जागतिक पर्यावरण दिन: बदलत्या हवामानाची वॉर्निंग बेल !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:51 AM2019-06-05T03:51:48+5:302019-06-05T03:52:02+5:30

दरवर्षी पाऊस उत्तम पडणार की नाही, या विवंचनेत शेतकरी चिंताग्रस्त असतो. पाऊस चुकून चांगला पडला, तर भविष्यात गारपीट येणार नाही याची शाश्वती नाही.

World Environment Day: Changing Weather Warning Bell! | जागतिक पर्यावरण दिन: बदलत्या हवामानाची वॉर्निंग बेल !

जागतिक पर्यावरण दिन: बदलत्या हवामानाची वॉर्निंग बेल !

Next

संजय भुस्कुटे
लेखन, संयोजन

दरवर्षी पाऊस उत्तम पडणार की नाही, या विवंचनेत शेतकरी चिंताग्रस्त असतो. पाऊस चुकून चांगला पडला, तर भविष्यात गारपीट येणार नाही याची शाश्वती नाही. हे सगळं तसं ठीक गेलं, तर प्रचंड उत्पादनामुळे उगवणाऱ्या पिकाला पोटाची खळगी भागविणारा भाव मिळेल की नाही, याचा ब्रह्मअंदाज ईश्वरालादेखील सांगता येणार नाही. अशा बदलत्या वातावरणाची, हवामानाची दखल आपण बेदखल करण्याचं तत्त्व अंगीकारल्याचे मोठेपण हे माणसाचे थिटेपण आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.

या सगळ्या संकटांची चाहूल पाच दशकांपूर्वीच लागली होती. म्हणूनच ५ जून, १९७२ला स्टॉकहोम येथे बदलते पर्यावरण, वातावरण याची दखल घेतली गेली आणि त्या दिवसापासून जागतिक स्तरावर ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. वास्तविक पाहता, बदलत्या हवामानाची दखल घेतल्यानंतर आजच्या वर्तमानात समृद्ध पर्यावरणाचे दिवस येणे अपेक्षित होते, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. दरवर्षी होणाºया वातावरण बदलाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदा, क्युटो करार, कार्बन उत्सर्जन कमी करण्याकरिता विकसनशील देशांना घालून दिलेली कालमर्यादा अशा बाबी चर्चेत जरी असल्या, तरी प्रत्येक देशात त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न दिवसेंदिवस संपूर्ण जगालाच चिंताग्रस्त करू लागला आहे.

त्यामुळे प्रश्न सामाजिक असो की पर्यावरणाचा, त्याची दखल घेतली त्याला आता जवळजवळ अर्ध शतक होऊन गेलं. बदलत्या हवामानाची चाहूल त्यांना लागली होती, तसंच वातावरणात बदल होत आहे, त्यातून भविष्यात पर्यावरणाचे गंभीर प्रश्न उभे राहू शकतात, याचा मानव जातीवर, प्राणिमात्रांवर विपरित परिणाम होणार, याचं भान सत्तर-ऐंशीच्या दशकात आलं होतं. त्यानंतर, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नव्वदच्या दशकानंतर झालेली संगणकाची क्रांती, प्रगतीचा वाढत जाणारा आलेख, त्याला विकासाची गती आणि भरमसाठ लोकसंख्येने वाढणारी महानगरे, उंचच उंच इमारती, वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा देण्यासाठी होणारी दमछाक, वाहनांची वाढती संख्या, अमर्याद औद्योगिकीकरण यामुळे वर्तमानाला बदलत्या पर्यावरणानं, वाढत्या प्रदूषणानं पुरतं घेरून टाकलं आहे.

आपल्या इतिहासात छाती गर्वाने फुगेल, असा पराक्रम जसा आहे, तसा दूरदृष्टीपणादेखील आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आठवतं का, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला लिहिलेल्या आज्ञापत्रात वृक्षांवर कुºहाड चालविली, तर वृक्ष लागवडदेखील करा, असं नमूद केलं आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असं म्हणणारे संत तुकाराम आपण कसे विसरलो किंवा ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले’ असं म्हणणारे आणि संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हेदेखील ‘मोगरा फुलला’, ‘फुले वेचिता कळीयासी आला’ असं सांगणं ज्यांनी महत्त्वाचं मानलं, तर समर्थ रामदासांनी मनाचा श्लोक सांगताना, निसर्गाची महतीदेखील विषद केली, अशा साºया संत सज्जन युग पुरुषांना आपण फक्त तसबिरीत बंद करून देवत्व बहाल केलं, पण त्यांच्या विचाराचं देवत्व मात्र कृतीतून अंमलात आणलं नाही, हा दैदुर्वविलास नव्हे का?

