प्लास्टिकमुक्तीसाठीचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:33 AM2017-12-14T02:33:44+5:302017-12-14T02:33:56+5:30

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा.

Plastic steps | प्लास्टिकमुक्तीसाठीचे पाऊल

प्लास्टिकमुक्तीसाठीचे पाऊल

Next

कोल्हापूरकरांनी एकदा ठरवले की ते करून दाखविणारच, अशी त्यांची ख्याती आहे. आज कोल्हापूरचे नाव अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्यात भर टाकण्यासाठी कोल्हापूरकरांनी आता चंग बांधला आहे तो शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा. त्यादिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

कोल्हापुरी जगात भारी, असा एक वाक्प्रचार बोलीभाषेतून पुढे आला आहे. त्यामध्ये कोल्हापुरी किंवा कोल्हापूरकर असण्याचा एक स्व-अभिमान आहे. त्याचवेळी काहीतरी वेगळे, विधायक करण्याची प्रेरणाही आहे. त्यानुसार सर्वच पातळीवर वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला जातो. कोल्हापुरातील क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंट या संस्थेनेही असाच जगात भारी काहीतरी करून दाखविण्याचा विडा उचलला आहे.
परवा रविवारच्या आठवडी बाजारात या संस्थेने २० हजार कापडी पिशव्या भाजीपाला, फळे खरेदी करण्यासाठी आलेल्यांना मोफत वाटल्या. शहराला प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने नेणारे हे आणखी एक पाऊल होते. गेल्या नवरात्रोत्सवावेळी ऐतिहासिक भवानी मंडपात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठीसुद्धा अशीच एक मोहीम राबविण्यात आली होती. छत्रपती घराण्याच्या मोठ्या सूनबाई संयोगिताराजे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरातील फळे, फुले, नारळ, कापूर, उदबत्ती, आदी विक्री करणाºयांना एकत्र करून बैठक घेतली. प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्याच विक्रीसाठी ठेवाव्यात आणि पाच रुपये प्रती पिशवी या दराने त्या विकाव्यात असा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला. भवानी मंडप प्लास्टिकमुक्त झाला. आता कोल्हापुरातील सर्व भाजीपाला बाजारपेठांत ही मोहीम क्लीन अ‍ॅण्ड ग्रीन सिटी मुव्हमेंटमार्फत राबविण्यात येत आहे.
आपल्याकडे एखादी मोहीम राबविण्याची संकल्पना पटली की, ती यशस्वी करणे अशक्य नाही. कारण मनुष्यबळ भरपूर आहे. तसेच देवाण-घेवाण मोठी असते. जुन्या कपड्यांपासून पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय अनेकांना रोजगार देऊन जाऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापनात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचा फार मोठा अडथळा आहे. ते प्लास्टिक नष्ट करण्याची सोपी पद्धत नाही. शिवाय ते ओल्या कचºयाबरोबर एकत्र आले तर ते वेगळे करणे कठीण असते. पुण्यात १४०० ते १६०० टन दररोज घनकचरा तयार होतो. सोलापुरात ६०० तर सांगली, कोल्हापुरात प्रत्येकी २०० टन घनकचरा प्रतिदिन तयार होतो.
या घनकचºयाचे वर्गीकरण घरा-घरांपासून होत नाही. त्यातील प्लास्टिक हा सर्वात मोठा अडसर आहे. नागरिकांनीच प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचा निर्धार केला, तर घनकचºयाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी प्लास्टिकमुक्तीसाठी उचललेले पाऊल फार महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व शहरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्याला नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनीही साथ दिली तर अशक्य काही नाही.

Web Title: Plastic steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.