निसर्गदेवतेचे पूजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:55 PM2020-08-26T20:55:49+5:302020-08-26T20:56:09+5:30

- मिलिंद कुलकर्णी कुणी आदिवासी म्हणते, कुणी वनवासी म्हणते, शासकीय भाषेत अनुसूचित जमाती प्रवर्ग म्हणतात. प्रत्येक विचारधारा, सामाजिक व ...

Goddess of nature | निसर्गदेवतेचे पूजक

निसर्गदेवतेचे पूजक

Next

- मिलिंदकुलकर्णी
कुणी आदिवासी म्हणते, कुणी वनवासी म्हणते, शासकीय भाषेत अनुसूचित जमाती प्रवर्ग म्हणतात. प्रत्येक विचारधारा, सामाजिक व सांस्कृतिक संघटना, राजकीय पक्ष त्यांना आपल्या विचार चौकटीत बसवायला बघतात. जल, जंगल आणि जमिनीच्या विषयावरुन आंदोलने होतात. पेसा कायद्याच्या लाभाविषयी शासकीय जनजागृती होते. आदिवासी बांधव त्या सगळ्यांमध्ये सहभागी होतो, पण तरीही त्याचे वेगळेपण कायम ठेवतो. निसर्गपूजक म्हणून परंपरेने आलेल्या रुढींचे पालन करतो. याहामोगी देवीची पूजा करतो, तसा वीर तंटा भिलसह अनेक स्वातंत्र्य योध्दांविषयी अभिमान बाळगतो.


सातपुडा पर्वतात मंदिरे आहेत, देव आहेत, तरीही आदिवासी बांधव मूलत: निसर्गपूजक आहेत. निसर्गावर त्यांची नितांत श्रध्दा आहे. वेगवेगळ्या सण -उत्सवांच्या माध्यमातून त्याचे दर्शन होत असते. निसर्गाच्या ऋतुचक्रानुसार हे सण साजरे होत असतात. आता श्रावण आटोपून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामातील धान्य, भाजीपाला हाती येत आहे. त्यांचे सेवन करण्यापूर्वी निसर्गदेवतेला नैवेद्य दाखविला जातो, आणि त्याची संमती घेऊन मग नव्या हंगामातील अन्न धान्याचा वापर केला जातो. प्रत्येक गावाच्या वेशीवर हा कार्यक्रम होतो. रानभाज्यांचे पूजन निलीप किंवा निलीचारी या निसर्गदेवतेपुढे केले जाते. किती उदात्त विचार आहे या संकल्पनेमागे. ज्या निसर्गाने धान्य, फळे दिली, त्याचे सेवन करण्यापूर्वी त्याची संमती घेणे, ते धान्य शिजवून नैवेद्य दाखविणे, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे मोठेपण आहे.


वाघदेव पूजनदेखील याच काळात केले जाते. शिवारात धान्य काढणीला आलेले असताना पिकांच्या सेवनासाठी हरीण, काळवीट, रानडुक्कर असे प्राणी येत असतात. अन्नसाखळीचा भाग म्हणून वाघ, बिबटे शेतशिवाराकडे वळतात. अशावेळी पिकांची काढणी आणि इतर कामांसाठी शेतात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्राणाचे रक्षण व्हावे, म्हणून वाघदेवाचे पूजन केले जाते. या पूजनाची विशिष्ट पध्दत आहे. एकाला घोंगडे पांघरुन वाघ बनविले जाते आणि दुसºयाला देव बनविले जाते. दोघांची पूजा करुन नैवेद्य दाखविला जातो. वाघाला दुसºया गावाच्या वेशीपर्यंत पळवून लावले जाते. पळविण्यासाठी ओल्या मातीचे छोटे गोळे, त्याला इजा होणार नाही, अशा बेताने मारले जातात. सागाच्या पानांमध्ये हा नैवेद्य दाखविला जातो, पण ही पाने तोडण्यासाठी देखील वृक्षाची संमती घेतली जाते.


दिवाळी, होळीचे सण देखील पारंपरिक पध्दतीने साजरे होतात. प्रत्येक सणात निसर्ग, भूमी, प्राणी यांचा समावेश आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव आहे. यात कोठेही अंधश्रध्दा नाही. प्रतिकात्मक स्वरुपात हे उत्सव साजरे होतात.


हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या आदिवासी संस्कृतीचे मोठेपण पाहता, आम्ही नागर मंडळी खुजी आहोत, हे पदोपदी जाणवते. त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीवर आम्हा शहरवासीयांची नजर गेली आणि याठिकाणची संस्कृती धोक्यात आली. निसर्ग धोक्यात आला. बारीपाडा सारखी काही मोजकी गावे आता पुन्हा नव्याने उभी राहत आहेत, स्वयंपूर्ण होत आहे. पूर्वी सातपुडा पर्वतात सगळी गावे, पाडे अशी स्वयंपूर्ण होती.


वैचारिक विविधता आहे, त्यात आदिवासी बांधव सहभागी झाले, पण त्यांनी मूळ पण कधी विसरले नाही. ‘आप की जय’ परिवार हा व्यसनापासून दूर रहावे, दुसºयांचा सन्मान करावा अशा विचारांचा अनेक वर्षे प्रचार करीत आहे. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनात या भागातील आदिवासी बांधव हिरीरीने सहभागी झाले. चिकाटीने लढले. नर्मदेच्या तटावर मेधातार्इंनी सुरु केलेल्या ‘जीवनशाळे’त मुलांनी मुळाक्षरे गिरवली. प्रतिभा शिंदे यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून प्रश्नांसाठी लढा पुकारला तसेच लोकसमन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवनिर्मितीचे कार्य आरंभले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी या आणि इतर डाव्या विचारांचे राजकीय पक्ष व संघटना अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्य करीत आहे. मात्र नक्षली विचाराला याठिकाणी थारा दिला गेला नाही. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून ‘शबरीकुंभ’ सारखे उपक्रम याठिकाणी राबविले गेले. डावे, उजवे, क्रांतीकारी असे सगळे विचार याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहे. कारण याठिकाणचा आदिवासी बांधव सर्वव्यापी आहे. सगळ्यांना सामावून घेत, स्वत:चे वेगळेपण टिकविणारा असा आहे. निसर्गाकडून घेतलेल्या या विचाराचे तो तंतोतंत पालन करत आहे.

Web Title: Goddess of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.