माणूस हा नेहमीच विकासासाठी हव्यास करीत असतो, प्रगतीची कास धरत, जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो, हा नियतीचा जन्मजात वरदहस्त आहे, पण ही समृद्धी घराच्या चार भिंतींच्या आत कशी उत्तम नांदेल, इतकाच विचार आपण करत असतो. कारण चार भिंतींच्या आतील घर स्वच्छ, सुंदर, चकाचक, थंडगार, रंगीबेरंगी, आल्हाददायक असलं म्हणजे झालं, पण या घरात येणारी हवा शुद्ध नसेल, घरात येणारे पाणी महागड्या शुद्धीकरण यंत्रातून शुद्ध करणं

जर शक्य झालं नाही, घरात चोवीस तास वीज हवी, हा अट्टाहास पूर्ण होणे शक्य नसेल, घराच्या बाहेर पडल्यानंतर अशुद्ध हवा, वाढतं तापमान, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, दुष्काळ, महापूर, प्लॅस्टिक पिशव्यांमुळे निर्माण होणारा कचरा किंवा कचरा साठविण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही, तर अशा परिस्थितीत चार भिंतींच्या आतील समृद्धी मनाला शांती देऊ शकेल का? असा प्रश्न आपल्याला पडतो का? याचं बहुतांशी सामाजिक उत्तर हे जेव्हा बदलत्या हवामानामुळे गंभीर परिस्थिती येईल, तेव्हाचं तेव्हा पाहू असं आहे. आपण आपली व्यक्तिगत प्रगती, व्यक्तिगत श्रीमंती यामध्ये मग्न असतो. त्यामुळे वर्तमानात पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता असलेली कमालीची अनास्था याने आज साºया विश्वालाच चिंताग्रस्त केल आहे. खरं तर हे सगळं गंभीर आहे, याची जाणीव प्रत्येकालाच आहे किंवा असायला हवी, पण या बदलाचं सामाजिक उत्तरदायित्व कुणी खांद्यावर घ्यायचं, याचं उत्तर मिळत नसल्यानं एकूणच सामाजिक शहाणपणाचा कमालीचा अभाव दिसत आहे.

या गंभीर प्रश्नाकरिता व्यापक जनजागृती, उद्याच्या समृद्ध भविष्याचं निश्चयबीज आजच्या वर्तमानात संकल्पनिष्ठेत दडलेलं आहे, याची जबाबदारी घेण्याची नितांत गरज आहे. वास्तविक पाहता, ५ जून, १९७२ रोजी ज्या आश्वासक विचारांनी बदलते हवामान व पर्यावरण याची दखल घेण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर, उण्यापुºया अर्धशतकीय वाटचालीत आपण बदलत्या हवामानाच्या वाटेवर अधोगतीकडे वाटचाल करीत आहोत. दरवर्षी या बदलत्या हवामानाचा तडाखा अनेक भूप्रदेश अनुभवत आहेत किंवा भविष्यात अनुभवणार आहेत. त्यामुळे याची दखल आपण वेळीच घेतली नाही, तर या वसुंधरेचा विनाश अटळ आहे.

आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक डॉ.स्टीफन हॉकिन्स यांनी २१व्या शतकाच्या शेवटापर्यंत मानवाला वास्तव्यासाठी नवीन पृथ्वीचा शोध घ्यावा लागेल, असं केलेलं शास्त्रीय विधान प्रचंड भीतिदायक आहे, पण आपण मात्र याची आकडेमोड शंभरातून वीस गेले म्हणजे अजून ऐंशी वर्षे हातात आहेत, अशा बेमूर्त आविर्भावात करीत असतो. वास्तविक पाहाता, सन १९७२ ते २०१९ या ४७ वर्षांचा विचार केला, तर १९७२चे दिवस बरेच चांगले होते, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. या कालखंडात बदलते हवामान झपाट्याने बदलेले आहे. सन २००० सालापासून पृथ्वीवरील वाढत्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. उत्तर व दक्षिण धृवावरील बर्फ प्रचंड वेगाने वितळत आहे. समृद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. हे सारे असेच सुरू राहिलं, तर आज दिमाखात उभी असलेली समुद्राकाठची शहरं पाण्याखाली जाणार आहेत, पण यावर आज कुणीही विचार करीत नाही हे दुर्दैव आहे, म्हणून वर्तमानातील आपला नाकर्तेपणा पर्यावरण विषयक सामाजिक शहाणपणातून बदलण्याची नितांत गरज आहे.

याकरिता चांगल्या विचारांचं देवपण कृतीतून आचरणात आलं, तरच येणारं पर्यावरणीय भविष्य उज्ज्वल असेल, नाहीतर ही संकटांची मालिका घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेलीच आहे. जर तिने हा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला, तर उद्ध्वस्त झालेला माणूस नव्या वसुंधरेच्या शोधात इथेच शेवटचा श्वास घेईल, ही भीती नव्हे, तर वास्तव आहे. ते स्वीकारण्याचं किमान भान तरी यावं. याकरिताच आजच्या दिनाचं औचित्य अनन्य साधारण आहे. वर्तमानाचा नाकर्तेपणा समृद्ध पर्यावरणाच्या कर्तेपणातून जाणिवेतून, निश्चयाची जोड देत, परिवर्तनाची वाट निर्माण करत, आचरणातून साजरा करू या व वसुंधरेचं रक्षण करू या.

Web Title: World Environment Day: Changing Weather Warning Bell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.