सामाजिक उद्धाराचे प्रवर्तक विश्वमानव बसवेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 06:38 AM2019-05-07T06:38:29+5:302019-05-07T06:41:24+5:30

श्री बसवेश्वर यांची आज जयंती. प्रथम आंतरराष्ट्रीयवादी विचारवंत असलेले महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात विश्वबंधुत्वाची व समतेची भावना रुजवण्याचा आग्रह धरला होता.

Social innovator promoter Worldman Buseshwar | सामाजिक उद्धाराचे प्रवर्तक विश्वमानव बसवेश्वर

सामाजिक उद्धाराचे प्रवर्तक विश्वमानव बसवेश्वर

googlenewsNext

- सरला हिरेमठ, अभ्यासक

श्री बसवेश्वर यांची आज जयंती. प्रथम आंतरराष्ट्रीयवादी विचारवंत असलेले महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात विश्वबंधुत्वाची व समतेची भावना रुजवण्याचा आग्रह धरला होता. मानव सेवा हीच खरी परमात्म्याची सेवा होय. तसेच जातीभेद नष्ट करण्याचे महान कार्य, स्त्री उद्धाराशिवाय समाजोद्धार नाही असे त्यांचे मत होते. १२ व्या शतकात त्यांच्या धर्मजागृतीच्या कार्यानेच त्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले.


इ.स. ११०५ मध्ये कर्नाटकातील बिजापूर जिल्ह्यात इंगळेश्वर बागेवाडी येथे त्यांचा जन्म झाला. बसवेश्वरांच्या मातेचे नाव मादलिंबिका, ती एक साध्वी पतिव्रता शिवभक्त स्त्री होती. तर वडील मादरस हे धार्मिक वृत्तीचे सज्जन पुरुष होते. त्यांचे शिक्षण कुंडल संगम येथे १२ वर्षे ईशान्य गुरू यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. वेद, उपनिषदे, इतिहास, पुराणे, धर्मशास्त्र, अगम, जैन, बौद्ध धर्मग्रंथ तसेच संस्कृतबरोबर पाली, तामिळचाही त्यांनी अभ्यास केला. धर्माचे मर्म त्यांना गवसले. परस्परप्रीती आणि विशुद्ध नीती यांना प्राधान्य देऊन त्यांनी प्रथम धर्मक्षेत्रातील अनाचारावरच आघात केले. जातीभेद हेच समाजाच्या दु:खाचे मूळ कारण आहे, हे जाणून घेऊन त्यांनी जातीभेदातील नवसमाजाची उभारणी व्यापक दृष्टीच्या धार्मिक व्यासपीठावरच केली.
कलचुरी नृपती बिज्जल मंगळवेढे येथे त्यांना ११३४ ते ११५६ या काळात सामान्य लेखनिक, लेखापाल, कोषाध्यक्ष अशी अनेक पदे पार करीत ते मुख्यमंत्री झाले. राजशक्ती हाती आल्यावर बसवेश्वरांनी ती सामाजिक उद्धारासाठी योजनापूर्वक वापरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उभारलेल्या धर्मजागृत कार्याला तत्कालीन श्रेष्ठ साधू - पुरुष शिवयोगी सिद्धराम, योगिनी अक्कमहादेवी, ज्ञाननिधी अल्लमप्रभू, गुड्डापूर धानम्मा अशा अनेकांनी पाठिंबा दिला. मराठी, तेलगू, तामिळ, गुजर, काश्मिरी, असे अनेक स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले. तेली, शिंपी, साळी, माळी, धोबी, किसान, कुंभार, सुतार, सारे एकवटले आणि राजशक्तीपेक्षा भक्ती-शक्ती मोठी ठरली. म. बसवेश्वरांनी जात-पात, उच्च-नीच, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असे भेद जाणले नाहीत. त्यांचा वर्ग-कलहरहित नवनिर्मित समाज विश्वबंधुत्वावर आधारित होता.

पुरोगामी विचारसरणी हा त्यांचा धार्मिक व सामाजिक क्रांतीचा कणा होता. समानता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व या तत्त्वाचे ते प्रतीक होते.
शिवनागय्यासारख्या समाजाने बहिष्कृत केलेल्यांसोबत सहभोजनाचा नित्य परिपाठ त्यांनी केला होता. माणसाच्या व्यवसायावरून त्याचे सामाजिक स्थान ठरविण्याची खुळचट रूढी त्यांनी धुडकावून लावली. संप्रदायवाद्यांनी त्यांच्याविरुद्ध काहूर माजविले. आंतरजातीय विवाहासाठी आज सामाजिक पातळीवरून नव्हे तर, सरकारी पातळीवर प्रयत्न होत आहेत. म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात हजारो वर्षे चालत आलेल्या रूढी आणि परंपरेला सामोरे जाऊन ब्राह्मण मधुवरसाच्या कन्येचा विवाह हरिजन हरळय्याच्या मुलाबरोबर लावून दिला होता.
सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने बसवेश्वरांचा कायक विचार अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यांच्या शेती सुधारणाविषयक कार्याचे महत्त्व विशेष जाणवू लागते. प्रत्येकाने घाम गाळूनच आपला निर्वाह करावा, गरजेपुरतीच संपत्ती मिळवावी. स्वभाव प्रकृतीनुसार काम करावे, हिंसा करू नये, कुणीही कुणाची पिळवणूक करू नये व कुणी कुणाकडून दान घेऊ नये. ऐतखाऊ जीवन जगण्यापेक्षा घाम गाळून चार दिवस स्वाभिमानाने जगणे हेच देवाला रुजू होते. श्रमाच्या प्रतिष्ठेवर त्यांची निष्ठा होती. श्रमसिद्धांताचा त्यांनी पुरस्कार केला, त्यामुळे समाजात समानतेची भावना बळावली. आजच्या रोजगार हमी योजनेचे बी बसवेश्वरांच्या काळात पेरले गेले होते.
बहुदेवोपासना, मूर्तिपूजा, देवालय प्रतिष्ठा, तीर्थयात्रा, शकुन, अपशकुन, तिथी-मुहूर्तावर श्रद्धा ठेवणे अशा विविध अंधश्रद्धेवर म. बसवेश्वरांनी टीका केली. देव एकच आहे, नावे अनेक आहेत. भक्ताने केवळ परमेश्वराची उपासना करून उपयोगाचे नाही तर उपजीविकेसाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट करावेत. आध्यात्मिक क्षेत्रात श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी ही विचारधारा वाचन साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. समाजातील जातीयता, विषमता, लिंगभेद यांना मूठमाती देऊन त्यांनी समतेचे तत्त्व अंगीकारले. महात्मा बसवेश्वर भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाजपरिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्मसुधारक होते. भारतीय संविधानाची तत्त्वे बसवेश्वरांच्या वचन साहित्यात दडलेली आहेत.

Web Title: Social innovator promoter Worldman Buseshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.