभर आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या गोलरक्षकाच्या कारकिर्दीवर एक डाग लागला. मात्र त्याचा प्रतिस्पर्धी फ्रान्सचा कर्णधार ह्यूगो लॉरीस आपल्या संघाचा तारणहार ठरला. त्याने मार्टिन कॅसेरासचा हेडर उजवीकडे झेपावत जर रोखला नसता तर मध्यांतराच्या ठोक्याला बरोबरी झाली असती. आणि न जाणो लढतीचे चित्र बदलले असते.
फ्रान्सला आघाडी मिळाली आश्चर्यकारकरित्या ग्रीझमनची पेनल्टी क्षेत्राच्या डाव्या बाजूने घेतलेल्या फ्री किकवर राफाएल व्हराने एखाद्या बाणाप्रमाणे झेपावला आणि अप्रतिम गोल करण्यात यशस्वी झाला. फ्रान्सच्या पेनल्टी क्षेत्राच्या आसपास फ्री किक देणे किती धोक्याचे आहे हे आणखी एकदा सिद्ध झाले. कायलियन एमबाप्पे मात्र आज शांत होता. त्याला उरुग्वेच्या बचावफळीने वावच दिला नाही. त्याने एकदा नेमारसारखे नाटक केले. त्यामुळे राडा होण्याची शक्यता निर्माण झाली. पण बलदंड शरीरयष्टीचे अर्जेंटिन रेफ्री नेस्टर पिटाना यांनी वेळीच गर्दीत उडी घेत नियंत्रण मिळवले. स्वत: एक कसलेले नट असणाऱ्या पिटाना यांनी सुरुवातीलाच सुआरेजला ताकीद दिली होती. कुर्तोआ हा बेल्जिअमच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला. ब्राझीलचे डझनभर धोकादायक गोल प्रयत्न त्याने बचावफळीतील सहकाºयांच्या साथीने विफल ठरवले.
त्याने स्टॉपेज टाईममध्ये नेयमारचा गोल करण्याचा प्रयत्न कुचकामी ठरवला. त्याचे काय वर्णन करावे?, वर्ल्ड क्लास ! ज्या दिवशी गोलरक्षक आपली उपयुक्तता सिद्ध करत होते. त्या दिवशी मुसलेरावर मोठी आपत्ती ओढावली. त्याचे अतिशय वाईट वाटले. ग्रीझमनचा तो फटका विलक्षण होता. चेंडूवर जबरदस्त आघात, त्याच्यावर प्रचंड फिरकी आणि ऐन वेळी दिशा बदलण्यासह चेंडू डिप झाला त्यामुळे मुसलेराकडे वेळच राहिला नाही. त्याने शेवटच्या क्षणी तो दूर लोटण्याचा विफल प्रयत्न केला. पण घात झाला. चेंडू उडून त्याच्या डोक्यावरून गोलमध्ये गेला. मुसलेरा काय बरेच गोलरक्षक अनेकवेळा विजय मिळवून देणारे हिरो असतात. मात्र असा एखादा अपघात त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का मारून जातो.
ब्राझीललाही सुरुवातीलाच अपघाताला सामोरे जावे लागले. नासेर चॅडलीची कॉर्नर किक धोकादायक नव्हता. पण गॅब्रिएल जीझस आणि फर्नांडिन्हो यांच्यात तू का मी असा गोंधळ उडाला आणि चेंडू फर्नांडिन्होच्या उजव्या हाताला लागून गोलमध्ये गेला. या ओन गोलमध्य डे ब्रुईन याने भर टाकली. ब्राझीलला कॉर्नर मिळाला तो विफल ठरला आणि बेल्जिअमने लुकाकुद्वारे जबरदस्त प्रतिहल्ला केला. साधारणपणे ३५-४० यार्ड मुसंडी त्याने मारली. त्याला कोणीच रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा डे ब्रुईनला पासही अचूक निघाला. आसपास कोणीही नाही. हे दिसताच त्याने तोफगोळा डागला. आॅलिसन फक्त पाहत राहिला. त्याने सामन्यात दोन तीन वेळा संघाला वाचवले. पण त्याने येते हात टेकले. एवढे असूनही ब्राझिलने हार मानली नाही. मार्सेलो, फिलीप कुटिन्हियो, नेयमार यांनी एकामागून एक हल्ले केले. पण बेल्जिअमचा किल्ला पडला नाही. त्यांचे बचावपटू शरीर चक्क झोकून देत ते हल्ले विफल करत होते. आणि ते चुकलेच तर कुर्तोआ होताच मागे. त्याने ३७ व्या मिनिटाला डावीकडे जबरदस्त सूर मारून कुटिन्हियोला गोलपासून वंचित ठेवले. उरुग्वेप्रमाणे ब्राझिललाही अपयशाचा सामना करावा लागला. तो गोल झाला असता तर चित्र बदलू शकले असते. मध्यांतरानंतर विलियन आणि झीजस यांची जागा रॉबर्टो फर्मिनो आणि डग्लस कॉस्टा यांनी घेतली. त्यामुळे हल्ल्यांना अधिक धार आली. त्यांची तीव्रता वाढली. पण रेनॅटो आॅगस्टोला एवढ्या उशिरा का उतरवले. त्याने केला हेडरवरील गोल तसा उशिराच झाला. जसजसा अंतकाळ जवळ आला तशी ब्राझीलने घाई केली. फटकेबाजी स्वैर झाली. इतकी की त्याची लागण कुटिन्हियोलाही झाली. ब्राझीलने दोन वेळा पेनल्टी अपील केले. पण ग्रॅब्रिएल झीजसला व्हिन्सेट कोम्पनी केलेल्या टॅकलवर रेफ्री मिलोरॅड मॉझिक आणि व्हीएआर पेनल्टीच्या निर्णयाप्रत येऊ शकले नाही.
 

Web Title:  Europe's power on the World Cup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.