प्रभूचरणी इतकेच मागणे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 07:27 AM2024-01-22T07:27:47+5:302024-01-22T07:28:07+5:30

‘रामराज्य’ आले पाहिजे हा जो आशावाद व्यक्त होतो, त्याच्या मुळाशी ‘मरणान्तानि वैराणी’ हे मुख्य सूत्र असेल तर राजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रात आलेले वैरत्व कमी होईल.

Everyone has immense faith in Lord Sri Ram | प्रभूचरणी इतकेच मागणे..!

प्रभूचरणी इतकेच मागणे..!

सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा संहार करणाऱ्या प्रभू श्रीरामांप्रति प्रत्येकाच्या मनात अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या अयोध्येतील रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा नव्या मंदिरात होत असताना आज सारा देश राममय झाला आहे. राम जन्मभूमी जोखडातून मुक्त व्हावी व त्याच जागी जगाला प्रेरणा देणारे मंदिर उभारले जावे या कोट्यवधींच्या स्वप्नांनी आणि आत्मिक इच्छांनीही वर्षानुवर्षे वनवास भोगला. त्या वनवासाची अखेर सोमवारच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याद्वारे होणार आहे. ‘मरणान्तानि वैराणि’ म्हणजे शत्रूच्या मृत्यूनंतर वैरत्व उरत नसते. याच विचाराने प्रभू रामांनी रावणाचा अंत्यसंस्कार अत्यंत सन्मानाने केलाच; पण त्याचे राज्य त्याचा भाऊ बिभीषणाला दिले.  

‘रामराज्य’ आले पाहिजे हा जो आशावाद व्यक्त होतो, त्याच्या मुळाशी ‘मरणान्तानि वैराणी’ हे मुख्य सूत्र असेल तर राजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रात आलेले वैरत्व कमी होईल. राम मंदिरासाठी झालेला संघर्ष व त्यातून उभ्या राहिलेल्या धार्मिक भिंती त्याच सूत्रानुसार कायमच्या पाडायला हव्यात. आजचा दिवस केवळ सिद्धीचा नाही, तर संकल्पासाठीच्या सिद्धतेचाही आहे. प्रभू श्रीरामांची एकूण १०८ नावे ही त्यांच्यातील गुणवैशिष्ट्यांवर आधारित आहेत. त्या गुणांवर आधारित समाजबांधणीची रुजवात यानिमित्ताने झाली तर ती एकप्रकारे रामराज्याची पायाभरणीच ठरेल. ही पायाभरणी केवळ राज्यकर्त्यांनी करावी आणि इतरांनी  नामनिराळे व्हावे ही दांभिकता ठरेल.

रामनामाचा जप आणि रामराज्याच्या संकल्पात मोठे अंतर आहे. कुठलाही देवनामाचा जप ही एककाची कृती ठरते, तर रामराज्य राबविणे हा सामूहिक आविष्कार. केवळ रामधून गाऊन होणार नाही, रामगुण आत्मसात करावे लागतील. समाजातील साध्या शंकेचेही दायित्व राजाने अव्हेरता कामा नये, हा वस्तुपाठ रामराज्याने दिला होता. गांधीजींच्याही मुखी रामनाम आले, ते याच आकर्षणातून! अमर्यादित ज्ञानाची कवाडे उघडली जात असतानाच्या या जगात अनेक अनिष्ट गोष्टींचा चिंताजनक फैलावही होत आहे. अशावेळी आपल्या जीवनकाळात कोणत्याही मर्यादांचे उल्लंघन न करणारे मर्यादापुरुषोत्तम राम कालसुसंगत ठरतात. ते मनुष्यजन्माला येऊन स्वकर्तृत्वाने देवत्वाला पोहोचले. धर्म-अधर्माच्या लढाईत मानवता ही केंद्रस्थानी मानत प्रभू रामांनी अधर्माचा पाडाव केला होता. शौर्य आणि धैर्य ही त्यांच्या रथाची चाके होती. क्षमाशीलता आणि सर्वांप्रति समानता हे त्या रथाचे घोडे होते. राजा म्हणून आणि वनवासातील संन्यासी म्हणून एकच व्यक्ती आदर्शांच्या सर्व संकल्पनांचे मूर्तिमंत रूप कसे असू शकते याचे ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होते.

महर्षी वाल्मीकींनी रामायणात मांडलेला संपूर्ण पट हा केवळ राम-रावणाच्या लढाईपुरता मर्यादित नाही. जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा तो महाग्रंथ आहे. आपला देश, हे जग भौतिकदृष्ट्या कितीही पुढारले तरी नैतिकदृष्ट्या समृद्ध राहण्यासाठी प्रभू रामांनी त्यांच्या कृतीने घालून दिलेल्या मार्गावरच चालावे लागणार आहे. केवळ राम मंदिराची उभारणी एवढेच लक्ष्य ठेवणे पुरेसे नाही. एकेकाळची मंदिरे ही सामाजिक स्वास्थ टिकावे, नैतिकतेवर आधारित पिढी निर्माण व्हावी यासाठीची प्रभावी केंद्रे होती. राजाश्रयाशिवाय ती चालविली जात. मंदिरांचे जीर्णोद्धार होताना आपण अनेकदा बघतो; पण आज अयोध्येत भव्य मंदिर होत असताना देशभरातील सर्व धार्मिक केंद्रांनी आपल्या इतिहासात निभावलेल्या जबाबदारीचाही जीर्णोद्धार केला तर ते रामराज्याच्या संकल्पनेला आधारभूत ठरणार आहे.

अयोध्येतील दिमाखदार मंदिर हे पावणेतेरा कोटी लोकांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून उभे राहत आहे. ते राजाश्रयाने झालेले नाही. रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य विकासाचे केंद्रही त्या ठिकाणी असणार आहे. याचा अर्थ श्रीराम मंदिर ट्रस्ट हे मंदिराच्या माध्यमातून आधुनिक पिढीच्या गरजांच्या पूर्तीचे केंद्रही बनणार आहे. मंदिरासाठीचा जनसहभाग आणि त्यातून उचलली जाणारी सामाजिक जबाबदारी देशातील अन्य मंदिरे/धार्मिक केंद्रांबाबतही प्रवाहित झाली तर ते राष्ट्रउभारणीसाठी मदतगारच सिद्ध होईल. मंदिरउभारणीतून राष्ट्रउभारणीचे लक्ष्य साधता येईल. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने निर्माण झालेला रामनामाचा जल्लोष राजकीय कल्लोळात रूपांतरित होणार नाही याची खात्री देता आली तर संत-महात्म्यांना अपेक्षित रामराज्य येऊ शकेल.  तुमचा आमचा राम आज गर्भगृहात थाटामाटाने विराजित होत असताना जनमनातील राम शोधून त्याच्या कल्याणाचा विचार वृद्धिंगत व्हावा, हेच प्रभूचरणी मागणे!

Web Title: Everyone has immense faith in Lord Sri Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.