दुष्काळाचे कालचक्र सोडेना महाराष्ट्राची पाठ

By सुधीर महाजन | Published: November 1, 2018 05:43 PM2018-11-01T17:43:45+5:302018-11-01T17:49:31+5:30

चव्वेचाळीस वर्षांपूर्वी १९७४ साली दुष्काळाने ग्रामीण महाराष्ट्राची घडी जी विस्कटली ती पुन्हा सावरता आली नाही.

Maharashtra trapped in droughts dark shadow | दुष्काळाचे कालचक्र सोडेना महाराष्ट्राची पाठ

दुष्काळाचे कालचक्र सोडेना महाराष्ट्राची पाठ

googlenewsNext

- सुधीर महाजन

चव्वेचाळीस वर्षांपूर्वी १९७४ साली दुष्काळाने ग्रामीण महाराष्ट्राची घडी जी विस्कटली ती पुन्हा सावरता आली नाही. त्यानंतरही दुष्काळ पडला नाही असेही नाही मराठवाडा, विदर्भाच्या तर तो पाचवीला पुजलेला. दोन वर्षे बरी एक वर्ष चांगले आणि दोन वर्षे दुष्काळ असे कालचक्र काही वर्षांत आकाराला येत आहे आणि प्रत्येक दुष्काळाची तुलना ७२ च्या दुष्काळाशी केली जाते. त्याच निकषावर सामान्य माणूस परिस्थिती तपासतो. त्यावेळी खायला अन्न नव्हते. जनावरांना चारा नव्हता, हाताला काम नव्हते. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती; पण आजच्याइतकी जीवघेणी नव्हती.

दुष्काळग्रस्तांना काम देण्यासाठी रोजगार हमी योजना आली. ही महाराष्ट्राने देशाला दिलेली नवी कल्पना वि.स. पागे यांनी ती मांडली व पुढे सरकारने अमलात आणली. जिचे अनुकरण अनेक राज्यांनी केले. हाताला काम असेल, तर पैसा येतो व परिस्थितीशी झगडण्याचे बळही येते. एक आश्वासक वातावरण निर्माण होते. १९७२ पासूनच टँकर, रोजगार हमी, सुखडी या गोष्टी अस्तित्वात आल्या आणि पोटभरण्यासाठी शहरांची वाट तुडवणारी माणसेही. ही वाट आजही वाहते आहे. एकदा खेडे सुटले की माणूस परतत नाही. जे काम गावात करायची लाज वाटते ते शहरात बिनदिक्कत करतो.

दुष्काळाचा इतिहास तपासला तर पार मागे जावे लागते. ७२ चा दुष्काळ हा २० व्या शतकातील मोठा आणि दूरगामी परिणाम करणारा समजला जातो. 
मराठवाड्याला दुष्काळ तसा नवा नाही. अगदी ताजा विचार करायचा, तर २०१० पासून आठ वर्षांत मधली दोन वर्षे चांगल्या पावसाची सोडली, तर दुष्काळाचा ससेमिरा कायम आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला तर पार यादवांच्या काळापासून या दुष्काळाने पाठ सोडली नाही. देवगिरीच्या पतनानंतर १३२२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. अलाउद्दीन खिलजीची त्यावेळी राजवट होती. परकीय आक्रमण आणि दुष्काळ यात जनता भरडली गेली. पुढे १३९६ ते १४०७ हा सलग ११ वर्षांचा मोठा दुष्काळ इतिहासात ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ या नावाने प्रसिद्ध आहे. या दुष्काळाचे वर्णन साहित्यातून, धार्मिक ग्रंथातून आले आहे. रस्त्यावर पडलेले मृतदेह, जनावरांचे सांगाडे या चित्रणावरून त्याची भीषणता जाणवते.

पुढे १६२६ मध्ये मोठ्या दुष्काळाची नोंद आहे. दिल्लीत लोधी घराण्याची राजवट मोगलांनी संपुष्टात आणली आणि इकडे देवगिरीच्या सुभेदारीवरून आझम खानला पायउतार व्हावे लागले त्यावेळी भीषण दुष्काळ पडला. हा दुष्काळ पुढे बरीच वर्षे चालला त्यावेळी मोगल सम्राट शहाजहानने दर आठवड्याला जनतेला पैसे वाटण्याची पद्धत सुरू केली व यासाठी पाच जणांची नियुक्ती केली. यात दख्खनसाठी आजम खानचा समावेश होता. या काळात २० आठवडे दर सोमवारी पाच हजार रुपयांचे जनतेत वाटप केले जात होते. सरकारने सगळीकडे कामे सुरू केली होती. 

पुढे मोठा दुष्काळ औरंगजेबाच्या मराठ्यांवरील आक्रमणाच्या वेळी होता. शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि उद्भवलेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला. तो हा काळ त्यावेळी ज्वारी व भाताची पेरणी झाली नव्हती. १७०३ ते १७०७ हा दुष्काळाचा आणखी एक फटका. या काळात मराठ्यांनी मोगलांना जेरीला आणले होते. दख्खनमध्ये अन्नधान्याची टंचाई असल्याने उत्तरेकडून मोगलांनी धान्याचा पुरवठा सुरू केला. त्यावेळी अजिंठा घाटात मराठ्यांनी या धान्याची लूट केली. हा दुष्काळ औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत कायम होता. १७४९ च्या दुष्काळात ज्वारी ८० रुपये पल्ला या दराने विकली गेली, तर १७८७ च्या दुष्काळात १ रुपयाला ९ शेर ज्वारी या दराची नोंद आहे. 

दुष्काळाचा पहिला सरकारी अहवाल निजाम राजवटीत करण्यात आला. १८७५-७६ साली मौलवी महदी अली यांनी हा अहवाल त्यावेळी सादर केला होता. त्यावेळी अपेक्षित उत्पन्न व झालेले उत्पन्न याचा ताळेबंद मांडण्यात आला. बाजारपेठेतील धान्याच्या आवक-जावकची नोंद झाली. दुष्काळ व आक्रमण यातच महाराष्ट्राची १३०० ते १८०० अशी पाचशे वर्षे गेली पुढे परचक्र संपले; पण दुष्काळ पाठ सोडत नाही.

Web Title: Maharashtra trapped in droughts dark shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.