बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’!

By प्रगती पाटील | Published: December 21, 2023 08:13 AM2023-12-21T08:13:43+5:302023-12-21T08:14:01+5:30

लग्न रखडलेल्या युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या, ‘यादी पे शादी’चे आमिष नाकारणे कठीण झालेली अगतिक कुटुंबे आणि एक नवी डोकेदुखी!

If it is 'auspicious' with a bogus bride, 'caution'! | बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’!

बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’!

-प्रगती पाटील, उपसंपादक/वार्ताहर लोकमत, सातारा

पैशांचा पाऊस पाडतो, सरकारी नोकरी लावतो, भूतबाधा दूर करतो असे काहीबाही सांगून आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांनी एकेकाळी समाज ढवळून काढला होता. झटपट श्रीमंत होण्याचे हे प्रकार कालोघात लुप्त होऊ लागले आहेत. त्यांची जागा घेतलीये  ऑनलाइन फ्राॅड, ओटीपी मागून फसवूक, क्रेडिट कार्ड स्कॅमसारख्या आधुनिक फसवणुकींनी. या सर्वच फसवणुकींमध्ये कळस केलाय तो बोगस नववधूंनी! लोकांच्या अगतिकतेचे भांडवल करून फसवणूक करणाऱ्या या नववधूंच्या समृद्ध टोळीचे नेटवर्क आता राज्याबाहेरही पसरू लागले आहे.  अनेक घरांमध्ये यातून केवळ मनस्ताप शिरला आहे. काहींनी तर आयुष्याला अर्थ नाही म्हणून अवघ्या तिशीतच मृत्यूलाही कवटाळले आहे.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना आहे. भविष्याच्या स्वप्नांमध्ये रममाण होताना आपली सहचारिणी आणि तिच्यासोबत गुंतलेली स्वप्ने फक्त मुलगा एकटा बघत नाही, त्याच्याबरोबर त्याचे पालकही या प्रक्रियेमध्ये सामील झालेले असतात. मुलींचे घटते प्रमाण (आणि वाढत्या अपेक्षा) लक्षात घेता अनेक विवाहेच्छुक तरुणांची लग्ने हल्ली रेंगाळताना दिसतात. या पार्श्वभूमीवर घरीदारी कसली चौकशी न करता केवळ चांगली मुलगी हा एकमेव निकष लावून लग्न ठरविण्याची नवी पद्धत रुजू लागली आहे. 

कमी शिक्षण, बेताचीच नोकरी-व्यवसाय, किंवा मग बेभरवशाची शेती असलेल्या तरुण मुलांना तिशी उलटली तरी लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हे हेरून खोटी लग्ने लावण्याचा एक नवाच ‘धंदा’ सध्या तेजीत असून,  तोतया टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. लग्नाचे वय वाढत असलेल्या तरुणांच्या घरात अनेक प्रकारची युद्धं सुरू असतात. अनेक पातळ्यांवर तडजोड करण्याची तयारी केल्यानंतरही मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने सगळ्यांचीच मानसिकता कोलमडते. यातच कोणीतरी एजंट येऊन आशेचा किरण दाखवतो. लग्नाला तयार असणाऱ्या मुलीचा ‘तपशील’ कळतो. ‘हुंडाबिंडा, मानपान सोडाच; लग्नाचा सगळा खर्चही आम्हीच करतो, तुम्ही फक्त मुलगी द्या’ अशा काकुळतीला आलेले मुलाचे पालक घाईघाईत सोहळा ठरवतात.  एजंटही ‘यादी पे शादी’ करण्याच्या कबुलीवरच मुलीला दाखवायला आणतात. यात (बोगस) मुलीचे (बोगस) नातेवाईकही उभे केलेले असतात. या कुटुंबाविषयी कसलीही माहिती न घेता, त्यांची कसली चौकशीही न करता हे लग्न उरकले जाते.  - हे सारे पार पडले की  लग्न करून घरी आलेली नववधू अंगावरची हळद उतरण्याच्या आतच दागदागिने घेऊन पसार होते. एजंटला याविषयी जाब विचारावा, तर तो आधीच नामानिराळा झालेला असतो. मग कुटुंबाला धक्का, आर्थिक फसवणूक आणि जखमेवर मीठ चोळावे तशी सामाजिक मानहानी! यातून येणाऱ्या नैराश्यातून नवऱ्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही झळकू लागल्या आहेत. 

गर्भातच मुलींचा जीव घेणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या पुढच्या पिढीसाठी लग्न करायला आता मुलगी मिळेना, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. सरकारी आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्षात मुलींचा जन्मदर आणखी घसरल्याचे सामाजिक संस्था सांगतात. त्याशिवाय खेड्यात राहतो म्हणून, शेती(च) करतो म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींची शहरी जोडीदाराची अपेक्षाही या विचित्र त्रांगड्याच्या मुळाशी आहे. हा बोगस लग्नांचा ‘फिल्मी ड्रामा’ पश्चिम महाराष्ट्रात बोकाळला असून, इतर भागातही या  फसवणुकीचे लोण पसरते आहे. लग्न रखडलेले युवक शोधून त्यांच्या कुटुंबीयांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या ही एक नवी डोकेदुखी झाली असून, तत्काळ मुलगी दाखवून लग्न लावून देण्याचे आमिष नाकारणे कठीण अशी परिस्थिती असलेली कुटुंबे वाढत असल्याचेच हे लक्षण होय!  हे चित्र बदलत्या कुटुंबचित्रातल्या अगतिकतेची कहाणी सांगते. ही कहाणी जितकी संतापजनक तितकीच करुण आहे.  कित्येक मुलींचे गळे गर्भातच घोटले गेल्याने, शिक्षण-व्यवसाय-पैसाअडका-लग्न या समीकरणात ‘अवास्तव अपेक्षा’ नावाचे नवे विघ्न येऊ दिल्यानेच तरुण-तरुणींच्या सहजीवनाचे चित्र हे असे भेसूर होत चालले आहे!
pragati.patil@lokmat.com

Web Title: If it is 'auspicious' with a bogus bride, 'caution'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न