राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण!

By अतुल कुलकर्णी | Published: June 12, 2018 01:28 PM2018-06-12T13:28:13+5:302018-06-12T13:37:11+5:30

पक्षातील नेते मंडळी आणि पोटनिवडणुकीत परक्या पक्षातलेच लोक घेऊन विजयी होता येते यावर भाजपाने केलेले शिक्कामोर्तब, असे अनेक कंगोरे या निकालामागे आहेत.

NCP is the reason for the defeat! | राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण!

राष्ट्रवादीच्या पराभवास राष्ट्रवादीच कारण!

Next

लातूर उस्मानाबाद, बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालाचे अनेक अर्थ आहेत. भाजपाचे सुरेश धस येथून विजयी झाले. मात्र या निकालाने दोन्ही काँग्रेसची आपपासातील दुफळी, राष्ट्रवादीत धनंजय मुंडे यांचे उभे रहात असलेले नेतृत्व; डोळ्यात सलणारी त्यांच्याच पक्षातील नेते मंडळी आणि पोटनिवडणुकीत परक्या पक्षातलेच लोक घेऊन विजयी होता येते यावर भाजपाने केलेले शिक्कामोर्तब, असे अनेक कंगोरे या निकालामागे आहेत.

ज्यावेळी या मतदारसंघातील निवडणूक कोणी लढवायची याची चर्चा सुरु झाली त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अशोक जगदाळे यांचे नाव पुढे केले होते. मात्र हे नाव अमरसिंह पंडीत, राणा जगजितसिंह यांना सोयीचे नव्हते. त्यामुळे जगदाळे यांचे नाव पुढे येताच रमेश कराड यांचे नाव पंडीत यांनी पुढे केले. कराड यांना आधी अजित पवार यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी मोठ्या पवारांची परवानगी घ्या असे सांगितल्यानंतर कराडांना थेट राष्ट्रवादीचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापुढे नेण्यात आले. पवारांनी सगळ्यांची एकत्रित बैठक घेतली. त्या बैठकीतही धनंजय मुंडे यांनी वेगळे मत मांडले. त्यांचे मत साधे होते की जी व्यक्ती भाजपात गेली अनेक वर्षे आहे, त्या व्यक्तीचे त्या पक्षात कोणाशीही वाद झालेले नाहीत, कोणी त्यांना त्रास दिलेला नाही, अशी व्यक्ती अचानक उठून येते आणि राष्ट्रवादीत प्रवेश करायचा मनसुबा व्यक्त करते हे सगळे चुकीचे वाटत आहे, असे मुंडे कायम सांगत होते. मात्र अमरसिंह पंडीत आणि राणा पाटील यांना जगदाळे नकोच असल्याने त्यांनी खिंड लढवली आणि कराड यांचा भाजपा प्रवेश झाला. त्याआधी सुत्रांनी सांगितल्यानुसार शरद पवार यांनी विश्वनाथ कराड यांना फोन करुन रमेश कराड राष्ट्रवादीत येणार का? असे विचारले ही होते. त्यावर त्यांनीच हमी घेतल्याने पवार ही या प्रवेशाला तयार झाले होते.

गाजावाजा केला गेला. मात्र अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी कराडांनी कोणालाही न विचारता अर्ज परत घेतला व ते पुन्हा भाजपात गेले. तेव्हा मुंडे यांना दणका अशा बातम्या सुरु झाल्या. त्यावर शरद पवार यांनी ‘या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे वेगळे मत होते’, अशी प्रतिक्रिया दिली होती.

अर्ज भरण्याची मुदत निघून गेली होती. जगदाळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होताच. त्याचा आधार घेत राष्ट्रवादीने शेवटी जगदाळे यांना पाठींबा दिला आणि ही निवडणूक लढवली. मात्र स्वत:कडे विजयी होण्याएवढे संख्याबळ असतानाही काँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांनीच आपापसात खेळी करुन स्वत:चा उमेदवार स्वत:च पाडला. काँग्रेस असो की राष्ट्रवादी हे दोन पक्ष स्वत:ला स्वत:च हरवू शकतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले. 

