धडधड थांबलेल्या हृदयाची शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:46 AM2018-03-03T04:46:56+5:302018-03-03T04:46:56+5:30

आपण अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. परिणामी, अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे.

Tragedy heart tragedy | धडधड थांबलेल्या हृदयाची शोकांतिका

धडधड थांबलेल्या हृदयाची शोकांतिका

Next

- डॉ. प्रशांत थोरात, नेत्ररोगतज्ज्ञ
आपण अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. परिणामी, अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांपासून हे लोन आता तुलनेने छोट्या नाशिक, नागपूर, पुणे इत्यादी शहरांकडे फोफावले आहे. ही आनंदाची बाब आहे.
गेल्या आठवड्यात एक विचित्र योगायोग अनुभवयास मिळाला. The Federation of Organ and Body Donationच्या माध्यमातून मुंबई ते गोवा पायी चालत अवयवदानाची दिंडी चालू आहे. नवी मुंबईमध्ये त्या दिंडीचे स्वागत करण्याची संधी आम्हाला लाभली व त्याच दिवशी नाशिकमधून हृदय चेन्नई येथे पाठवण्यात आलेल्या अपयशाची बातमी येऊन थडकली. मन खिन्न/सुन्न झाले. काय हा दैवदुर्विलास! एका बाजूला साठी पार केलेले ज्येष्ठ अवयवदानाची पताका घेऊन ५२ दिवसांमध्ये रोज ३० किमीचे अंतर पार करीत आहेत तर दुसरीकडे अवयवदानाचा निर्णय होऊनही फक्त प्रक्रियेतील समन्वयाच्या अभावी एका हृदयाची ‘धडधड’ बंद पडते. यासारखी दुसरी खेदाची बाब नाही. या प्रश्नाकडे सर्व घटकांनी गांभीर्याने पाहणे काळाची गरज आहे. पण अशा शहरांमध्ये अवयव प्रत्यारोपणासाठी फक्त डॉक्टर्स व रुग्णालये असून ही चळवळ वाढणार नाही. तर त्यासाठी अवयवदान प्रक्रियेतील सर्व घटकांचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून घेतली तर समन्वयाचे दुवे सहज साधता येतील. नेत्रदान व त्वचादान हे मृत्यूपश्चात सहा तासांत घेतले जाते. ते साठवून ठेवण्यासाठी औषधींचा वापर केल्यानंतर प्रत्यारोपणासाठी २-३ दिवसांचा कालावधी सहज उपलब्ध होतो. परंतु मश्तिश्क मृत (Brein Dead) दात्याकडून घेतलेले किडनी, यकृत (Liver), हृदय (Heart) इत्यादी अवयव काही तासांच्या आता प्रत्यारोपण होणे आवश्यक असल्याने या प्रक्रियेत यंत्रणांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या प्रकारचे अवयवदान हे फक्त मान्यताप्राप्त रुग्णालयांतच शक्य आहे. अशा रुग्णालयांची दोन प्रकारे विभागणी होते. त्यामध्ये अवयवदान घेणारी रुग्णालये व अवयवदान घेऊन प्रत्यारोपणास सुसज्ज रुग्णालये. फक्त अवयवदान घेणाºया रुग्णालयात प्राप्त अवयव प्रत्यारोपणासाठी देणे बंधनकारक असल्याने वाहतुकीचा प्रश्न उद्भवतो. यासाठी येणारा खर्च हा प्रत्यारोपण करण्यात येणाºया रुग्णाला करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी काही उपायांचा ऊहापोह होणे आवश्यक आहे.
१) प्रत्येक शहरात किमान एक असे रुग्णालय असावे, जेथे सर्व अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे. वाहतुकीचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल.
२) वाहतुकीच्या नियोजनासाठी तसेच इतर कायदेशीर बाबींसाठी रुग्णालय कोणतेही असले तरी विभागवार सक्षम अधिकारी नेमणे आवश्यक आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवर समन्वय साधणे सहज शक्य होईल.
३) प्रत्यारोपणासाठी घेतलेले अवयव दीर्घकाळ योग्य पद्धतीने साठविण्यासाठी औषधे व उपकरणे यावर संशोधन करून त्याची उपलब्धता करून देणे, त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक कालावधी
मिळेल.
४) हवाई वाहतुकीसाठी सरकारी Air Ambulanceचा पर्याय होणे उपलब्ध आवश्यक आहे. सध्या हवाई वाहतुकीसाठी खाजगी क्षेत्रातील विमान कंपन्यांकडून सुविधा पुरविली जाते. साहजिकच त्यासाठी लाखो रुपयांचे शुल्क आकारले जाते. अशी सुविधा सरकारने मोफत देणे अपेक्षित नसून ती ना नफा ना तोटा या तत्त्वावर दिली तरी खर्च निम्म्याहून कमी होईल, यात शंकाच नाही.
फक्त जाहिरातबाजी करण्यापेक्षा संबंधित यंत्रणा आता तरी जाग्या होऊन धडक निर्णय घेतील. त्यामुळे भविष्यात पुन्हा एका हृदयाची ‘धडधड’ बंद न पडता त्याच हृदयाने एका रुग्णाची ‘धडधड’ सुरू होईल. हीच अपेक्षा.

Web Title: Tragedy heart tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.