वठलेली झाडे बहरणार तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:45 AM2018-03-06T00:45:50+5:302018-03-06T00:45:50+5:30

दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने जमत जाणारी जनतेची नाराजी (अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी इफेक्ट) सत्तेतील सरकारांनाच पराभूत करते असे नाही. तशा नेतृत्वालाही ही नकोसे बनवीत असते. दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या जुन्या पक्षांच्या वाट्यालाच यामुळे जनतेच्या नाराजीला तोंड द्यावे लागते असे नाही. पक्षातील महत्त्वाच्या जागा दीर्घकाळ अडवून बसलेल्या जुन्या व जख्खड नेत्यांनाही ती पक्षात नकोसे करीत असते.

How to grow tired trees? | वठलेली झाडे बहरणार तरी कशी?

वठलेली झाडे बहरणार तरी कशी?

Next

- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)

दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने जमत जाणारी जनतेची नाराजी (अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी इफेक्ट) सत्तेतील सरकारांनाच पराभूत करते असे नाही. तशा नेतृत्वालाही ही नकोसे बनवीत असते. दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या जुन्या पक्षांच्या वाट्यालाच यामुळे जनतेच्या नाराजीला तोंड द्यावे लागते असे नाही. पक्षातील महत्त्वाच्या जागा दीर्घकाळ अडवून बसलेल्या जुन्या व जख्खड नेत्यांनाही ती पक्षात नकोसे करीत असते. काँग्रेस हा सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास असणारा देशातील मोठा पक्ष आहे. १८८५ पासून १९९० पर्यंतचा दीर्घकाळ त्याने देशाचे नेतृत्व करून त्याची सत्ताही राखली आहे. स्वाभाविकच या पक्षात जुन्या व म्हातारपणाकडे झुकलेल्या, ज्येष्ठ आणि वठलेल्या पुढाºयांचा वर्गही मोठा आहे. पक्षात वा राजकारणात निवृत्ती वयाची मर्यादा नसल्याने, चालता-बोलता न येणारे, नवे काही न सुचणारे, आपल्या जुन्या सवयींनाच चिपकून राहणारे आणि काळ बदलला तरी आम्ही ठाम आहोत असे सांगून कालविसंगत होत गेलेले पुढारीही या पक्षात फार आहेत. त्यांना हटविता येत नाही आणि आपली उपयुक्तता संपली हे समजल्यानंतरही पदांना घट्ट चिकटलेली ही माणसे स्वत:हून नव्यांना त्यांची जागा देत नाहीत. त्यातील एखाद्याने तशी ती दिली तरीही ती तो आपल्याच घरातील कुणाला तरी देताना दिसतो. त्यामुळे जाती जशा वंशपरंपरेने चालतात तसा काँग्रेस पक्षही वंशपरंपरेने चाललेला दिसतो. ही बाब केवळ नेहरू-गांधी यांच्याच घराण्याला लागू आहे असे नाही. ती राज्य व जिल्हा पातळीवरही तशीच राहिली आहे.
काही वारसदार कर्तबगारही निपजतात. तशी कर्तबगारी राहुल गांधींसोबत ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट यासारख्या तरुणांनी दाखविली आहे. पण साºयाच पुढाºयांना कर्तबगार पोरे लाभत नाहीत. बापांच्या पुण्याईच्या व पैशाच्या बळावरच त्यातील बरीचशी ‘पुढारी’ बनली आहेत. राणे, भुजबळ, कदम, विखे, चव्हाण, मेघे किंवा देशमुख असे या स्तरावरचे नमुने केवळ महाराष्ट्रातच आहे असे नाही. राष्टÑीय पातळीवर सर्वत्र आढळणारे आहेत. काँग्रेस पक्ष अशा वंशावळीच्या बळावर टिकतो हे पाहून इतरही पक्षांनी (त्यात राष्ट्रीय व प्रादेशिक असे सर्व पक्ष आहेत) त्याचा कित्ता गिरवायला आता सुरुवात केली आहे. तामिळनाडूतील करुणानिधी, आंध्रातील नायडू किंवा त्याआधीचे रेड्डी, राजस्थानच्या वसुंधरा राजे, काश्मिरातील ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती हे सारेच यातले. भाजपही आता याला अपवाद राहिला नाही. त्यातील अनेक नव्या पुढाºयांचे वडील, काके, मामे हेही पूर्वीच्या जनसंघात वा संघात राहिलेले आहेत. ही तºहा थेट जिल्ह्यांच्या पातळीवरही अशीच दिसणारी आहे. वर्षानुवर्षे एखादे घर निवडणुकांना का उभे राहते? त्यातील कुणालाही इतरांना ती संधी द्यावी असे का वाटत नाही? माझ्यानंतर