या सगळ्यात ना अमित देशमुखांनी मदतीचा हात दिला ना अमरसिंह पंडीत आणि राणा पाटील यांनी. विजयानंतर सुरेश धस म्हणाले, घड्याळ हातात घातलेल्यांनी मला मदत केलीय... याचा अर्थ न समजण्याएवढे अज्ञानी येथे कोणीच नाही. तर पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकीय खेळी खेळता येत नसेल तर राजकारणात येऊ नये... 

यात पंकजा मुंडे यांना त्यांच्या भावांनीच मदत केली असे बोलले जात आहे, यात एक मानलेले  बंधू रमेश कराड यांनी उघड मदत केली, तर दुसरे मानलेले बंधू आ. अमित देशमुख यांनी पडद्याआड मदत केल्याचे बोलले जात आहे. मुंबईतुन शिवसेनेने कोणाला मदत केली आणि कामगार मंत्री संभाजी पाटील यांचा निलंगा कोणत्या दिशेला होते याची चर्चा तर मतदान झाल्या दिवसापासून होतेय.

या सगळ्यात कोणी कशी खेळी खेळली हे समोर आले आहे. एकीकडे राज्यात व देशात मोदी व भाजपा सरकारच्या विरोधात वातावरण तयार होत असताना त्याचा फायदा घेत ऐकेक जागा जिंकत पुढे जाण्याची रणनिती आणख्याऐवजी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थी राजकारणाला जास्ती महत्व दिले. परिणामी ‘परसेप्शन’च्या राजकारणात भाजपाने स्वत:कडे स्वपक्षीय उमेदवार नसताना बाजी मारली.

राष्ट्रवादीत धनंजय मुंडे यांचे नेतृत्व उभे रहात होते. त्याला कशी खीळ घातला येईल यासंधीच्या शोधात असणाऱ्यांना आयती संधी चालून आली आणि राष्ट्रवादीत तरुण चेहरा पुढे येत असताना तो सोयिस्कररित्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. जर या जागी अशोक जगदाळे ऐवजी अन्य कोणताही उमेदवार असता तर राष्ट्रवादीने ही निवडणूक जिंकली असती आणि त्यावेळी याच जिल्ह्यातील अन्य नेते आम्हीच कसा विजय खेचून आणला याचे गोडवे गाताना दिसले असते. मात्र आज त्याच नेत्यांनी धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का अशा बातम्यांचा आनंद घेणे सुरु केले आहे.

या निकालाने पक्षीय हीतापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष असल्याचे स्पष्ट झाले. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एवढे वातावरण असताना त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी पक्षातले व्यक्तीगत मतभेद बाजूला सारुन पुढे येण्याऐवजी दोन्ही काँग्रेस नेत्यांनी स्वत:चाच स्वार्थ पाहिला. याचे चांगले वाईट परिणाम येत्या काळात जे काय व्हायचे ते होतील. पण अंतर्गत दुहीचा फायदा भाजपाने मिळवला आहे हे नक्की.

निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या सुरेश धस यांना भाजपाने उमेदवारी दिली आणि त्यात धस विजयी झाले. पालघरमध्ये देखील काँग्रेसमधून भाजपात आलेल्या राजेंद्र गावित यांना भाजपाने उमेदवारी दिली व गावित विजयी झाले. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात कायम भाजपाने लढा दिला त्याच पक्षातल्या नेत्यांना स्वत:च्या पक्षात आणून त्यांच्यासाठी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावून; त्यांना विजयी करण्याची वेळ भाजपा आणि त्यांच्या धुरिणांवर आली यातच सगळे काही आले. 

- अतुल कुलकर्णी  , www.atulkulkarni.in

Web Title: NCP is the reason for the defeat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.