नेतृत्वाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:40 PM2018-08-01T12:40:04+5:302018-08-01T12:40:37+5:30

जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुरेपूर प्रयत्न चालविले आहेत.

Test of leadership | नेतृत्वाची कसोटी

नेतृत्वाची कसोटी

Next

 - मिलिंद कुलकर्णी
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी  मतदान होत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुरेपूर प्रयत्न चालविले आहेत. ३५ वर्षांपासून या संस्थेवर हुकमी राज्य करणाऱ्या शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. भाजपाने केंद्र व राज्य सरकारमधील सत्तेचा उपयोग करीत २०० कोटी रुपये जळगाव शहराच्या विकासासाठी आणणार असल्याची ग्वाही मतदारांना दिलेली आहे. त्यासोबतच जळगाव महापालिका कर्जबाजारी होण्यासाठी आणि विकास कामे न होण्यासाठी सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीला जबाबदार धरले आहे. भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिवसेनेने २५ कोटी रुपयांचा मुद्दा चांगलाच तापविला आहे. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिलेल्या विशेष निधीमध्ये भाजपाच्या आमदारांनी आडकाठी आणल्याने एक पैसाही खर्च झाला नसल्याचे सेना ठासून सांगत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीपेक्षा महापालिका स्वबळावर शहराचा विकास करु शकते, असा विश्वास सेनेने व्यक्त केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाचपणी दोन्ही पक्षांकडून केली जात आहे. लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपाकडे असल्या तरी सेनेने स्वबळाचे रणशिंग फुंकल्यास त्याची पूर्वतयारी या निवडणुकीच्या माध्यमातून केली जात आहे. सेनेने संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याची सूचना केली असून ते यानिवडणुकीत सक्रीय आहे. भाजपाचे खासदार आणि जळगावचे आमदारदेखील या निवडणुकीच्या माध्यमातून ‘संपर्क से समर्थन तक’ अभियान राबवित आहे. भाजपाचा जिल्ह्याचा नेता कोण याचा फैसलादेखील या निवडणूक निकालासोबत होणार आहे. आजपर्यंत एकनाथराव खडसे हे निर्विवाद नेते होते. परंतु गैरव्यवहाराच्या आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या खडसे यांच्यामागे आरोप, याचिका आणि चौकशांचे शुक्लकाष्ट लागले, ते अद्याप कायम आहे. त्यामुळे खडसे यांना या निवडणुकीपासून भाजपाने खड्यासारखे दूर ठेवले. शेवटच्या चार दिवसात समर्थक सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी केवळ खडसे मैदानात उतरले. परंतु इतर वेळी त्यांनी भाजपा नेतृत्व आणि महाजन यांच्या कार्यशैलीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. केंद्र व राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या भाजपा-शिवसेनेमधील या लढतीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपाच्या दिग्वीजयी रथाला रोखण्याचे काम मुंबई, नांदेड आणि नंदुरबार या पालिका निवडणुकीमध्ये झाले होते, त्याची पुनरावृत्ती जळगावात होते काय किंवा नाशिक, पिंपरी चिंचवड, लातूर, पुणे पालिकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळालेल्या भाजपाचे हे स्वप्न जळगावात पूर्ण होते काय, याविषयी उत्सुकता आहे.

Web Title: Test of leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.