- अमेय गोगटे

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट उसळल्याचं आपण पाहिलं. तशीच एक लाट २००६ मध्ये महाराष्ट्रात आली होती. ती होती, राज ठाकरे यांची. 'कृष्णकुंज'समोरच्या अरुंद गल्लीत आपण शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करत असल्याचे संकेत त्यांनी दिले होते आणि राज्याच्या राजकारणात वादळ आलं होतं. त्यावेळी स्मार्टफोन नव्हते, फेसबुक-व्हॉट्सअॅप नव्हतं, एकही मराठी वृत्तवाहिनी नव्हती, तरीही 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय', हे वाक्य महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलं होतं, मनाला भिडलं होतं आणि आबालवृद्धांना अक्षरशः 'याड'च लागलं होतं. या भावनेच्या, लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत स्वरराज ठाकरे महाराष्ट्रभर फिरले होते आणि उभी राहिली होती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लाखो मराठीजनांची, महाराष्ट्रीयांची स्वप्नं, आशा-आकांक्षांच्या पायावर मनसेचा डोलारा उभा राहिला होता. पण, ही लाट जितक्या वेगात आली, तितक्याच वेगाने ओसरली. महाराष्ट्र हीच आपली सीमा असेल, असं राज यांनी जाहीर केलं होतं खरं; मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या चाकोरीतच ते अडकून राहिले. त्यामुळे मनसेचंच 'नवनिर्माण' करण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. विशेष म्हणजे, ही गोष्ट चक्क राज यांनी 'मनसे' मान्य केलीय आणि दहा वर्षांपूर्वी - पक्षबांधणीसाठी जो मार्ग स्वीकारला होता तोच पुन्हा स्वीकारलाय. त्यामुळे त्यांचं 'इंजिन' योग्य ट्रॅकवर चालतंय, असं म्हणता येऊ शकेल.  

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा केला होता. आपल्या समर्थकांना काय वाटतंय, किती जण आपल्यासोबत आहेत, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं मत काय, नवा पक्ष काढला तर काय होईल, याची चाचपणी करण्यासाठी ते राज्यभर गेले होते. या दौऱ्याचा पहिला टप्पा मुंबई-ठाणे-नाशिक-धुळे-औरंगाबाद असा होता. या दौऱ्यात पत्रकार म्हणून सहभागी होता आल्यानं तेव्हाचा माहोल जवळून बघता आला. राज यांच्या गाड्यांमागे बाईकस्वार तरुणांच्या रांगा, अनेक गावांच्या वेशीवर होणारं स्वागत आणि जयजयकार, राज ठाकरेंच्या भेटीसाठी शासकीय निवासस्थानांबाहेर जमणारी गर्दी, त्यांच्या सभांना मिळणारा तुफान प्रतिसाद हे सगळं अद्भुतच होतं. ही गर्दी जमवलेली नव्हती. कारण, राज ठाकरे आपल्यासाठी काहीतरी करतील, अशी आशा तरुणाईच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होती. पण, त्यानंतर काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. राज ठाकरे यांची कोरी पाटी मतदारांनी भरली, पण मनसेनं त्यांची स्वप्नं पुसून टाकली. म्हणूनच, राज यांची पाटी पुन्हा कोरी झालीय. या धड्यातून बोध घेतला नाही तर पक्षाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकेल, याची जाणीव 'साहेबां'ना झाली असावी. म्हणूनच त्यांनी 'खेड्याकडे चला' हा गांधीजींचा मंत्र अवलंबला.  

राज ठाकरे नुकतेच विदर्भात जाऊन आले. विशेष म्हणजे, या दौऱ्यात त्यांचा भर शहरी भागांवर नव्हता. ते आदिवासी भागांत गेले, लोकांना भेटले, त्यांच्या घरी जेवले, ते कशा परिस्थितीत जगताहेत हे त्यांनी अनुभवलं. अर्थात, असं करणारे ते काही पहिले नेते नाहीत. असे फंडे वापरून मतं मिळतातच असंही नाही. पण, राज यांचं जमिनीवर बसणं बरंच काही सांगून जाणारं आहे. त्यांना 'इंजिन' रुळावरून घसरू द्यायचं नाहीए, फक्त उपद्रवमूल्य असलेला पक्ष ही मनसेची प्रतिमा ते बदलू इच्छितात. तसंच, आपल्यावरचा 'शहरी' हा शिक्काही त्यांना पुसायचा आहे. हे काम सोपं कधीच नव्हतं. त्यात, १२ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असल्यानं राज यांच्यासाठी तर ते महाकठीण झालंय. पण, एक गोष्ट त्यांना मोठा आधार देणारी आहे. या दौऱ्यादरम्यान ती प्रकर्षाने जाणवली. राज ठाकरे यांच्याबद्दलचं आकर्षण, त्यांची क्रेझ अजूनही कायम आहे. 

