जैशचा जागतिक बंदोबस्तच व्हावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 05:16 AM2019-03-15T05:16:57+5:302019-03-15T05:18:57+5:30

जैश ए मोहम्मद ही कुख्यात दहशतवादी संघटना आणि तिचा पाकिस्तानस्थित म्होरक्या मसूद अजहर याला साऱ्या जगाने दहशतवादी ठरवावे म्हणून सर्व प्रमुख राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत मांडलेला प्रस्ताव एकट्या चीनच्या आडमुठ्या नकाराधिकारामुळे बाजूला पडला

strict action needed against jaish e mohammad and its chief masood azhar | जैशचा जागतिक बंदोबस्तच व्हावा!

जैशचा जागतिक बंदोबस्तच व्हावा!

googlenewsNext

- सुरेश द्वादशीवार

जैश ए मोहम्मद ही कुख्यात दहशतवादी संघटना आणि तिचा पाकिस्तानस्थित म्होरक्या मसूद अजहर याला साऱ्या जगाने दहशतवादी ठरवावे म्हणून सर्व प्रमुख राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रसंघटनेत मांडलेला प्रस्ताव एकट्या चीनच्या आडमुठ्या नकाराधिकारामुळे बाजूला पडला व तसाच राहिला आहे. मसूद हा भारताच्या तुरुंगात असताना त्याला सोडविण्यासाठी जैशच्या दहशतवादी कार्यकर्त्यांनी एअर इंडियाचे विमान थेट काठमांडूहून पळवून कंदाहारला नेले व त्यातील सर्व प्रवाशांची हत्या करू अन्यथा मसूदला सोडा, अशी धमकी भारत सरकारला दिली होती. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार सत्तेवर होते आणि लालकृष्ण अडवाणी हे गृहमंत्री, तर जसवंतसिंग हे परराष्ट्रमंत्री होते. मंत्रिमंडळात बराच खल होऊन सरकारने मसूदला सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला विशेष विमानाने परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग कंदाहारला घेऊन गेले व तेथे त्यांनी त्याची सुटका केली.

कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांशी वाटाघाटी न करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेच्या तुलनेत भारताची ही भूमिका ढिसाळ व गलथान होती. सुटका झाल्यानंतर या मसूदने सुडाच्या कारवायांची आखणी करून काश्मीरच्या खोऱ्यात व सीमावर्ती भागात भारतीय तळांवर दहशती हल्ले करायला सुरुवात केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार तोच होता. मसूदविरुद्ध सारे जग आता एक झाले आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, इस्रायल यांसह अनेक अरब देशांनीही त्याला व त्याच्या संघटनेला दहशतवादी घोषित करण्याची मागणी जागतिक व्यासपीठावर केली. मात्र पाकिस्तानने तिला कधी दाद दिली नाही. बरेच दिवस तो आम्हाला सापडत नसल्याची बतावणीही त्याने केली. अखेर अमेरिकेच्या दबावामुळे त्या देशाने त्याला नजरकैद नावाच्या नामधारी तुरुंगात ठेवले आहे. त्याची संघटना मात्र मोकाट असून तिच्या कारवायांना अद्याप कुणी आवर घातल्याचे दिसले नाही.

