इतकी का ठिसूळ नाती?

By किरण अग्रवाल | Published: July 5, 2018 10:13 AM2018-07-05T10:13:21+5:302018-07-05T10:14:51+5:30

अडचणीच्या घडीतही नात्याची गुंफण उसवलेली मंडळी आपली अहंमन्य भूमिका न सोडता वागताना वा वावरताना दिसून येतात तेव्हा, अशांना नातीच कळत नाहीत की काय, असा प्रश्न पडून गेल्याशिवाय राहात नाही.

Editorial Views on Family Relationships | इतकी का ठिसूळ नाती?

इतकी का ठिसूळ नाती?

Next

नाती ही काचेच्या भांड्यासारखीच असतात. ती तडकलीत की पुन्हा जुळण्याची शक्यता कमीच असते. नाती जपा असे म्हणूनच तर म्हटले जाते. पण कळणारी ही बाब अनेकांना वळत नाही. विशेषत: अडचणीच्या घडीतही नात्याची गुंफण उसवलेली मंडळी आपली अहंमन्य भूमिका न सोडता वागताना वा वावरताना दिसून येतात तेव्हा, अशांना नातीच कळत नाहीत की काय, असा प्रश्न पडून गेल्याशिवाय राहात नाही. नात्यांमध्ये ओढवलेली दुरस्थता व त्यातून कुटुंबकबिल्यात येणारी शुष्कता ही अनेकविध समस्यांना जन्म देणारीच असल्याने हा विषय सामाजिक चिंतेचा तसेच चिंतनाचाही ठरावा.

कुटुंब पद्धतीत वाढलेल्या विभक्ततेने जे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, त्यात नात्यांच्या ठिसूळपणाची बाब अग्रक्रमाने विचारात घेण्यासारखी आहे कारण व्यक्ती-व्यक्तीच्याच नव्हे तर एकूणच सामाजिक वेदनेचा पदर त्याच्याशी निगडित आहे. खरे तर नात्यात रस न उरणे किंवा त्यात महत्त्व न वाटणे या तशा भिन्न बाबी असल्या तरी त्या दोघांचा शेवट संबंध विच्छेदाकडेच नेणारा असतो; पण हे झाले टोकाचे पाऊल. खरीच का नाती अशी टोकाला नेऊन कडेलोट करण्यासारखी असतात, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होणारा असून, त्याची कारणे शोधायला निघता परस्परातील अविश्वास तर त्यामागे आढळून येतोच शिवाय कौटुंबिक जबाबदारीसंबंधीचे सामाजिक भय आज उरले नसल्यानेही ही स्थिती ओढवल्याचे आढळून येते.

अविश्वासातून तुटीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या नात्यांची उदाहरणे कमी नाहीत. पती-पत्नीमधील विश्वास संपल्याने विकोपाला गेलेली भांडणे जागोजागी पोलीस दप्तरी नोंद होत असतात. लग्नाला तब्बल १९ वर्षे झालेली व पदरी दोन अपत्ये असताना सिनेमात काम करण्याच्या हौसेपोटी गायब राहणाऱ्या पत्नीबद्दल मुंबईतील भायखळा पोलिसांकडे अलीकडेच दाखल झालेली तक्रार त्यापैकीच एक. प्रस्तुत प्रकरणातील खरे खोटे संबंधिताना ठाऊक; परंतु नात्यातील दुरावा वाढण्यास अविश्वास कारणीभूत ठरत असल्याची शेकडो उदाहरणे देता येणारी आहेत. ती जशी चिंतेची आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब आहे ती कुटुंब कर्तव्याबद्दल सामाजिक धाक न उरल्याची. त्याकडे समाजधुरिणांनी गांभीर्याने लक्ष पुरवण्याची गरज आहे.

एका रुग्णालयात अनुभवयास मिळालेली दोनच उदाहरणे यासंदर्भात पुरेशी बोलकी ठरावीत. त्यापैकी पहिले म्हणजे, साठीतील एक महिला पक्षाघात झालेल्या आपल्या पतीला रुग्णालयात घेऊन आलेली. काहीही करा, यांना वाचवा अशी तिची याचना. सोबत कुणीच कसे नाही, असे विचारता जी बाब कळली ती खरी अस्वस्थ करणारी. म्हणाली, मुलगा रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या पथकात आहे. सूनबाईही डॉक्टर आहे. पण त्यांना वेळ नाही. विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयात ही महिला पतीला घेऊन आली, तेथून मुलाचे घर जवळच आहे. पण सासू-सासºयास रुग्णालयात जेवणाचा डबा देण्याचीही सूनबाईची तयारी नाही. डोळ्यात आसवं घेऊन खिन्न मनाने नशिबाला दोष देत ही महिला आपल्या पतीच्या रुग्णालयीन सेवेत व्यस्त आहे.

दुसरे उदाहरण, पती-पत्नीचे जमत नाही. एकुलता एक मुलगा असल्याने व समाजात बदनामी नको म्हणून मुलाचे आई-वडील पडती बाजू घेत सूनबाईशी जुळवून घ्यायला तयार आहेत; पण तडकलेली काच जुळायला तयार नाही. अशात मुलाचा अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाली. म्हातारे आई-वडील जिवाच्या आकांताने धडपडत आहेत. पण सूनबाई अशा प्रसंगीही पाठीशी उभे राहायला तयार नाही. नावाला रुग्णालयात येऊन एकदा भेटून गेली. काही झाले तर कळवा, असे सांगून गेली. काही झाले म्हणजे काय अपेक्षित आहे तिला याचाच विचार करीत म्हातारा-म्हातारीचे डोळे टपटप टपकत आहेत. नात्यांमधले उसवलेपण किती गंभीर पातळीवर पोहचले आहे तेच यातून स्पष्ट व्हावे. वृद्ध माता-पित्यांकडे दुर्लक्ष करणाºया पाल्यांना जरब बसविणारा कायदा सरकारने केला आहे; पण ‘आपलेच दात आणि आपले ओठ’ची भावना हतबल करीत असते. म्हणजे कायदा असून त्याचा उपयोग करता येत नाही व सामाजिक भयही उरले नाही. माता-पित्यांना वाºयावर सोडून देणाºयांचा कान धरायला कुणी पुढे येत नाही. नाती ठिसूळ होताहेत ती त्यामुळेच. समाजशास्त्रींनी ही नाती टिकवण्यासाठी व जगवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 

Web Title: Editorial Views on Family Relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.