माझा मुलगा वा मुलगीच पदावर आणायला पक्ष ही आपली इस्टेट नाही ही बाब त्यांना कळत कशी नाही? घरात पुरेशी माणसे नसतील तर आपल्या नातेवाईकांना सत्तापदांवर आणण्याचे राजकारण या लोकांना सुचते कसे? आपल्या महाराष्ट्रात एकेकाळी १८ खासदार तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या नात्यातीलच होते की नाही? हा प्रकार नुसत्या अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीचीच चीड आणणारा नाही. तो सत्तेतील साºयाच ‘घरंदाजांविषयीचाही संताप उभा करणारी आहे. आम्ही व आमच्यानंतर आमची पोरे सत्तेवर येतील, तुम्ही मात्र नुसते झेंडे नाचवायचे किंवा आमच्या जयजयकाराच्या घोषणा करायच्या असे मनात आणणारी दुर्बुद्धी या माणसात येते तरी कशी? ती गांधीत का नव्हती? की गांधी यांचे नव्हतेच कुणी?
२०१४ पासून देशात झालेली प्रत्येक निवडणूक काँग्रेसने गमावली आहे. काही थोड्या जागा राहिल्या व मिळाल्या याचेच समाधान सत्ता गमावल्याच्या दु:खाहून मोठे असत नाही. पंजाब जिंकले व कर्नाटक राखले असे म्हणणेही त्यासाठी पुरेसे ठरत नाही. काश्मीर गमावले, हरियाणा-हिमाचल गेले, आंध्र-तेलंगण निसटले, केरळ हिसकावले गेले, गोवा-अरुणाचल हातचे गेले आणि आता नागालॅण्डही हरवले. शिवाय जिथे सत्तेत भागीदारी होती ती राज्येही भाजपाने काँग्रेसकडून काढून घेतली. या स्थितीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्टÑीय पक्षांशी लढत अरविंद केजरीवाल दिल्ली कशी राखतात हे कधीतरी समजून घ्यायचे असते. नवे चेहरे, नवा उत्साह, नवा कार्यक्रम आणि पावलोपावली बड्या सत्ताधाºयांशी झुंज देण्याची तयारी. त्यांचे मंत्री काढले गेले, आमदार तुरुंगात घातले गेले, २० आमदारांचे प्रतिनिधित्व न्यायालयात तुंबले आहे आणि तरीही केजरीवाल आणि सिसोदिया ठाम आहेत आणि लढत आहेत. गमावण्यासारखे काही मागे ठेवले नसल्याने त्यांना हे जमते की सत्तेशी विरोध पत्करल्याने आजचे आणि कालचेही सारे सोडावे लागते या भयाने तसे होते? साºयांचा भुजबळ वा लालू कसा होईल? किंवा साºयांच्याच पोरांना कार्तीचिदंबरम करणे सत्तेला कसे जमेल? जनतेला सत्तेची सूडवृत्ती आवडत नाही. त्यातून काँग्रेस पक्षाचा इतिहास लोकसंघर्षाचा, त्याच्या नेत्यांचा भूतकाळ दीर्घकाळच्या तुरुंगवासाचा आणि शतकाच्या लोकनेतृत्वाचा आहे. पूर्वीची सत्ता विदेशी होती, त्याही स्थितीत तो पक्ष जनतेचे प्रश्न व स्वातंत्र्याचा झेंडा हाती घेऊन लढतच होता की नाही? की ती वृत्तीच आता कमी झाली आहे? माणसे तुरुंगात गेल्याने मोडत नाहीत आणि गोळ्या घातल्याने ‘मरत’ नाहीत. ती मोठी होतात आणि अजरामरही होत असतात. पक्षाचा खरा मृत्यू त्याच्या नेतृत्वाच्या खचण्याने होतो. त्याच्यातील कार्यकर्त्यांच्या मनाने पराभव पत्करल्याने होतो आणि हो, जुनी वटलेली माणसे महत्त्वाच्या जागा अडवून धरतात तेव्हाही तो होतो. आपल्या १००-१२५ वर्षांच्या इतिहासातून काँग्रेस व त्या पक्षाचे कार्यकर्ते काही शिकणार की नाही?
गांधी हा उद्याचा नेता आहे असे टिळक का म्हणाले? आणि गांधींनी १९४२ मध्ये जवाहरलाल हा आपला उत्तराधिकारी आहे असे का म्हटले? त्यांची ध्येयधोरणे वा श्रद्धा तरी कुठे एक होत्या? तरीही त्या कर्तृत्ववानांचे अभिक्रम त्यांनी लक्षात घेऊन त्यांना जागा करून दिल्याच की नाही? वठलेल्या झाडांना पालवी फुटत नाही आणि त्यांच्या सावल्या नव्या रोपांना वाढूही देत नाहीत. पंचाहत्तरी ओलांडलेले, नव्वदीच्या पुढे गेलेले आणि गेल्या ३० वर्षात कर्तृत्वाचा कोणताही ठसा न उमटवलेले कितीजण त्या पक्षात अजूनही केवळ नेतृत्वाच्या कृपेने वा नाईलाजाने अजून त्यांच्या जागावर राहिले आहेत. काँग्रेस पक्ष इतिहासातून काही शिकणार नसला तरी वृक्षराजीच्या व पर्यावरणाच्या वर्तमानापासून तरी काही धडे घेणार की नाही?

Web Title: How to grow tired trees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.