याला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:26 AM2019-04-30T00:26:15+5:302019-04-30T00:26:20+5:30

चंद्रकांत कित्तुरे नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणेच उन्हाळाही येतो. त्यात नवे ते काय? उन्हाळा आला की उकडणारच. एप्रिल आणि ...

Who is responsible for this? | याला जबाबदार कोण?

याला जबाबदार कोण?

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे
नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणेच उन्हाळाही येतो. त्यात नवे ते काय? उन्हाळा आला की उकडणारच. एप्रिल आणि मे तर एकदम कडकच असतात, असे कोणीही जाता-जाता म्हणते. मात्र, यंदाचा उन्हाळा काही वेगळाच आहे. तो सोसवेना झाला आहे. वळीव पाऊसही मोठा पडेनासा झाला आहे. त्यामुळे तापमान कमी होण्याचं नावच घेत नाही. ढगाळ हवामान झाले तरी हवेत उष्मा आहेच. त्यामुळे अंगाची काहिली होते आहे. यापासून बचाव करायचा कसा? या चिंतेत सगळेच आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी पंखे, एसी, कुलरचा आधार घेतला असेल; पण घरात किंवा कार्यालयातच किती वेळ बसणार, उन्हात तर जावे लागेलच ना. त्यामुळे एसी, कुलरचा आधार घेणारेही म्हणू लागलेत हा उन्हाळा सोसवेना. शहरी भागातील ही कथा असेल, तर ग्रामीण भागातील परिस्थिती कशी असेल, याचा विचारच केलेला बरा. कारण तेथे वीज नियमित नसते. शेतकरीवर्ग मोठा असल्याने त्यांना शेतीच्या कामासाठी बाहेर पडावेच लागते. त्यामुळे असह्य झाले तरी इलाज नाही म्हणून पावसाकडे डोळे लावणे आणि आपले नेहमीचे जनजीवन चालू ठेवणे याशिवाय त्यांना गत्यंतर नसते. याबद्दल कुणी तक्रार करतानाही दिसत नाही.
यंदाचा उन्हाळा इतका असह्य का होतोय?
तापमान इतके का वाढतेय? उष्णतेची लाट का येतेय? याचा विचार शास्त्रज्ञ करीत असतील; पण सर्वसामान्य करीत नाहीत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ सतत होत आहे. ते कशामुळे याची कारणेही तज्ज्ञांकडून वेळोवेळी दिली गेली आहेत. उपाययोजना करण्याबाबत सावध केले गेले आहे. तरीही त्यादृष्टीने कुठेच पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. त्यामुळेच ही वेळ आली आहे. काय आहेत ही कारणे. वाढते औद्योगीकरण, वाढते प्रदूषण, वाढती वृक्षतोड, झपाट्याने कमी होत असलेले जंगलक्षेत्र, निसर्गावर अतिक्रमण करण्याची मानवाची आसुरी महत्त्वाकांक्षा, अशी काही प्रमुख कारणे यामागची सांगता येतील. या सर्व कारणांमुळे पर्यावरण संतुलन बिघडल्याने तापमानात सतत वाढ होत आहे किंवा त्यात चढउतार होत आहेत. पावसावर परिणाम करणारा अल निनो ही या कारणांचाच परिपाक आहे. हे असे होईल, असा इशारा शास्त्रज्ञांकडून, पर्यावरणतज्ज्ञांकडून गेल्या अनेक वर्षांपासून दिला जात आहे. याबाबत जाणीवजागृती होत असली तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
कोल्हापूर त्यामानाने सुदैवी आहे. कारण त्यावर सह्याद्रीची कृपा असल्याने येथील हवामान ना अति थंड, ना अति उष्ण, ना अति पाऊस असे आहे. शिवाय निसर्गाने आपल्या सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण कोल्हापूरवर केलेली आहे. त्यामुळेच येथे आलेला माणूस कोल्हापूरच्या प्रेमातच पडतो. देशभर फिरून आलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही यावर परवाच शिक्कामोर्तब केले. असे वातावरण कुठेही नाही. आधुनिक सोयीसुविधांनी युक्त, पण धकाधकीच्या जीवनापासून दूर असे हे आरोग्यदायी कोल्हापूर असल्याचे त्यांचे म्हणणे होते. काहीअंशी हे खरे असले तरी येथेही आता उन्हाच्या झळा सोसवेना झाल्या आहेत. पाणीटंचाईच्या झळा त्रस्त करू लागल्या आहेत. राज्यात मात्र कोल्हापूरच्या तुलनेत परिस्थिती गंभीरच आहे. पुण्याने तर गेल्या शंभर वर्षांच्या तापमानाचा उच्चांक परवा ओलांडला. विदर्भातील अकोला ४७ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गेले आहे. किनारपट्टी वगळता बहुतेक सर्वच ठिकाणी पाºयाने चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळेच उन्हाळा असह्य झाला आहे.
वाढत्या तापमानामुळे उष्माघात होऊन यंदा राज्यात आतापर्यंत दहाहून अधिक जणांचा बळी गेला आहे. उन्हाळ्याशी संबंधित आजाराची लागण होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे. एक-दोन वळीव पाऊस मोठे झाले तर तापमानात घट होईल, असे जाणकार सांगतात. पण, हा वळीव येणार केव्हा? हे कोणीच सांगू शकत नाही. कारण पावसाचा अंदाज खरा ठरत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करीत उन्हाळा सोसत राहणे एवढेच आपल्या हातात आहे. मानवाची ही स्थिती तर पशुपक्ष्यांची अवस्था काय असेल, याचा विचार केलेलाच बरा. पक्षी वाचविण्यासाठी काही जागरूक संस्था, नागरिक त्यांना पाणी ठेवणे, घरटी बांधणे, सावली निर्माण करून देणे असे कार्य करीत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण, केवळ कौतुक करीत न बसता आपणही त्यात सहभागी व्हायला हवे. निसर्ग रक्षणासाठी सज्ज व्हायला हवे, असे ज्यावेळी समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना वाटू लागेल आणि त्यासाठी ते कार्य करू लागतील तो दिवस मानव जातीसाठी व निसर्गासाठीही सुदिन असेल आणि पर्यावरण संतुलनाकडे नेणारा असेल.

Web Title: Who is responsible for this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.