जगाला न जुमानण्याचे पाकिस्तानचे हे उर्मटपण त्याला मिळालेल्या चीनच्या अभयामुळे आहे. मसूदला वाचवायला चीनने संयुक्त राष्ट्रसंघात तीनवेळा आपला नकाराधिकार वापरला आहे आणि या संघर्षात आपण पाकिस्तानच्या बाजूने उभे राहू, असे जाहीरही केले आहे. पाकिस्तानची मुजोर सेना व जैश यांनी जागतिक मत गंभीरपणे घेतल्याचे अजून दिसत नाही. पाश्चात्त्य जग चढाई करणार नाही, रशिया शांत राहील आणि इराणसह बाकीचे अरब देश तोंडी धमक्यांपलीकडे काही करणार नाहीत, अशी खात्री असल्यामुळेच पाकिस्तान व जैश यांचे अमर्याद उठवळपण अद्याप असेच राहिले आहे. मसूद व जैश यांचे पाकिस्तानच्या सैन्याशी असलेले संबंध उघड आहेत. त्यांच्याच मदतीने व लष्करी साहाय्याने त्याला भारतविरोधी कारवाया करता येतात. पुलवामावरील हल्ला किंवा नंतरच्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दहशतखोरांचे हल्ले याच मदतीच्या बळावर त्याला करता आले व येत आहेत. एका देशाच्या मदतीवाचून एक संघटना भारतासारख्या देशाविरुद्ध असे हल्ले करणे अन्यथा शक्यही नाही. तरीही या साऱ्यांना चीनचे मिळणारे बळ व प्रोत्साहन हा केवळ भारताच्याच नव्हेतर, जगाच्याही चिंतेचा विषय आहे. चीनच्या अध्यक्षांनी भारताला कितीही भेटी दिल्या आणि मैत्री असल्याचे गोडवे गायले तरी त्यांचे भारताशी असलेले वैर जुने, म्हणजे थेट १९१३ पासूनचे आहे. त्यांना भारतात शांतता व सुव्यवस्था नांदलेली किंवा प्रगती केलेली नको आहे. भारत ही आगामी जगतातील एक मोठी शक्ती ठरेल व ती चीनच्या वर्चस्वाला शह देईल याची त्यांना धास्ती आहे. त्यामुळे जैश वा मसूद यांच्यापुरत्याच त्याच्या कारवाया मर्यादित नाहीत. भारताच्या अरुणाचल प्रदेशावर चीनने हक्क सांगितला आहे. त्या प्रदेशातील अनेक शहरांना व स्थळांना आपली नावे दिली आहेत. आता तर तो देश सिक्कीमवरही आपला हक्क सांगू लागला असून, उत्तर प्रदेशच्या उत्तर सीमेवरील काही पर्वतमय भाग आमचा आहे, असे तो म्हणू लागला आहे. १९५४ मध्ये बांडूला झालेल्या नाम परिषदेत ‘मॅकमोहन ही भारत व चीनमधील सीमारेषा आम्हाला मान्य आहे,’ असे म्हणणाºया त्या देशाने अवघ्या १९ दिवसांनंतर आपली भूमिका बदलून ती रेषा ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी बनवली असल्याचे व आपल्याला मान्य नसल्याचे जाहीर केले. भारत व चीन यांच्यातील दुराव्याला खरी सुरुवात तेव्हा झाली व ती आजतागायत चालू आहे. चीनचा खरा रोख भारतावर आहे आणि पाकिस्तान व जैश यांसारख्या आपल्या हस्तकांमार्फत तो अंमलात आणीत आहे.

त्यामुळे भारतावर दहशतवादी हल्ले हे एकट्या मसूदचे किंवा त्याच्या जैश या संघटनेचे नाहीत. त्यामागे पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानच्या मागे चीन हे बलाढ्य राष्ट्रही उभे आहे. चीन हा सध्या जगातील कोणत्याही महासत्तेला किंवा संयुक्त राष्ट्रसंघटनेलाही न जुमानणारा बलशाली व आक्रमक देश आहे. सबब भारताला जैश हे प्रकरणही थेट जागतिक पातळीवर हाताळावे लागणार आहे आणि त्यासाठी पाश्चात्त्य देशांसह अरब मित्रांचीही मदत घ्यावी लागणार आहे. भारताभोवतीचे सगळे शेजारी देश चीनने त्यांना प्रचंड आर्थिक मदत देऊन अगोदरच मिंधे बनविले आहेत. या स्थितीत पाश्चात्त्य देशांचे साहाय्य व स्वबळातील वाढ हाच भारतापुढचा एकमेव व खरा पर्याय आहे.

(लेखक नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: strict action needed against jaish e mohammad and its chief masood azhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.