गळणा-या केसांवर उपाय शोधताय... मग हे कराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 06:36 PM2017-09-07T18:36:24+5:302017-09-07T18:43:58+5:30

This is something that essential for controlling hair falling by natural way | गळणा-या केसांवर उपाय शोधताय... मग हे कराच!

गळणा-या केसांवर उपाय शोधताय... मग हे कराच!

Next
ठळक मुद्देकेसांची समस्या अशी आहे की मूळ कारणाला आणि प्रश्नाला भिडत नाही तोपर्यंत केस गळायचे थांबत नाहीत. आणि केस गळती थांबवायची असेल तर बाहेरचं कोणतंही आयतं औषध घेण्यापेक्षा केसांवर नैसर्गिक उपाय करणं गरजेचं आहे. हे नैसर्गिक उपायच केसांचं गेलेलं सौंदर्य परत आणून दे* केसांना तेल आवश्यक असतं. आणि तेलासोबतच केसांच्या मुळांना हवा हलक्या हाताचा मसाज.* केसांच्या निगेत मेहेंदीची भूमिका खूप महत्त्वाची असते. मेहेंदी ही केसांना नैसर्गिक चमक देते. तसेच नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते.* शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतो असं म्हटलं जातं. अर्थात ते खरंही आहे. पण केसांच्या आरोग्यासाठीही व्यायाम खूप महत्त्वाचा असतो.* केसांचं नैसर्गिक सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या केसांना कोणत्याही केमिकलचा स्पर्श व्हायला नको याची काळजी आपणच घ्यायला हवी.

 

- माधुरी पेठकर.


केस विंचरतांना केसांचे पुंजकेच्या पुंजके जाऊ लागले की अस्वस्थ व्हायला होतं. पण ही अस्वस्थता हळहळपुरतीच मर्यादित राहाते. केस का गळताय? ते गळू नये म्हणून आपण काय करायला हवं, आपल्या सवयी तर केस गळतीला कारणीभूत नसतील ना? या महत्त्वाच्या मुद्यांचा साधा विचार सुध्दा होत नाही. आणि केसांची समस्या अशी आहे की मूळ कारणाला आणि प्रश्नाला भिडत नाही तोपर्यंत केस गळायचे थांबत नाहीत.
केस गळत असतील तर आपले केस का गळताय हे जाणून घ्यावं. आपण संतुलित आहार घेतो आहोत का? केसांना नियमित तेल लावणं, केस स्वच्छ ठेवणं हे आपल्याकडून होतय का? केसांवर फॅशन म्ह्णून करत असलेले प्रयोग तर केसांच्या मुळावर उठले नसतील ना? यासारख्या प्रश्नांचा विचार आधी व्हायला हवा. आणि केस गळती थांबवायची असेल तर बाहेरचं कोणतंही आयतं औषध घेण्यापेक्षा केसांवर नैसर्गिक उपाय करणं गरजेचं आहे. हे नैसर्गिक उपायच केसांचं गेलेलं सौंदर्य परत आणून देवू शकतात.

 

 

केस गळती थांबवायची असेल तर..

1) केसांना तेल आवश्यक असतं. आणि तेलासोबतच केसांच्या मुळांना हवा हलक्या हाताचा मसाज. केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करत तेल लावलं तर तेल केसांच्या मुळात झिरपतं. बदाम तेल किंवा कॅस्टर आॅइलनं केसांना मसाज करावा. मसाज झाल्यानंतर केसांना वाफ द्यावी. भृंग तेल हे मसाजसाठी एकदम उत्तम. आठवड्यातून दोनदा मसाज करावा.
2) केसांना तेल लावून मसाज झाल्यानंतर केसांना पॅक लावावा. त्यासाठी प्रत्येकी 2 चमचे आवळा, रिठा, शिकेकाई, मेथी, त्रिफळा चूर्ण आणि ब्राह्मी पावडर घ्यावी. त्यात दोन अंडी टाकून पावडर त्यात चांगली मिक्स करून घ्यावी. हा पॅक मग केसांना लावावा. 30 ते 40 मीनिटं ठेवावा. आणि मग धुवून टाकावा. हा पॅक केसांना तेल लावल्यानंतर लावला तर जास्त फायदेशीर ठरतो. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.
3) केसांच्या निगेत मेहेंदीची भूमिका खूप महत्त्वाची असते. मेहेंदी ही केसांना नैसर्गिक चमक देते. तसेच नैसर्गिक डाय म्हणूनही वापरता येते.
4) शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतो असं म्हटलं जातं. अर्थात ते खरंही आहे. पण केसांच्या आरोग्यासाठीही व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो. केसांच्या मुळांशी रक्तप्रवाह चांगला असेल तर केसांचं आरोग्य वाढतं. रक्तप्रवाह सुधारल्यानं शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंही केसांचं आरोग्य सुधारतं.
5) थंडीच्या दिवसात रोज च्यवनप्राश घेतल्यानं आवश्यक जीवनसत्त्वं शरीरात जातात. केसांच्या आरोग्याला जीवनसत्त्वांची अतिशय गरज असते.

6) केसात कायम कोंडा होणं हे केसांसाठी धोक्याची घंटा असते. त्यामुळे केसात कोंडा होतोय हे लक्षात आल्याबरोबर कोंड्यावर उपाय करायला हवेत. इतरांचा कंगवा वापरू नये. शिवाय आपला स्वत:चा कंगवाही अधून मधून डेटॉलनं निर्जंतुक केला तर केसांना हानी पोहोचत नाही. आठवड्यातून एकदा एक मग गरम पाण्यात शाम्पू मिसळून ते पाणी केसांवर घ्यावं. यामुळे केसांच्या मुळाशी बुरशी असेल तर ती निघून जाते. आणि कोंडा होण्याच्या परिस्थितीला आळा बसतो.
7) आपण घेत असलेल्या आहारावर केसांचं आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे आपण घेत असलेला आहार संतुलितच असेल याची काळजी घ्यावी,.
8) अती गोड, मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावेत.
9) कच्च्या भाज्या खाव्यात. त्यात गाजर, कोबी, टोमॅटो, सेलेरी या भाज्या कच्च्या खाव्यात. आहारात पालक, फ्लॉवर , फळं, हिरव्या भाज्या, दूध, पनीर, दही, चीझ यांचा अवश्य समावेश असावा.
10) अती ताणाचे परिणाम केसांवर लगेच दिसतात. त्यामुळे आपल्या मनावर येणारा ताण हलका करण्याचे उपाय आपणच शोधायला हवेत. अती टीव्ही न पाहाणं, आपले छंद जोपासणं, आल्हाददायक संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं यासारख्या सोप्या उपायांनी मनावरचा ताण उतरतो. आणि त्याचा थेट फायदा केसांना मिळतो.
11) ओले केस असताना कधीही कंगव्यानं केस विंचरू नये. केस नैसर्गिकपणे कोरडे झाल्यानंतर हळुवार कंगवा करावा. केस विंचरायला मोठ्या दातांचा कंगवा घ्यावा. छोट्या दातांच्या कंगव्यात केस अडकून केस ओढले जातात आणि तुटतात.
12) केसांचं नैसर्गिक सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या केसांना कोणत्याही केमिकलचा स्पर्श व्हायला नको याची काळजी आपणच घ्यायला हवी. त्यासाठी केसांना केमिकल डाय लावण्यापेक्षा नैसर्गिक तत्त्वांची आणि बहुगुणी मेहेंदी लावावी.

 

Web Title: This is something that essential for controlling hair falling by natural way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.