साहेब, नाणार की जाणार?

By अतुल कुलकर्णी | Published: July 4, 2018 05:41 AM2018-07-04T05:41:54+5:302018-07-04T05:42:49+5:30

आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात.

Saheb, do you want to go? | साहेब, नाणार की जाणार?

साहेब, नाणार की जाणार?

Next

(एका कार्यकर्त्याने बांद्रेच्या साहेबांना लिहिलेलं पत्र दादासाहेबांना मिळालं ते असं)

प्रिय साहेब,
आपलं तर डोकंच काम करेनासं झालंय. आपण म्हणालात नाणार होणार नाही, तर ते लगेच म्हणाले होणार म्हणजे होणार... आता आपलं खरं मानायचं की त्यांचं...? दरवेळी साहेब, आपल्याला ते तोंडावर का पाडतात. खरेतर आपण मोठे भाऊ होतो. पण त्यांनी आपल्याला एकदम लहान भाऊ करून टाकलं. आता लहान भावाचं ऐकणं तर दूरच; ते नीट बोलतसुद्धा नाहीत आपल्याशी. तरी साहेब आम्ही आधीपासून सांगत होतो की, एकाच घरात राहायचं तर नीट वाटण्या करून घ्या. नाहीतर रोज भांड्याला भांडं लागणार. आता भांडी आपटून आपटून भंगारात न्यायची वेळ झालीयं साहेब...
आपला अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. एवढी आपण प्लास्टिक बंदी केली तर त्यांना त्याचं काही नाही. त्यांनी एकदा तरी जाहीर भूमिका घेतली का? एका शब्दानं तरी त्यांनी आपल्या पर्यावरण प्रेमी प्रमुखाचं कौतुक केलं का? उलट खबऱ्यांना सांगून आपल्या पर्यावरण पे्रमी प्रमुखाचा पुत्र प्लास्टिकच्या बाटल्यांचा कारखाना चालवतो असल्या बातम्या पसरवल्या. त्याहून कहर म्हणजे या विषयावर चर्चा करायची म्हणून परवा मंत्रालयात आपल्या युवराजांना बोलावून घेतलं भेटायला. पण साहेब प्रत्यक्षात भेटवलं कुणाला? तर त्यांच्या प्रधान सचिवांना... ही काय पध्दत झाली का साहेब? किती घोर अपमान आपल्या युवराजांचा. त्याच्या दोन दिवस आधी दिल्लीहून प्रधानसेवक आले, त्यांनी आपल्या राज्यात उद्योगधंदे करणाºया सगळ्यांना बोलावलं पण उद्योगप्रमुखपद आपल्याकडं असताना आपल्याला हिंग लावूनही विचारलं नाही. ही काय पध्दत झाली का साहेब...?
ते तर जाऊ द्या साहेब, सगळी मुंबई यांनी खोदून ठेवलीय आणि रस्त्यावर पाणी साचलं तर आपल्या नावानं बिलं फाडत फिरतात त्यांचे चेलेचपाटे... म्हणतात कसे, त्यांचं जलयुक्त शिवार आणि आपलं जलयुक्त आवार... ही काय पध्दत झाली का साहेब? हे झालं राज्यातलं. परवा तिकडे दिल्लीत आपल्या सेनापतींना न बोलावताच कोकणात नाणार आणायचा म्हणून वाटाघाटीही करून टाकल्या त्यांनी. त्यावर आपण नाणार नाही म्हणजे नाही! अशी वाघगर्जना केली की घाबरल्याचं नाटक करून आपल्या भेटीची वेळ मागत आले. पण बरं झालं साहेब, आपण भेटणार नाही, जा तिकडंऽऽऽ असं खडसावून सांगितलं... पण एवढ्यावर गप्प बसतील तर ते कसले. लगेच दुसºया दिवशी म्हणतात, चर्चा करून प्रश्न सोडवू, पण नाणार कोकण भूमीतच करू... सध्या ते मोठे भाऊ म्हणून वावरतात, त्यामुळे प्रजेला पण त्यांचं खरं वाटतं. शिवाय आपल्याशी चर्चा केली की प्रश्न सुटतो असं म्हणताना त्यांनी चर्चा या शब्दावर नको तेवढा जास्तीचा जोर दिल्यामुळे आम्हाला आपली नाही पण आमचीच काळजी वाटू लागली साहेब. त्यामुळेच आपल्याला कुणी गंभीरपणे घेत नाही साहेब.
जाता जाता साहेब, एक विचारू, सगळे म्हणतात की आपल्या मंत्र्यांचे राजीनामे भिजू नयेत म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले म्हणे. खरं आहे का साहेब ते...?


(तिरकस)

Web Title: Saheb, do you want to go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.