‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:58 AM2023-07-18T09:58:50+5:302023-07-18T10:00:01+5:30

नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली.

'Threat' or espionage? Many questions on Seema's love story from Pakistan | ‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

‘गदर’ की हेरगिरी? पाकिस्तानातून आलेल्या सीमाच्या 'लव्हस्टोरी'वर अनेक सवाल

googlenewsNext

दोन दशकांपूर्वी ‘गदर’ हा हिंदी चित्रपट खूप गाजला होता. फाळणीच्या पार्श्वभूमीवर एक शीख युवक आणि पाकिस्तानातील तालेवार मुस्लीम घराण्यातील युवतीदरम्यान फुललेले प्रेम आणि ते यशस्वी करण्यासाठी त्यांनी समाज, परंपरांविरुद्ध पुकारलेले बंड, अशी त्या चित्रपटाची कथा ढोबळमानाने सांगता येईल. त्या चित्रपटाशी साम्य सांगणाऱ्या एका प्रत्यक्षातील प्रेमकथेचा पट सध्या उलगडत आहे. सीमा हैदर नावाची पाकिस्तानी विवाहित महिला पबजी गेम खेळताना सचिन मीना नामक भारतीय युवकाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत आयुष्य घालविण्यासाठी तिच्या चार मुलांना घेऊन दुबई व नेपाळमार्गे चक्क भारतात पोहोचली !

सचिनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की त्यांनी मार्चमध्येच नेपाळची राजधानी काठमांडूत लग्न केले होते. त्यासाठी सीमा विमानाने काठमांडूला पोहोचली होती. दोघांनी काही दिवस नेपाळमध्ये एकत्र घालवले. नंतर सीमा पाकिस्तानात परत गेली आणि १२ लाख पाकिस्तानी रुपयांत तिचे घर विकले. त्या पैशातून तिने विमानाची तिकिटे घेतली आणि स्वत: व मुलांसाठी नेपाळी व्हिजा मिळवला. त्यानंतर मे महिन्यात ती मुलांसह दुबईमार्गे पुन्हा नेपाळला पोहोचली. त्या देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पोखरा येथे तिने काही दिवस घालविले. नंतर तिने काठमांडूहून दिल्लीची बस पकडली आणि १३ मे रोजी ग्रेटर नोयडा येथे सचिनकडे पोहोचली.

सीमाकडे भारताचा ‘व्हिजा’ नव्हता. त्यामुळे एका वकिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्यासोबतच सचिन आणि त्याच्या वडिलांनाही अटक केली. तिघांनाही १४ दिवस कोठडीत काढल्यावर जामीन मिळाला आहे; परंतु सीमा व तिच्या मुलांचे काय होणार, हा प्रश्न शिल्लकच आहे. दरम्यान, पाकिस्तानात हा मुद्दा चांगलाच तापू लागला असून, भारताने सीमाला पाकिस्तानच्या सुपुर्द करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. सौदी अरेबियात नोकरी करीत असलेला सीमाचा पती गुलाम हैदर याने तर चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यासाठी साकडे घातले आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील काही कट्टरपंथीयांनी सीमाच्या कृतीचा बदला म्हणून अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या मंदिरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. रविवारी एका मंदिरावर रॉकेट डागण्यात आले. हा हल्ला दरोडेखोरांच्या टोळीने केल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी काही अल्पसंख्याकांच्या घरांनाही क्षती पोहोचवली. शिवाय त्यांनी ३० जणांना ओलीस ठेवल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, सीमावर ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होत असून, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पथकाचे गठन केले आहे. चौकशीतून सीमाचे वास्तव समोर येईल तेव्हा येईल; पण सध्या तरी या अनोख्या प्रकरणाने भारत आणि पाकिस्तानातील कोट्यवधी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीमाच्या या कहाणीत एखाद्या ‘वेब सिरीज’साठी  आवश्यक सर्व मसाला ठासून भरला आहे.  तिचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याने, तिला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनेच हेरगिरी करण्यासाठी पाठविले असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, गत २४ तासांपासून सचिन, सीमा आणि तिची चार मुले बेपत्ता असल्याची बातमी सोमवारी येऊन थडकली आणि या प्रकरणाचे गूढ आणखीच वाढले.

न्यायालयाने जामीन मंजूर करताना, सीमाने तिचे वास्तव्याचे ठिकाण बदलू नये आणि सचिन व सीमा दोघांनीही न्यायालयात नियमित हजेरी लावावी, अशी अट घातली होती. तरीही ते दोघे बेपत्ता झाले असतील तर गूढ वाढणारच! सीमाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींच्या काही ध्वनिचित्रफिती समजमाध्यमांमध्ये फिरत असून, त्यामध्ये ती अस्खलित हिंदीत बोलताना दिसते. गुलाम हैदरसोबत विवाह होण्यापूर्वी सिंध प्रांतातील खैरपूर येथे आणि विवाहानंतर कराचीत वास्तव्य असलेल्या सीमाचे हिंदी एवढे चांगले कसे, हा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होत आहे. सीमाकडे चार मोबाइल फोन, एक नादुरुस्त फोन, एक सीम कार्ड, दोन व्हिडिओ कॅसेट्स आणि पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने तयार केलेली एक यादी सापडल्याचेही वृत्त आहे. त्यात तथ्य असल्यास प्रकरणाच्या गांभीर्यात आणखीच वाढ होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी अत्यंत आवश्यक झाली आहे. सीमा हेर असल्याचे सिद्ध झाल्यास तिला जी शिक्षा व्हायची ती होईलच! तसे नसल्यास मात्र तिला भारतात राहू द्यावे; कारण विदेशात जाऊन धर्म परिवर्तन केलेल्या महिलेला पाकिस्तानात जिवंत ठेवले जाण्याची अजिबात शक्यता नाही!

Web Title: 'Threat' or espionage? Many questions on Seema's love story from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.