नारायणराव, स्वत:ला जरा जपाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 03:19 AM2017-09-27T03:19:20+5:302017-09-27T03:19:32+5:30

पक्षांतराचे फळ नेहमीच पदाच्या रूपाने मिळते असे नाही. खूपदा पक्षांतरितांना कुजवलेही जाते. एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे.

Narayanrao, yourself a little bit | नारायणराव, स्वत:ला जरा जपाच

नारायणराव, स्वत:ला जरा जपाच

Next

- सुरेश द्वादशीवार

पक्षांतराचे फळ नेहमीच पदाच्या रूपाने मिळते असे नाही. खूपदा पक्षांतरितांना कुजवलेही जाते. एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे. अशी कुजणारी माणसेही आता सा-यांच्या चांगल्या परिचयाची आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल एवढी सारी पदे काँग्रेसच्या कृपेने अनुभवलेले एस.एम. कृष्णा हे त्यांची पदे जाताच कासावीस होऊन भाजपमध्ये दाखल झाले. ते भाजपवासी झाल्याची खात्री पटल्यानंतर मात्र त्या पक्षाने आर्थिक अन्वेषण विभागामार्फत त्यांच्या चौकशा करून त्यांच्या जावयाची साडेसहाशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. आता कृष्णा अडकले आहेत. भाजपमध्येही त्यांचा जीव आता कासावीस होत असणार आणि काँग्रेसमध्ये परतण्याचे तोंड त्यांना उरले नसणार. काँग्रेस पक्ष सत्तेवरून पायउतार झाला तेव्हा या कृष्णांसारखा विचार करणारे त्याचे अनेक जुने व नवेही पुढारी पक्षांतर करताना दिसले. त्यात मंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार व आमदार तर होतेच शिवाय थेट म्युनिसिपालिटी, सुधार प्रन्यास व सहकारी बँकांचे पुढारीही होते. त्यातल्या काही शहाण्यांनी आपली पोरे भाजपात पाठवली व काँग्रेस पुन्हा कधी सत्तेवर येईल या आशेने त्या पक्षाचा उंबरठा ओलांडला नाही.
एक माजी मंत्री तर एकेकाळी म्हणत, ‘माझ्या कातड्याचे जोडे पवारांच्या पायात घातले तरी त्यांचे माझ्यावरील उपकार कमी व्हायचे नाहीत.’ पुढे त्यांनी विलासरावांच्या पायाचे माप घेऊन त्यासाठी आपल्या कातड्याचे जोडे तयार केले. आता गडकºयांच्या मापाचे तसेच जोडे तयार करायला त्यांनी दिल्याची बातमी आहे. ही माणसे एवढी कातडी जमवितात कशी आणि अंगावर वाहतात कशी याचेही मग आपल्याला आश्चर्य वाटावे. शिवाय हे पुढारी सहकुटुंब पक्षांतर करतात. सध्या नारायण राणे त्या वाटेवर आहेत. त्यांनी कधीकाळी ठाकºयांची व सोनिया गांधींची पूजा बांधली. तिचा प्रसाद म्हणून त्यांना मुख्यमंत्रिपद हवे होते. ठाकºयांनी ते दिले, सोनिया गांधींनी ते दिले नाही. आता हा बाणेदार माणूस भाजपच्या वाटेवर आहे. त्यांना एस.एम. कृष्णांची आठवणच तेवढी करून द्यायची.
भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. कोणतेही पद तो संघातून भाजपत आलेल्यांखेरीज इतरांना देत नाही. १९६० च्या दशकात त्याच्या जनसंघावताराने दिल्ली महापालिका जिंकली तेव्हा तिचे मेयरपद त्याने दिल्लीचे संघचालक लाला हंसराज गुप्ता यांना दिले. आताचे त्याचे मुख्यमंत्री पाहिले की त्यातही या इतिहासाची पुनरावृत्ती दिसेल. फडणवीस, रमण सिंग, चौहान, आदित्यनाथ, खट्टर ही माणसे संघातून भाजपत आलेली आहेत. त्यामुळे तो पक्ष फडणवीसांची जागा राण्यांना देईल असे समजण्यात हशील नाही आणि दुय्यम दर्जाच्या पदात राण्यांनाही रस नाही.
प्रत्येक पक्षाची एक प्रकृती असते. काँग्रेस हा बिनाकुंपणाचा व बिनाभिंतीचा खुला पक्ष आहे. तो साºयांसाठी सारे काही आहे. तो डावा आहे, उजवा आहे आणि डावा-उजवाही (लेफ्ट-राईट) आहे. भाजप हा आतून बंद असलेला व बंद दरवाजाची कुलूपे संघाकडे ठेवलेला पक्ष आहे. त्यात राणे गेले तरी त्यांच्या मागे लागू शकणारा इडीचा ससेमिरा संपणार नाही. अर्थात ते तसे अभिवचन घेतल्यावाचून भाजपत जायचेही नाहीत. पण घटस्थापनेचा मुहूर्त ते तरी कितीकाळ लांबवणार? त्यांच्या मागे लोंबकळणारी माणसे तरी त्याची किती वाट पाहणार? एखाद्याला दाराबाहेर कुजवत ठेवून त्याला त्याची किंमत कमी करायला लावण्याची हातोटीही भाजपजवळ आहे. अशी कुजणारी माणसेही आता साºयांच्या चांगल्या परिचयाची आहेत. राण्यांचे तसे होऊ नये. ‘तो बैलासारखे काम ओढणारा माणूस आहे’ असे सर्टिफिकेट त्यांना बाळासाहेब ठाकºयांनी दिले आहे. दहशत म्हणावी एवढा त्यांचा दरारा कोकणापासून मुंबईपर्यंत राहिला आहे. मात्र त्यानंतर त्यांच्या मागे खडशांसारखी झेंगटे लागली तर मग ते आणखीच अवघड. राण्यांनी फडणवीसांसोबत गुजरातला जाऊन मोदी आणि शाह यांची भेट घेतली. मात्र परतल्यानंतर त्या भेटीची परिणती दोघांनीही सांगितली नाही. तथापि, राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यात कुणाचे नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. शिवाय त्या खेळातली फसवणूकही बदनामी टाळायला बोलून दाखविता येत नाही. म्हणून म्हणायचे, नारायणराव, जरा जपा.

Web Title: Narayanrao, yourself a little bit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.