आता, गर्दी आणि मतदानाचा संबंध नसतो, हे शंभर टक्के खरं. या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी राज यांना बरेच कष्ट घ्यावे लागतील, हेही बरोबर. पण किमान आपल्यासोबत एवढा जनसमूदाय आहे, हे पाहून त्यांना - मनसेला नवी उमेद नक्कीच मिळाली असेल. २००६ मध्ये त्या जोरावरच पक्षस्थापनेचं मोठं पाऊल राज यांनी टाकलं होतं. त्यानंतर जो चमत्कार घडला होता, तशीच जादू पुन्हा घडवायची असेल तर राज यांना उक्तीतून नव्हे, तर कृतीतून मतदारांमध्ये विश्वास जागवावा लागेल. त्याच्याकडे वक्तृत्व आहेच, पण आजची तरुणाई कर्तृत्व पाहून मतदान करते. राज कितीही ओरडून नाशिकच्या विकासाबद्दल बोलत असले, तरी मतदारांनी त्यांना नाकारलं, हे वास्तव आहे. पुढे जायचं असेल, तर झालं-गेलं गोदावरीत विसर्जित करून त्यांना पुढे जावं लागेल. 

राज ठाकरे हेच मनसेचा आवाज-आधार आहेत. दुसरा प्रभावी चेहरा त्यांच्याकडे नाही. अमित ठाकरे राजकारणात हळूहळू सक्रिय होत आहेत. त्यांना अजून स्वतःला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच, आत्ता तरी राज हेच पक्षाचा हुकमी एक्का आहेत. ते प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नसले, तरी ‘राजगडा’वरून महाराष्ट्रभर बारीक लक्ष नक्कीच ठेवू शकतात. आपले पदाधिकारी, कार्यकर्ते काय करताहेत, जनतेची कामं होताहेत की नाही, पक्षांतर्गत कुरघोडीचं काय, मतदार मनसेच्या कामावर समाधानी आहेत का, याची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही-कारवाई करू शकतात. हे कामही इतक्या वर्षांत प्रभावीपणे झालं नाही. त्यामुळे पक्षाची बांधणी होऊ शकली नाही. ही चूक राज यांना सुधारावी लागेल. कार्यकर्त्यांच्या भक्कम फळीमुळे शिवसेना वाढली – टिकली. ते गणित राज यांना जमवावं लागेल.  

राजकारण म्हटलं की टीका, आरोप-प्रत्यारोप आलेच. गेल्या काही काळापासून राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. मग ते व्यंगचित्रांमधून असेल किंवा सभा – पत्रकार परिषदांमधून. त्यापेक्षा महाराष्ट्रातले मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाणं त्यांना जास्त फायद्याचं ठरू शकतं. दिल्लीतले विषय गल्लीत मांडण्यात काहीच अर्थ नाही. बरं, ते सोडवणंही आपल्या हातात नाही. याउलट, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात मनसेनं आंदोलन छेडलं होतं. तेव्हा, मुंबईकरांनीही मोकळ्या रस्त्यांवरून, फुटपाथवरून, ब्रीजवरून चालताना मनसेचे ‘मनसे’ आभार मानले होते. नागरिकांच्या किंवा ग्रामस्थांच्या अशा समस्या शोधून मनसेला आंदोलनं करावी लागतील. 

राज ठाकरे यांनी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा दिला होता आणि तो अंमलातही आणला. पण, आता ते विरोधी ऐक्याचा सूर आळवताना दिसताहेत. शरद पवार – राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढताना दिसतेय. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे या मैत्रीला हरकत असायचं कारण नाही. परंतु, या दोस्तावर मनसैनिकांचा तरी ‘भरोसा हाय का?’, याची शहानिशा राज यांनी करून घ्यायला हवी. 

2019 हे वर्षं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी, भाजपासाठी, राहुल गांधींसाठी, काँग्रेससाठी जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते राज अन् मनसेसाठीही निर्णायक आहे. किंबहुना, ही त्यांच्या अस्तित्वाचीच लढाई आहे. त्यामुळे रामदास स्वामींच्या ओवीत थोडासा बदल करून, पहिले ते शहाणपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण, सर्वांविषयी, असं राज यांना वागावं लागेल. 
 


Web Title: Raj Thackeray has to build strong political strategy for mission 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.